राजकारणाचा ठाणे पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:56 PM2017-12-15T23:56:27+5:302017-12-15T23:57:17+5:30

राजकारणात तडजोडीची, लवचीकतेची तयारी दाखवली; तर आवाक्यात नसलेले यशही कसे पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी घालून दिला.

Thane Pattern of Politics | राजकारणाचा ठाणे पॅटर्न

राजकारणाचा ठाणे पॅटर्न

Next

राजकारणात तडजोडीची, लवचीकतेची तयारी दाखवली; तर आवाक्यात नसलेले यशही कसे पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी घालून दिला. त्यातूनच भाजपाविरोधाच्या नव्या राजकीय ठाणे पॅटर्नचा उदय झाला आहे. लोकसभा, विधानसभेनंतर ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपा ज्या शत-प्रतिशत यशाकडे घोडदौड करत होता, त्याला लगाम घालण्याचे काम या पॅटर्नने केल्यामुळे विरोधी पक्षांनी ठरवले तर ते सामायिक राजकीय युद्धाचा एकत्रित मुकाबला करू शकतात, या कल्पनेनेच अनेकांच्या बाहूंत दहा हत्तींचे बळ आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर आपलाच वरचश्मा राहावा, यासाठी भाजपाने आक्रमक सुरुवात केली आणि श्रमजीवी संघटनेला सोबत घेत चतूर राजकीय खेळीही केली. सरकारच्या धोरणांबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी लगोलग काही निर्णयही घेतले गेले, पण त्याहीपुढे दोन पावले जात विरोधकांनी एकत्र दिलेली लढाई हाच या निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला. सरकारविरोधात नाराजी असणे वेगळे आणि त्यावर फुंकर घालून तिचे राजकीय लाभात रूपांतर करणे वेगळे. असा लाभ मिळवला जाणार नाही, याचा चोख बंदोबस्त भाजपाने यापूर्वी केला. विरोधक एकत्र नसल्याचा फायदा उठवला. पण ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जवळपास प्रत्येक पक्ष काही कमावण्यासाठी काही गमावण्यास तयार झाला; विरोधकांसाठी काही मतदारसंघ सोडून देण्याची लवचीकता दाखवत गेला. त्यातूनच ‘भाजपालाही तुम्ही हरवू शकता’ हा धडा त्यांना शिकायला मिळाला. राजकीय तडजोडीचे निर्णय घेण्यास काँग्रेसने विलंब लावल्याने त्यांना अल्प लाभावर संतुष्ट व्हावे लागले; त्या तुलनेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या लाभाचे धनी झाले. खासकरून शेतकºयांतील, वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांतील नाराजीचे भाजपाविरोधी मतांत रूपांतर करण्याची किमया सत्तेत असूनही शिवसेनेलाही साधता आली आणि कधी नव्हे इतका तो पक्ष ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकारणात रूजला. या ठाणे पॅटर्नच्या धोक्याची घंटा भाजपाने आतापासूनच ऐकायला हवी. त्यानुसार भूमिका बदलायला हवी. स्थानिक पातळीवरील निवडणुका, त्यातील मुद्दे जरी भिन्न असले आणि राष्ट्रीय किंवा राज्य पातळीपेक्षा त्या लढवण्याची पद्धतही वेगळी असली, तरी ग्रामीण भागातील मतदाराच्या भावनांचा कानोसा त्यातून घेता येतो, हे जरी त्यांनी मान्य केले तरी पुरेसे आहे.

Web Title: Thane Pattern of Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.