‘त्या’ गंधर्वाने खरेच रातोरात सात तळांची माडी बांधली असेल बरं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 05:56 AM2023-02-04T05:56:33+5:302023-02-04T05:59:48+5:30

पॅरिसमध्ये अलीकडेच झालेल्या उत्खननात गाढवाचे अवशेष सापडले. या कष्टाळू प्राण्याच्या अवशेषांनी जंगली प्राणी माणसाळण्याचा काळ अडीच हजार वर्षे मागे नेला.

'That' Gandharva must have actually built a seven-floor maadi overnight! | ‘त्या’ गंधर्वाने खरेच रातोरात सात तळांची माडी बांधली असेल बरं!

‘त्या’ गंधर्वाने खरेच रातोरात सात तळांची माडी बांधली असेल बरं!

googlenewsNext

- श्रीमंत माने
( कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर)

फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या ईशान्येला २८० किलोमीटर दूर बूनव्हील खेड्याजवळ अलीकडेच उत्खननात गाढवांचे अवशेष आढळले. त्या अवशेषांनी जंगली प्राणी माणसाळण्याचा काळ किमान अडीच हजार वर्षे मागे नेला. ते अवशेष अधिक मोठ्या व उंच म्हणजे १५५ सेंटीमीटर किंवा अश्वकुलातील घोडा, झेब्रा, खेचर वगैरे प्राण्यांची उंची मोजण्याच्या परिमाणात सांगायचे, तर पंधरा हात उंचीच्या गाढवांचे आहेत. जगभरात आताची गाढवे बुटकी आहेत. त्यांची उंची साधारणपणे ९० ते १३० सेंमी असते. 

मानववंशशास्त्र मानते की, साधारणपणे बारा हजार वर्षांपूर्वी माणूस अर्थात, होमो सेपियन शेतीत उतरला. शिकार करून पोट भरण्याची हजाराे वर्षांची भटकंती थांबली. गहू, तांदूळ, बटाटा वगैरे जंगली वनस्पती, कंदांची लागवड होऊ लागली. काही जंगली प्राणीही माणसाळले. कुत्रा हा तसा पहिला प्राणी. माणसांचा पहिला व अजूनही खरा मित्र. इतका जिगरी दोस्त की, जुन्या कबरींमध्ये अगदी राजघराण्यातील व्यक्तींसोबत दफन होण्याचे भाग्य कुत्र्यांना लाभले. गाढवेही तितकीच माणसांची प्राचीन मित्र असावीत, या मताला बूनव्हीलच्या उत्खननाने बळ मिळाले आहे आणि कुत्र्यांसारखेच गाढवांनी वैभव उपभोगले असावे. ईजिप्त व मेसोपाेटेमियामध्ये अगदी राजाबरोबर दफन केलेल्या गाढवांचे अवशेष सापडले आहेत. कुत्रा राखण करायचा, संकटकाळी साथ द्यायचा, तर गाढव माणसांचे ओझे हलके करायचे. चाकाचा शोध लागल्यानंतरही गाढवांचे कष्ट संपले नाहीत. जड मालाच्या वाहतुकीचे मोठे काम अत्यंत काटक, कष्टाळू अशी गाढवे कैक हजार वर्षे करीत आली आहेत. मध्यपूर्वेतल्या काही भागांत, आपल्याकडे लडाख व इतर डोंगराळ भागात जिथे वाहने जाऊ शकत नाहीत, तिथे आजही गाढव हाच माणसांचा विश्वासू साथीदार आहे. 

जंगली गाढवे माणसांत कधी आणि कशी आली, हाही रंजक विषय आहे. जगभरातल्या ३७ प्रयोगशाळांमधील ४९ संशोधकांनी २०७ अर्वाचीन व ३१ प्राचीन गाढवांचा जनुकीय अभ्यास केल्यानंतर अनुमान काढले की, पशुपालकांनी साधारणपणे सात हजार वर्षांपूर्वी, तेव्हा हिरव्यागार असलेल्या सहारा वाळवंटात पहिल्यांदा गाढवे माणसाळली. तिथूनच ती जगभर स्थलांतरित झाली. फ्रान्समधील गाढवेही त्याच वंशाची आहेत. तुर्कीमधल्या गाढवांचे अवशेष साडेचार हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे रेडिओकार्बन डेटिंगमधून स्पष्ट झाले आहे. अलीकडच्या दोन हजार वर्षांत जंगली गाढवांच्या किमान तीन प्रजाती नामशेष झाल्या. भारतात कच्छचे रण व अगदी उत्तरेकडे लडाखमध्ये रानटी गाढवे आहेत. यापैकी कच्छमधील फिकट करड्या रंगाच्या गाढवांचे कळप पर्यटकांचे आकर्षण आहे. 

तेव्हा ‘काय गाढवपणा’ किंवा ‘अरे गाढवा’ वगैरे दूषणे लावून हेटाळणी होणारा हा प्राणी लोकसंस्कृतीचे अंग बनला नसता, तरच नवल. येशू ख्रिस्त गाढवावर बसून जेरूसलेमला गेले, असे सांगतात. संत एकनाथांनी गोदावरी नदीपात्रात तहानेने तडफडणाऱ्या गाढवाला पाणी पाजून भूतदयेचा आदर्श जगापुढे ठेवला. वेद वाङ‌्मयात गर्दभ, रासभ, खर अशा नावाने गाढव सतत भेटते. दोन हजार वर्षांपूर्वी, विक्रमादित्यच्या उज्जैनचा गाढवाचा बाजार प्रसिद्ध होता. आजही गाढवांचे बाजार भरतात. महाराष्ट्रात जेजुरी व मढीचा बाजार प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशात तीन सॉफ्टवेअर इंजिनीअर्सनी सुरू केलेला गाढविणीच्या दुधाचा व्यवसाय जोरदार चाललाय. गाढविणीचे दूध संधीवात, खोकला, न्यूमाेनिया आजारांवर रामबाण आहे. औषधनिर्मिती व सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी ते वापरले जाते. त्यामुळे त्याचा दरही खूप, पाच हजारांपासून तेरा हजार रुपये लिटर आहे.

हरिभाऊ वडगावकर लिखित, दादू इंदुरीकरांनी अजरामर केलेल्या ‘गाढवाचं लग्न’ वगनाट्यातील सावळ्या कुंभार व त्याच्या गंगीचे लाडके गाढव मराठी कलासंस्कृतीचे सोनेरी पान आहे. गाढवाच्या रूपात शापित गंधर्व एका रात्रीत सात तळांची तांब्या -पितळेची माडी बांधतो व मग राजाची राजकन्या त्याच्याशी विवाह करते. नाटकात व सिनेमात कल्पनाविलास असला, तरी गाढव इतके इमानदार व कष्टाळू आहे की, खरेच त्याने तशी माडी बांधली, म्हटले तरी आश्चर्य नको.
    shrimant.mane@lokmat.com

Web Title: 'That' Gandharva must have actually built a seven-floor maadi overnight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.