‘जनां’चे ‘मन’ आणि हरवलेली ‘गण’ भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 10:09 AM2024-01-03T10:09:44+5:302024-01-03T10:10:20+5:30
जनतेचे मन आणि मत यात सामंजस्य नाही. त्यांना जोडणारा पूल नाही. गणतंत्राचे अपहरण रोखण्याची कोणतीही व्यवस्था दुर्दैवाने देशात नाही.
योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोडो अभियान
जनांच्या मनाला गण म्हणजेच प्रजासत्ताकाचा जो भाव आहे त्याच्याशी जोडणे हे आज भारतापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. चहूकडे जन आहेत. जनतेचेच राज्य आहे. या जनांचे मनही असणार, हे तर उघड आहे. जनांकडे आपल्या मनातले सांगण्यासाठी एखादा मंच भले नसेल; परंतु ‘जनमत’ काय आहे हे सांगणाऱ्या भोंदू मंडळींची संख्याही कमी नाही. टीव्ही, वर्तमानपत्रे, समाजमाध्यमे सगळीकडेच हल्ली जनमताचे दावेदार आढळतात. परंतु जनतेचे मन आणि मत यात हल्ली फारसे सामंजस्य उरलेले नाही. जनमानस आणि जनमत यांना जोडणारा एकही मजबूत असा पूल नाही. जनतेचे मन आणि मतावर गणाचे संस्कार करण्याचा कोणताही मार्ग नाही. गणांच्या नावे गर्दी आणि तंत्रज्ञानामार्फत गणतंत्राचे अपहरण रोखण्याची कोणतीही व्यवस्था दुर्दैवाने नाही आणि हेच देशापुढचे आजचे आव्हान सर्वात मोठे आहे.
यावेळी दिल्लीत देशाचा पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिन साजरा होईल; त्याच्या चार दिवस आधी अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन होईल. प्रजासत्ताक दिनावर या सोहोळ्याचे सावट नक्की असेल. घटनात्मक लोकशाही व्यवस्थेतले पंतप्रधान दि. २२ जानेवारीला अयोध्येत राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे यजमान असतील.
त्यांच्याबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल उपस्थित राहतील. मर्यादा पुरुषोत्तम रामाचे नाव असेल; परंतु काम होईल ते मतपेटीचे. जनमानसातील आस्थेचे दोहन करून प्रसारमाध्यमांद्वारे जनमतावर कब्जा केला जाईल आणि प्रजासत्ताकाचे अपहरण होईल.
- अशावेळी आपण भारताच्या प्राचीन संस्कृतीची आठवण ठेवून जनमानसातील दबलेले, लपलेले संस्कार जागृत करून प्रजासत्ताकाची जबाबदारी उचलली पाहिजे. ‘भारतीय वारसा’ जपण्याच्या नावाखाली जनमानसाची दिशाभूल करण्याच्या राजकीय खेळाचे प्रभावी उत्तर हेच असू शकते.
यादृष्टीने प्रजासत्ताकाचे संस्कार जागे करण्यासाठी जानेवारी महिना अत्यंत उपयुक्त आहे. या महिन्यात देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा होतो म्हणूनच केवळ नव्हे तर आपल्या प्रजासत्ताकाचा मूळ भाव प्रकट करणाऱ्या इतर अनेक गोष्टीही या महिन्यात येतात, म्हणून ! देशात राज्यघटनेचा अंमल सुरू होण्याचा हा दिवस असल्याने आपल्या घटनेची प्रस्तावना आणि त्यात अभिप्रेत मूल्यांची आठवण ठेवण्याचा हा दिवस आहे. त्याबरोबरच आपण हेही विसरता कामा नये की घटना सभेद्वारे दि. २६ नोव्हेंबरला संमत झालेली भारतीय राज्यघटना दि. २६ जानेवारीपासून लागू करण्याचा निर्णय राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात पूर्ण स्वराज्याचा ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून घेतला गेला होता.
जानेवारीचा महिना स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांची आठवण करून देतो. दि. २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती येते. त्यांच्या आझाद हिंद सेनेत सर्व धर्म आणि संप्रदायांचे भारतीय सैनिक सहभागी होते. दि. २० जानेवारीस खान अब्दुल गफारखान तथा सरहद गांधी यांची जयंती असते. अहिंसेच्या मार्गाने केलेल्या संघर्षाची ताकद किती असते याची स्मृती हा दिवस जागवतो. दि. ९ जानेवारी हा ‘उलगुलान’ या आदिवासी विद्रोहाचा दिवस. लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी दि. ११ जानेवारीला येते. ती आपल्याला मर्यादांचे महत्त्व सांगते. जानेवारीचा महिना सामाजिक न्यायाच्या घटनात्मक मूल्यांची आठवण काढण्याचा काळ आहे. दि. ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले आणि दि. ९ जानेवारीला फातिमा शेख यांची जयंती येते. स्त्रीशिक्षण आणि स्वातंत्र्याचे आंदोलन यांना जोडणारे हे दोन दिवस आहेत. दि. १७ जानेवारीला रोहित वेमुला याने केलेले प्राणार्पण आपल्याला हेच सांगते की सामाजिक न्यायाचा लढा आजही अपूर्ण आहे. ‘इन्कलाब जिंदाबाद’ची घोषणा देणाऱ्या हसरत मोहानींची जयंतीही याच महिन्यात दि. १ जानेवारी रोजी असते.
जानेवारी महिना आपल्या देशातील धर्म आणि संस्कृतीचे उदार स्वरूप समजून घेण्याचा काळ आहे. देशात दि. १३, १४ आणि १५ जानेवारीला संक्रांतीच्या निमित्ताने वेगवेगळे सण साजरे केले जातात; ते कोणत्याही धर्माशी किंवा जातीशी जोडलेले नाहीत. हिंदू धर्माची उदात्त व्याख्या करणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती दि. १२ जानेवारीला असते. गुरुगोविंद सिंह यांची जयंती दि. १७ जानेवारी रोजी गुरुपर्व म्हणून साजरी केली जाते.
महात्मा गांधींची पुण्यतिथीही दि. ३० जानेवारीला असते. या महिन्यातले सगळे धागे हा दिवस आपल्या प्रजासत्ताकाशी जोडून देतात. रामाच्या भक्ताची जहालमतवादाने केलेली हत्या रामाच्या नावावर सध्या चाललेल्या राजकारणाकडे बोट दाखविते. आपली परंपरा आणि संस्कृतीच्या सर्वोच्च मूल्यांना गांधीजींचे जीवन सर्वधर्मसमभावाशी जोडते. २०२४ हे वर्ष भारतीय प्रजासत्ताकाच्या इतिहासात एक निर्णायक वर्ष असेल. या देशाची दशाच नव्हे तर त्याची दीर्घकालीन दिशा हे वर्ष निश्चित करील. या वर्षाची सुरुवात ‘जन गण मन अभियाना’ने करणे हेच आपल्या प्रजासत्ताकाच्या भविष्यासाठीचे खरेखुरे योगदान ठरेल.