आभार प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2016 02:41 AM2016-12-30T02:41:51+5:302016-12-30T02:41:51+5:30
एखादे कार्य पार पडले की संबंधितांचे आभार मानावे असा एक संकेत आहे. या संकेताची नंतर पद्धत झाली, पद्धतीची फॅशन झाली आणि आता तर त्याकडे केवळ उपचाराचा भाग म्हणून
- प्रल्हाद जाधव
एखादे कार्य पार पडले की संबंधितांचे आभार मानावे असा एक संकेत आहे. या संकेताची नंतर पद्धत झाली, पद्धतीची फॅशन झाली आणि आता तर त्याकडे केवळ उपचाराचा भाग म्हणून पाहिले जाते. आभार प्रदर्शनाचा कार्यक्र म जाहीर झाला की लगेच उठून बाहेर पडण्याची पद्धतही आहे, इतकी की एखादा माणूस कार्यक्रम स्थळी शिल्लक राहिला तर तो अडाणी आहे की काय अशी शंका यावी. इतक्या घाईघाईने उठून ही माणसे जातात कुठे आणि पुढे काय करतात असा प्रश्न मला नेहमी पडतो. विमान लॅण्ड झाले की इतका वेळ गुपचूप बसलेले प्रवासी विमानात बॉम्ब ठेवल्याची बातमी मिळाल्याप्रमाणे खाडखाड धाडधाड उठून उभे राहतात. त्यांनी पंधरा मिनिटे उभे राहिलेले चालेल पण बसून राहणे हे जणू अडाणीपणाचे लक्षण मानले जाते. सिनेमा संपल्यावर श्रेयनामावली सुरू होते, ज्यांनी ती कलाकृती निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले ते कलावंत, तंत्रज्ञ कोण हे समजून घेणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपल्या आधुनिक जीवनमूल्यांत जणू बसतच नाही, श्रेय नामावली सुरू झाली की लगेच सारे उठून थिएटरच्या बाहेर पडू लागलात...असे का?इतकी कसली घाई झाली आहे आपल्याला? हे आपल्या बधीर मानसिकतेचे आणि कृतघ्नपणाचे लक्षण तर नाही!
थांबताच येत नाही अशा अवस्थेतील माणूस शौचालयाकडे जसा धावत सुटतो तसा सामान्यपणे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होत असतो. आपण कुणाचे आभार मानतोय, कशासाठी मानतोय, नाव बरोबर आहे का, नावांची क्रमवारी योग्य आहे का या कशाचाही विचार न करता केलेले आभार प्रदर्शन हे एका अर्थी आभार विडंबन ठरते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्या सर्व ज्ञात अज्ञात मित्रांचे आभार, असे एक वाक्य शेवटी म्हणण्याची पद्धत आहे. ज्ञात आणि अज्ञात या दोन शब्दांत साऱ्यांचीच बोळवण करण्याची ही हिंसक वृत्ती आयोजकांमध्ये का आली, याचा अभ्यास होण्याची गरज आहे. एवढा मोठा कार्यक्रम करताय ना, मग नीट आभार माना की सगळ्यांचे आणि अज्ञात अशी वेगळी पंगत कशाला उठवताय, ते अज्ञात कोण आहेत ते आधी शोधून काढा, तेथेच तुम्हाला त्या कार्यक्रमाच्या श्रेयाचे खरे मानकरी सापडण्याची शक्यता आहे. विमान अपघातातून बचावलेल्या एका वैमानिकाने परमेश्वरापासून त्या अज्ञात शक्तीपर्यंत सर्वांचे पुन:पुन्हा आभार मानले पण ज्याने त्याचे पॅराशूट नीट गुंडाळून ठेवले होते, त्याचे आभार मानायला मात्र तो विसरला होता!