८८ वर्षीय दलाई लामांनी काढला चीनला चिमटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 07:54 AM2023-03-29T07:54:13+5:302023-03-29T07:54:32+5:30
‘दलाई लामा’ हे खरं तर एक पद आहे. दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात.
चीन आणि दलाई लामा यांचं वैर गेल्या कित्येक वर्षांपासूनचं आहे. याचं कारण अर्थातच तिबेट. दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू. तिबेटला गिळंकृत करण्याचा चीनचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रयत्न आहे. दलाई लामा यांनी सुरुवातीपासूनच त्याला विरोध केला आहे. चीन आपल्याला केव्हाही अटक करील या भीतीनं तब्बल ६४ वर्षांपूर्वी दलाई लामांनी तिबेट सोडलं होतं आणि भारतात आसरा घेतला होता. दलाई लामा यांना भारतानं आश्रय दिल्यानं चीनचा तीळपापड झाला होता. भारत आणि चीनमध्ये तणाव असल्याची जी अनेक कारणं आहेत, त्यात दलाई लामांना भारतानं आश्रय दिल्याचंही एक कारण आहे.
तिबेटच्या बाहेर राहून दलाई लामांनी अनेकदा चीनच्या वर्चस्वाला आव्हान दिलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर चीनचा प्रचंड राग आहे. चीनच्या वर्चस्वाला न जुमानता ८८ वर्षीय दलाई लामा (तेन्झिन ग्यात्सो) यांनी चीनवर पुन्हा एकदा कुरघोडी करता चीनला चिमटा काढला आहे. तिबेटी बौद्ध धर्माचा तिसरा सर्वोच्च धर्मगुरू म्हणून त्यांनी नुकतीच एका आठ वर्षाच्या मुलाची नियुक्ती केली आहे. धर्मगुरू म्हणून ज्या मुलाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याचा जन्म अमेरिकेत झाला असून तो मंगोलियन वंशाचा आहे. या नियुक्तीमुळे चीनचा पुन्हा एकदा तीळपापड झाला आहे. कारण तिबेटच्या धर्मगुरुपदी ज्या कोणाची निवड होईल, तो आमच्याच पसंतीचा असेल, असं चीननं कधीचंच जाहीर केलं आहे. पण दलाई लामांनी ते सपशेल नाकारलं आहे.
तिबेटमधल्या लोकांचाही दलाई लामांवरच विश्वास असून त्यांचा निर्णय त्यांनी उचलून धरला आहे. या नव्या धर्मगुरुंचा समारंभ नुकताच पार पडला. ज्या मुलाची धर्मगुरू म्हणून निवड करण्यात आली, तो मंगोलियन वंशाच्या एका गणिताच्या प्रोफेसरच्या जुळ्या मुलांपैकी एक आहे. या दोन्ही मुलांची नावं अगुदाई आणि अचिल्ताई अल्तनार अशी आहेत. या मुलांची आजी मंगोलियामध्ये खासदारही होती. आठ वर्षीय मुलाची धर्मगुरू म्हणून निवड होताच तिबेट आणि मंगोलियन वंशाच्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
नव्या धर्मगुरुंची दलाई लामांनी केलेली नियुक्ती म्हणजे चीनच्या जखमेवर मीठ! दलाई लामा हे सध्या तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू आहेत. १९३५ मध्ये त्यांचा जन्म झाला. ते दोन वर्षांचे होते तेव्हाच जुन्या दलाई लामांचा पुनर्जन्म झाला, असं मानलं जातं.
‘दलाई लामा’ हे खरं तर एक पद आहे. दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरू झाली. पहिले लामा जेनडून द्रूप हे होते. पहिल्या लामांनंतर प्रत्येक नवे दलाई लामा पूर्वीच्या लामांचा अवतार मानले जातात. ‘दलाई लामा’ याचा अर्थ ज्ञानाचा महासागर. जगभरातील बौद्धधर्मीय लोक दलाई लामांना आपले धर्मगुरू मानतात. इ.स. १३९१ ते इ.स. १९३३ या कालखंडात १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे तेन्झिन ग्यात्सो हे चौदावे दलाई लामा आहेत. चीनची सुरुवातीपासूनच दलाई लामा यांच्यावर वक्रदृष्टी होती.
१९५९ मध्ये चीननं तिबेटवर कब्जा केल्यानंतर आता आपल्यालाही अटक होईल, या भीतीनं दलाई लामा यांनी तिबेट सोडलं होतं. चिनी सैन्याला कोणताही अंदाज, संशय येऊ नये म्हणून १७ मार्च १९५९ रोजी तिबेटची राजधानी ल्हासा येथून ते पायी चालत भारताच्या दिशेनं निघाले होते. हिमालयातील दुर्गम पर्वतरांगा, टेकड्या आणि दऱ्या-खोऱ्यांचा भाग पायी चालत, अत्यंत हालअपेष्टा सोसत त्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे राहत आहेत.
पायी चालत गेल्यानं आणि बराच काळ दलाई लामा आणि त्यांच्या सोबत गेलेल्या त्यांच्या शिष्यांची काहीही माहिती न मिळाल्यानं हिमालयातील खराब हवामानानं त्यांना कायमचं निसर्गात सामावून घेतलं असं तिबेटमधल्या लोकांना वाटत होतं. १९८९ मध्ये दलाई लामा यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. चीनच्या दृष्टीनं मात्र ते आजही फुटिरतावादी असून तिबेटसाठी ते धोकादायक आहेत, असं त्यांचं मानणं आहे. दलाई लामा यांना केंव्हा अटक करता येईल याची संधीच चीन शोधत आहे.
एकाच वेळी दोन धर्मगुरू?
१९९५ मध्ये दलाई लामा यांनी दुसरे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून पंचेन लामा यांची निवड केली होती. त्यावेळी पंचेन यांना चीननं लगेचंच तुरुंगात डांबलं होतं. तिबेटला तिसरे धर्मगुरू मिळाल्यानंतर बौद्ध धर्मीय त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंतीत आहेत. दलाई लामा यांचं तर म्हणणं आहे, चीन माझ्या मृत्यूचीच वाट पाहत आहे. त्यानंतर कदाचित तिबेटचे दोन-दोन धर्मगुरू असू शकतील. एक भारतासारख्या स्वतंत्र देशातून नेमला गेलेला आणि दुसरा चीननं जबरदस्तीनं ‘गादीवर’ बसवलेला! त्याला लोकांची मान्यता मात्र नसेल!