हिजाबविरोधी आंदोलनाची धग विश्वचषकाच्या मैदानापर्यंत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 09:44 AM2022-11-24T09:44:09+5:302022-11-24T09:44:44+5:30
आपल्या देशातील महिलांच्या हिजाबविरोधी आंदोलनाला बळ देताना विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत इराणच्या खेळाडूंनी आपल्याच देशाचे राष्ट्रगीत गायला नकार दिला.
किशोर बागडे, उपमुख्य उपसंपादक, लोकमत, नागपूर -
मागील काही दिवसांपासून इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे वारे कतारमध्ये सुरू झालेल्या फुटबॉल विश्वचषकापर्यंत पोहोचले. सोमवारी इराणचा इंग्लंडविरुद्ध सामना झाला; पण इराणच्या खेळाडूंनी मैदानावर उतरल्यानंतर आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायले नाही. इराणचं राष्ट्रगीत संपेपर्यंत सर्व खेळाडू भावहीन चेहऱ्याने मैदानावर उभे होते. या माध्यमातून त्यांनी हिजाबवरून सुरू असलेल्या वादावर न बोलताच बरेच भाष्य केले. फुटबॉलपटूंच्या या कृत्यामुळे जगभरात इराणविरोधी निदर्शनांची आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. ही निदर्शने चिरडून टाकण्यासाठी इराणचे इस्लामिक सरकारही मोठ्या प्रमाणात दडपशाहीचा वापर करेल, अशी भीती व्यक्त होत आहे. या घटनेची पार्श्वभूमी अशी की, कुर्द वंशाची २२ वर्षीय तरुणी अमिनी हिजाब परिधान करून रस्त्याने जात होती; पण तिने इराणच्या इस्लामिक नियमांनुसार हिजाब परिधान केला नव्हता, या आरोपावरून इराण पोलिसांनी अमिनीला अटक केली. तुरुंगात डांबून तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला. या घटनेचे जगभर पडसाद उमटले आणि हिजाबविरोधी आंदोलनाला सुरुवात झाली.
या अभूतपूर्व संघर्षात आबालवृद्ध महिला आणि विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पुरुष खेळाडूसुद्धा सामील झाले. इराणच्या खेळाडूंनी न डगमगता या संघर्षातल्या स्त्रियांना जो पाठिंबा दिला, त्याचे सर्वत्र स्वागत होताना दिसतेय. अर्थात देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान न राखल्याबद्दल त्यांच्यावर काही जणांकडून टीकाही होतेय. इराणमधील हिजाबविरोधी संघर्षाला कोणी नेता नाही. चळवळीच्या केंद्रस्थानी स्त्रिया आहेत. न घाबरता हिजाबची त्या होळी करत आहेत, केस कापून आगीत टाकत आहेत. मुस्लीमबहुल देशात स्त्रिया पुढे आणि पुरुष त्यांच्यामागे उभे आहेत, हे चित्र नवी उमेद निर्माण करणारी आहे.
काही दिवसांपूर्वी इराणचे बास्केटबॉलपटू आणि जलतरणपटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अशीच भूमिका घेतली होती. आंतरराष्ट्रीय मंचावरून आपल्याच देशाच्या सरकारला विरोध केल्यामुळे खेळाडूंवर कठोर कारवाई होऊ शकते. या खेळाडूंविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. त्यांना एकतर तुरुंगाची हवा खावी लागेल किंवा सरकार त्यांना नजरकैदेत ठेवेल.
इराणमधील हिजाबबंदीचे लोण भारतातही पोहोचले आहे. दोन आठवड्यांआधी केरळमधील कोझिकोडमध्ये हिजाबची जाळपोळ करीत महिलांनी तीव्र आंदोलन केले. धार्मिक दंडुकेशाही सुरू झाली की, एक ना एक दिवस जनता त्याविरोधात बंड करून लोकशाही स्वातंत्र्याची मागणी करते, याची ही घटना साक्ष देते. मात्र, यामुळे राष्ट्राध्यक्ष रईसी यांचे लगेचच मतपरिवर्तन होण्याची शक्यता नाहीच. मूलतत्त्ववादाचे वारे डोक्यात शिरले की, माथी उलट्या दिशेनेच प्रवास करू लागतात. एकेकाळी महिलांना स्वातंत्र्य देणाऱ्या राष्ट्राचा हा अधोगतीचाच प्रवास आहे. मात्र, इंग्लंडविरोधातील सलामीचा सामना इराणने गमावला असला तरी लोकशाही मूल्यांवर श्रद्धा असलेल्या आणि महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आग्रही असलेल्या कोट्यवधी जनतेची मने या धाडसी खेळाडूंनी जिंकली, यात शंका नाही.
जाता जाता...
विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेंटिनाला आशियाई संघ सौदी अरेबियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. या निकालानंतर अर्जेंटिनाला फारशा संधी नाहीत. सौदी अरेबियाने त्यांच्या फुटबॉल इतिहासातील सर्वांत मोठा विजय साकारला. या एका विजयासाठी सौदी अरेबियाच्या राजाने बुधवारी संपूर्ण देशभरामध्ये सुट्टी जाहीर केली होती.