जयंतीचा झाला जल्लोष, विचार मात्र हरवले!
By विजय दर्डा | Published: April 18, 2022 09:14 AM2022-04-18T09:14:37+5:302022-04-18T09:19:32+5:30
महापुरुषांच्या प्रतिमांची पूजा, उत्सव, मिरवणुका हे एवढे पुरेसे असते? त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालतो आहोत का आपण?
विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -
गत सप्ताहात मी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव रामनवमी, जन्मकल्याणक भगवान महावीरांची जयंती आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. त्यावेळी माझ्या मनाला एक प्रश्न सारखा टोचत होता : या महान विभुतींच्या आठवणींचा एवढा उत्सव केला जातो, पण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने लोक का जात नाहीत? पूजा करणे, उत्सव साजरा करणे, मिरवणुका काढणे, महापुरुषांच्या जीवनातील प्रसंगांची चर्चा करणे, एवढे पुरे होते? हे महत्त्वाचे दिवस केवळ कर्मकांड का झाले आहेत? प्रेरणादायी गोष्टी नजरेआड का झाल्या असतील?
- स्वामी विवेकानंद यांच्यापासून महात्मा गांधींपर्यंत सर्वांच्याच विचारांचे हेच झाले. खरेतर महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्याने लोकांनी जावे. येणाऱ्या पिढ्या त्यांच्या विचाराने प्रेरित व्हाव्यात, याच हेतूने महापुरुषांचे जन्मदिवस साजरे करणे सुरु झाले असावे. पण, काळाबरोबर मोठमोठ्या आयोजनाच्या धामधुमीत महापुरुषांचे विचार मात्र वाहून गेल्याचे दिसते. ज्या मार्गाने जायचे होते, लोकांनी ते मार्गच सोडून दिले. जुना दाखला द्यायचा तर रामाने अन्यायाविरुध्द लढण्यासाठी, वनवासींच्या उत्थानासाठी, राक्षसी प्रवृत्ती संपवण्यासाठी सारे जीवन अर्पण केले. न्यायाचा आदर्श निर्माण केला. माता सीतेबद्दल कोण्या नगरजनाकडून काही बोलले गेले तर तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली.
भिल्लिणीची बोरे खाऊन रामाने वर्णव्यवस्थेविरुध्द संदेश दिला. रामाचे हे संदेश आपण आत्मसात केले का? त्यांच्या राज्यात सारे आनंदी, सुखसोयींनी सज्ज होते असे म्हणतात. आजही रामराज्याच्या गोष्टी होतात. पण आपल्या शासन व्यवस्थेने रामाच्या व्यवस्थेतील सद्गुण अंगीकारले का?
भगवान महावीरांनी अहिंसा, क्षमा, दया, मानवता, निसर्गाचे रक्षण या गोष्टींचा पुरस्कार केला. अपरिग्रहाचा सिद्धांत मांडला. वैज्ञानिक जीवनप्रणालीचा रस्ता दाखवला. परंतु आपण त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने जात आहोत का? - महापुरुष कोणीही असो, कोणत्याही धर्माचे असोत, त्यांचे विचार सर्व जगासाठी असतात. त्यांच्या विचारांना धर्माच्या दोरीने बांधता येत नाही. भगवान महावीरांनी अहिंसा सांगितली असेल तर ती सर्व जगासाठी सांगितली. आज आपण सर्व त्यांच्या विचारांची प्रशंसा करतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही सत्य आणि अहिंसेचा पुरस्कार केला. मात्र, आज सर्वत्र हिंसेचाच बोलबाला आहे. चोरी, दरोडे, लूट, कारस्थानांना ऊत येऊन समाज नरकात चालला आहे. सत्याचा अपलाप हा नित्याचा अनुभव होऊन बसला आहे. सत्य गायब होताना दिसतेय. ज्या अहिंसेच्या बळावर बापूंनी ब्रिटिश साम्राज्य हिंदुस्थानातून उखडून फेकले, ती अहिंसा धोक्यात आहे. लोक अत्यंत असहिष्णू झाले आहेत. छोट्या छोट्या गोष्टीत धर्म आणतात. सध्या रमझानचा महिना चाललाय. जीवनात आपण शुद्धता आणावी, एकमेकांना गळ्याशी धरावे आणि प्रेमाचा प्रकाश पसरवावा, यापेक्षा चांगले आणखी काय असू शकते?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना तयार करताना प्रमुख भूमिका पार पाडली. समतामूलक समाजाची शिकवण दिली. पण दुर्भाग्य असे, की आपण त्यांच्या भरपूर मूर्ती स्थापित केल्या. मात्र, समतेच्या रस्त्याने ज्या गतीने जायला हवे होते त्या गतीने काही गेलो नाही. बाबासाहेबांच्या विलक्षण प्रतिभेमुळेच देशाने त्यांना महामानव म्हटले. त्यांच्या अनुयायांची संख्या वाढत गेली. त्यांच्या योगदानाची सर्वांनी प्रशंसा केली. त्यांच्या विचारांनी भारत बदलेल असे म्हटले, समाज आणि शासनाने त्यांची पूजा केली, त्यांना नमन केले. पण, त्यांच्या रस्त्याने कोणीच योग्य रितीने गेले नाही. बाबासाहेबांची शिकवण केवळ हिंदुस्थानसाठी नव्हे, तर पूर्ण जगासाठी आहे. आज संपूर्ण आफ्रिका असमानतेच्या आगीत होरपळताना आपण पाहतो आहोत. अत्यंत प्रगत अशी अमेरिकाही वंशभेदाच्या दोरखंडाने जखडलेली आहे.
बाबासाहेबांची शिकवण प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प देशाने, जगाने केला असता, तर जाती प्रथा आपण कधीच समाप्त केली असती. मानवता हाच धर्म असल्याचे बाबासाहेब म्हणाले होते. शासन व्यवस्था चांगली करण्याचा रस्ता त्यांनी दाखवला होता. आपण त्याचाही पूर्ण अंगिकार केला नाही. यासाठी कुठल्याही एका सरकारला दोषी ठरवणे उचित नाही.
केंद्रात आधी काँग्रेसची सत्ता होती. आज भाजपाची आहे. राज्यांमध्ये कोठे डावे आहेत, तर कोठे आम आदमी किंवा तृणमूल. सत्ता बदलत राहतात. मुद्दा चांगल्या शासन प्रणालीचा आहे. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि जैन आचार्य महाप्रज्ञजीनी संयुक्तपणे जीवन विज्ञान प्रकल्प आपल्याला दिला. परंतु लोकांनी दृढतेने त्याचे अनुसरण केले नाही. सद्गुणांची शिकवण जीवनात उतरविण्यात शिक्षण व्यवस्था अपयशी झाली. प्रत्येक धर्म आणि महापुरुषाने आपल्याला प्रेमाची भाषा शिकवली. सुखमय जीवनाचे सार आपल्याला सांगितले. पण, आपण ती शिकवण बाजुला ठेवली. महापुरुषांना पाठ्यपुस्तके आणि कार्यक्रमात बंद केले. परिणाम समोर आहे... माणसाला माणूसच जिवंत जाळत सुटला आहे. धर्माच्या नावावर कत्तली होत आहेत. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ ही म्हण खरी ठरते आहे. जो बलवान आहे तो हल्लेखोर झालाय. वास्तविक, जितकी शक्ती तितकी विनम्रता असे असायला हवे होते. बलवानांमध्ये करुणा असावी, क्षमाभाव असावा, अहिंसा असावी... ते नाही! आपण अधिकाधिक हिंसक होत चाललो आहोत... पुढच्या पिढीच्या हाती आपण काय तऱ्हेचे, कशा स्वभावाचे जग सोपवणार आहोत?... एकदा जरूर विचार करा. आपल्यापैकी प्रत्येकाने केलेली एखादी छोटी सुरुवात परिवर्तनाचे साधन होऊ शकते.