थँक्यू युनेस्को, वर्ग किलबिलता हवा, ‘स्मार्ट’ नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 07:47 AM2023-07-29T07:47:18+5:302023-07-29T07:47:34+5:30

स्मार्टफोन हद्दपार करा, वर्गातले चैतन्य परत आणा, हे युनेस्कोनेच सांगितले म्हणून बरे! स्क्रीनवर खिळून बसलेली अगतिक मुले हे दु:खद चित्र होय!

Thank you UNESCO, the classroom needs chirping, not 'smart'! | थँक्यू युनेस्को, वर्ग किलबिलता हवा, ‘स्मार्ट’ नको!

थँक्यू युनेस्को, वर्ग किलबिलता हवा, ‘स्मार्ट’ नको!

googlenewsNext

वैशाली गेडाम, प्राथमिक शिक्षक, जि. प. प्रा. शाळा, गोंडगुडा, जि. चंद्रपूर

वर्गात ‘काळ’ ही संकल्पना मी शिकायला घेतली. फळ्यावर ‘काळ’ लिहिले, तर वर्गातील मुलांनी ‘काळ’ हा शब्द ‘काढ’ या अर्थाने घेतला. मग ‘काढ’ या शब्दाचा क्रियापद रूपात वापर करत आणि अक्षरशः कृती करत मला काही वाक्ये सांगितली.  ‘हे वा, मी दप्तरातून पुस्तक काळलो.’ - दप्तरातून पुस्तक काढत लिमरा म्हणाली. 

मला आणि मुलांनाही फारच मौज वाटू लागली. पुढे मी दोन्ही शब्द नीट उच्चारून दाखवले. शब्दांतील आणि त्यांच्या अर्थातील भेद समजावून सांगितला. हा भेद मुलांच्या नीट लक्षात आल्यानंतर आमची गाडी पुढे निघाली. साक्षीला काहीतरी आठवले. तिने मराठीचे पाठ्यपुस्तक उघडून पाहत ‘भूतकाळ’ शोधला.  श्रेया ‘आत्माकाऽऽळ’ म्हणाली..  तिच्या पाठोपाठ  लिमरा ‘चुडैऽलकाऽळ’ म्हणून ओरडली आणि लगेच रोशनीने आपल्या डोळ्यांच्या पापण्या आत घालून, उलट्या फिरवून भीतीदायक चेहरा बनवला. पुढे तर जाम मजा आली. नंतर मात्र मुलांनीच तिन्ही काळ पाठ्यपुस्तकातून शोधले. भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही शब्दांचा योग्य विचार करत काळाशी अचूक संदर्भ त्यांनीच लावला आणि वाक्यांचे काळ अचूक ओळखले. तास संपता संपता मुलांनी मला मिठी मारली आणि कुणीतरी म्हणाले, ‘तू खूपच छान शिकवली मनून तुजा लाड आला.’
- हे सारे सांगण्यामागचा हेतू, मुले आणि शिक्षक प्रत्यक्ष समोर असताना जे घडते, ज्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतात, जे बंध निर्माण होतात, मुलं ज्या कल्पना लढवू शकतात, जो विचार करू शकतात, त्यासाठी ते स्वतःला लागणारा जो अवकाश घेतात, शब्दांची जुळवाजुळव करून भाषेचा वापर करतात,  जी सर्जनशीलता अनुभवू शकतात, शिक्षकांच्या, वर्गमित्रांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचू शकतात, निर्णय घेऊ शकतात... हे सगळे स्मार्टफोनच्या माध्यमातून होत नाही. शिक्षक दूर कुठेतरी  बसलेला / बसलेली आणि मुले आपापल्या घरी; हे असे असताना कसली ‘जादू’ घडणार? 

मुले आणि शिक्षक जेव्हा प्रत्यक्ष एकमेकांसोबत असतात, तेव्हा  ज्या गोष्टी मुले अनुभवतात, त्यातून मुलांची निकोप, निरोगी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक वाढ होते. कोणतीही संकल्पना शिकताना मध्ये एक अवकाश जावा लागतो. शिक्षक स्मार्टफोनच्या माध्यमातून मुलांना शिकवत असतील तर असा अवकाश मिळणे शक्य नसते. 

खरे तर शिकवणे नावाची संकल्पना मुळात अस्तित्वातच नाही. मुले स्वतः शिकत असतात. जसे आपण मुलांना चालणे शिकवत नाही. मोठ्यांच्या आधाराने मुले स्वत:च चालायला शिकतात. त्याचप्रमाणे भाषिक, गणितीय, विज्ञानादी संकल्पना मुले स्वतःच समजून घेत असतात. फक्त त्यासाठी एक प्रेमळ सुलभक मुलांजवळ असायला लागतो, ज्याला आपण शिक्षक म्हणतो. ज्याच्याजवळ मुले आपल्या कल्पना, आपले विचार, आपली निर्मिती मांडू शकतात. अडचणी, दुःख शेअर करू शकतात.  स्मार्टफोनच्या माध्यमातून शिकवत असताना हे घडू शकत नाही. 

इंटरनेट ही सुविधा आणि स्मार्टफोन, कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टबोर्ड ही फार भन्नाट आणि उपयुक्त साधने आहेत. आधुनिक जग यानेच जोडले गेले आहे. अनेक अमूर्त कल्पना आपण स्मार्टफोनवर आभासी रूपात बघू शकतो. दुसऱ्या प्रांताची, दुसऱ्या देशाची भाषा शिकू शकतो. ज्या मुलांनी प्रत्यक्ष समुद्र बघितला नसेल, बर्फ बघितला नसेल ती मुले आभासी रूपात ते बघू शकतात. बघून प्रत्यक्षात तेथे जाण्याची इच्छा बाळगू शकतात. चंद्रावर झेपावणारे यान बघू शकतात... इतर बरेच काही. अधिक स्मार्ट आणि समृद्ध होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक शाळेत डिजिटल साधने आणि इंटरनेट सुविधा असायलाच हवी. -पण शिक्षक कुठेतरी दूर बसून इंटरनेटचा वापर करून स्मार्टफोन, स्मार्टबोर्डच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याचा(?) प्रयत्न करतोय आणि मुले आपली नजर त्या स्क्रीनकडे खिळवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत, हे मात्र नको! मुलांना आता खरेतर या स्क्रीनपुढून उठून जावेसे वाटते आहे. कारण  स्वतः काहीही क्रिएटिव्ह न करता नुसते ऐकत आणि पाहत बसण्याचा त्यांना कंटाळा आला आहे, पण मुले बिचारी अगतिक आहेत.  या अगतिकतेचे रूपांतर आक्रोशात होत आहे. त्यांचा मेंदू आक्रस्ताळेपणा करू लागलाय, एका जागी बसावे लागत असल्यामुळे आळशी बनू लागलाय.

ही गोष्ट युनेस्कोच्या लक्षात आली. त्यांनी अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला आणि शाळांना स्मार्टफोनपासून दूर ठेवा, असा दम दिला, याबद्दल युनेस्कोचे अभिनंदन! मुलांना खरी गरज असते, भरपूर शारीरिक हालचालींची आणि खेळांची. प्रत्यक्ष प्रेमळ माणसांची, त्यांच्या आश्वासक प्रेमाची, कौतुकाची, शाबासकीची प्रत्यक्ष थाप हवी असते, जी पाठीवरून, गालावरून प्रेमाने स्पर्शून जाते. आभासी शिक्षणात मुले याला मुकतात. 
डिजिटल व्यवस्था ही मुलांचे शिक्षण अधिक समृद्ध व्हावे म्हणून वापरायची एक पूरक सुविधा आहे. शिकण्या-शिकवण्याच्या मानवी आणि प्रत्यक्ष प्रक्रियेला तो पर्याय होऊ शकत नाही. देशांची सरकारे युनेस्कोची ही  हाक ऐकतील अशी आशा. पालकांनी मात्र आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य पर्याय निवडावा व तसा आग्रह यासाठी धरावा... तरच मुले आनंदी राहू शकतील!

Web Title: Thank you UNESCO, the classroom needs chirping, not 'smart'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.