ती धुंद रात्र, वादळी ट्रम्प खटला अन् स्टॉर्मी!
By Shrimant Mane | Published: April 9, 2023 08:20 AM2023-04-09T08:20:00+5:302023-04-09T08:20:40+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तुरुंगाचा दरवाजा दाखविणारी पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल्स जगभरात चर्चेत आली आहे.
मुद्द्याची गोष्ट : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तुरुंगाचा दरवाजा दाखविणारी पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल्स जगभरात चर्चेत आली आहे. या दोघांच्या आयुष्यात नेमके असे काय घडले होते की ज्यामुळे जगभरात वादळी चर्चा सुरू झाली, याचाच घेतलेला हा मागोवा...
सवर्ष होते २००६. जुलै महिना. कॅलिफोर्निया व नेवाडा प्रांताच्या सीमेवर लेक नाहो रिसॉर्टमध्ये चॅरिटी गोल्फ टुर्नामेंट सुरू होती. गोल्फवेडे उद्योजक डोनाल्ड ट्रम्प एकटेच तिथे होते. त्यांची तिसरी पत्नी मेलानिया हिने बॅरोन या ट्रम्प यांच्या पाचव्या अपत्याला जन्म दिला होता. ट्रम्प यांना तेव्हा उद्योग क्षेत्राबाहेर कुणी ओळखत नव्हते. प्रौढांच्या सिनेमात काम करणारी, पॉर्नस्टार अशी ओळख असलेली स्टॉर्मी डेनियल्स तिथेच होती. सुंदर ललनांचे आकर्षण असलेल्या ट्रम्प यांनी स्टॉर्मीला डिनरला बोलावले.
साठीचे ट्रम्प व तिशीच्या जवळ पोहोचलेली स्टॉर्मी यांनी डिनरनंतर रात्र एकत्र काढली. दहा वर्षांनंतर थेट अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे स्वप्न ट्रम्प यांनी पाहिले नसते तर ती रात्र कुणाला आठवलीही नसती. त्याआधी आपल्या व्यवसायाची गरज म्हणून कधी रिपब्लिकन, कधी डेमोक्रॅट असा थोडासा राजकीय कल ठेवणारे ट्रम्प राजकारणात अधिक सक्रिय झाले. कधीकाळी सिनेट निवडणुकीत भाग्य आजमावलेल्या स्टॉर्मीने ट्रम्प यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा ओळखल्या. शय्यासोबतीचा गौप्यस्फोट केला. ट्रम्प यांनी धोका ओळखला.
डिसेंबर २०१६ मध्ये अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून निवडून येण्याआधी हे बालंट दूर व्हावे म्हणून हालचाली केल्या. वकील मायकेल कोहेन याला स्टॉर्मीचा बंदोबस्त करायला सांगितला. कोहेन यांनी तोंड बंद ठेवण्यासाठी १ लाख ३० हजार डॉलर्स म्हणजे आपल्याकडील साधारण एक कोटी रुपये दिले. नॉन डिस्क्लोजर डील झाली. असे म्हणतात, की स्टॉर्मी व तिच्या लहान मुलीला लास वेगासच्या एका चौकात धमकीही देण्यात आली. त्या धमकीमुळे असो की अन्य काही, पण तोंड बंद ठेवण्याचा करार स्टॉर्मीने पाळला नाही. टच मॅगेझिन तसेच इतर काही ठिकाणी स्फोटक मुलाखती दिल्या. ६० मिनिट्स कार्यक्रमातील तिच्या मुलाखतीने सनसनाटी झाली. मादक स्टॉर्मीने जिम्मी किमेल याला दिलेली मुलाखत यूट्यूबवर ज्याने कुणी पाहिली असेल त्यांच्या लक्षात आले असेल की स्टॉर्मी डेनियल्स काय चीज आहे...
तोंड कुणाकुणाचे बंद केले?
सेक्सबाबत उघड चर्चा करणाऱ्या अमेरिकेत राजकीय नेता किंवा उद्योजकासाेबत एखाद्या मदनिकेने शरीरसंबंध ठेवणे, त्यावर खुलेपणाने बोलणे हा गुन्हा मानला जात नाही. पॉर्नस्टारही तिथे सामान्यांसारखे हिंडू फिरू शकतात. तिथले सामाजिक, सांस्कृतिक वातावरण संकुचित नाही. स्टॉर्मी डेनियल्स ही ट्रम्प यांच्या आयुष्यातील कितवी स्त्री असेल, हे त्यांनाही सांगता येणार नाही. त्यांच्या वकिलांनी प्लेबॉय मासिकाची मॉडेल कॅरेन मॅक्डौगल हिलादेखील तोंड बंद ठेवण्यासाठी मोठी रक्कम दिल्याचा आरोप आहे. मुळात ट्रम्प यांनी इव्हाना, मारिया व मेलानिया अशा तिघींशी अधिकृतपणे लग्नच केले. त्यामुळे केवळ शय्यासोबत केली म्हणून ट्रम्प यांच्या कीर्तीला काही डाग वगैरे लागणार नव्हताच. ते अडकले वेगळ्याच कायद्यात. स्टॉर्मीला १ लाख ३० हजार डॉलर्स ट्रम्प यांच्या निवडणूक निधीतून दिले गेले असा आरोप आहे व अमेरिकेत तो गुन्हा आहे. तिथे निवडणूक प्रचारासाठी उघडपणे निधी दिला व घेतला जातो. वैयक्तिक तसेच संस्था व उद्योगांकडून अधिकृतपणे राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात. हा व्यवहार जाहीरपणे होतो.
वकिलांच्या कबुलीने घात केला
ट्रम्प यांना परवा पोलिसांनी अटक केली. कोर्टात आरोपी म्हणून उभे राहावे लागले. एकूण ३४ आरोपांचा सामना करावा लागत आहे. या सगळ्या भानगडीमागे हा निवडणूक प्रचाराच्या पैशांच्या अपहाराच्या आरोपच महत्त्वाचा आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीपासून सगळे आरोप नाकारले असले तरी त्यांचे वकील मायकेल कोहेन यांनी स्टाॅर्मीला पैसे दिल्याचे कबूल केले. ती रक्कम नंतर ट्रम्प यांनी दिल्याचे सांगितले. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांना तीन वर्षांची शिक्षा झाली. ट्रम्प यांचे सगळे नकार फोल ठरले. अपेक्षेनुसार, ट्रम्प यांनी हा खटला, कारवाई वगैरे राजकीय द्वेषभावनेने सुरू असल्याचा दावा केला. अध्यक्ष जो बायडेन तसेच डेमोक्रेटिक पार्टीने न्यायव्यवस्थेचे गुन्हेगारीकरण केल्याचा आरोप केला आहे. बायडेन यांच्यामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे संकट ओढवेल, असे ते म्हणाले आहेत.
स्टॉर्मी डेनियल्स नावाचे मादक वादळ
ट्रम्प यांना तुरुंगाच्या दरवाजापुढे उभे करणाऱ्या पॉर्नस्टारचे खरे नाव स्टॉर्मी डेनियल्स नाही. तिचे खरे नाव स्टेफनी क्लिफोर्ड. ल्युसियाना प्रांतात ती १९७९ मध्ये जन्मली. ॲडल्ट सिनेमांत तिने स्टॉर्मी डेनियल्स हे नाव धारण केले. यातील स्टार्मी हे नाव संगीतकार निक्की सिक्स याची मुलगी स्टॉर्म हिच्यापासून तर डेनियल्स हे नाव जॅक डेनियल्स या व्हिस्की ब्रँडमधून उचलले. सतराव्या वर्षी स्ट्रिपर म्हणून केलेली सुरुवात व नंतर पॉर्नस्टार म्हणून तिचे जग अगदीच वेगळे. तिनेही तीन-चार लग्ने केली आहेत. काही सिनेमांची निर्मिती, बिग ब्रदरची होस्ट आणि ट्रम्प यांच्या खटल्यामुळे जगभर पोहोचलेले नाव या गोष्टी सोडल्या तर स्टॉर्मीच्या कारकिर्दीतून ठळक नोंद घ्यावी असे काही नाही. दहा वर्षांमधील तिच्या आठवणींचा संग्रह ‘फुल्ल डिस्क्लोजर’ नावाने २०१८ मध्ये प्रकाशित झाला. पण, त्यातही ट्रम्प यांच्याशी शय्यासोबत वगळता गौप्यस्फोट म्हणावे असे काही नाही.