म्हातारपण सुखात घालवण्याचा ‘ब्रिटिश मार्ग’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 08:46 AM2023-09-01T08:46:29+5:302023-09-01T08:46:37+5:30
लंडनमधील ‘न्यू ग्राउंड’ या को-हाऊसिंगमध्ये एकूण २५ फ्लॅट्स आहेत. इथे एका विवाहित जोडप्यासह एकूण २६ रहिवासी आहेत.
दिवसागणिक वयोवृद्ध होत जाणारी माणसं आणि त्यांची काळजी घेण्याच्या ओझ्याखाली दबलेली तरुण पिढी हे आजच्या काळातील जागतिक चित्र झाल्यासारखी परिस्थिती आहे. त्या-त्या देशातील संस्कृती आणि सामाजिक संकेत जसे असतील त्याप्रमाणे वृद्ध व्यक्तींची सोय लावली जाते. काही देशांमधे पुढची पिढी वृद्ध आई-वडिलांबरोबर राहते आणि त्यांची काळजी घेते. या प्रकारच्या व्यवस्थेत कमावत्या पिढीवर त्याचा विलक्षण ताण असतो. याउलट काही देशांमध्ये वृद्ध लोक किंवा ज्येष्ठ नागरिक स्वतंत्रपणे राहतात आणि पुढची पिढी स्वतंत्रपणे जगते. यात सगळ्यांना स्वातंत्र्य मिळत असलं, तरी जसं पालकांचं वय वाढत जातं, वयोमानानुसार येणारी दुखणी मागे लागतात तशी कमावत्या पिढीची फरपट सुरू होते. दूर राहणाऱ्या आई-वडिलांची नीट काळजी घेता येत नाही, आई-वडील मुलांच्या घरी (जी अनेकवेळा स्वतःच पन्नाशीला आलेली असतात.) जमवून घेऊ शकत नाहीत आणि मग सगळीच गडबड होऊन बसते.
या परिस्थितीवर को-हाऊसिंग या पर्यायाचा जगभरात गेली अनेक वर्षे विचार केला जातो आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एकत्र राहता येईल अशी गृहनिर्माण संस्था; मात्र इंग्लंडमध्ये या प्रकारच्या गृहनिर्माण संस्थेचं एक वेगळं स्वरूप आकाराला आलं आहे. ते म्हणजे ‘न्यू ग्राउंड’ नावाची फक्त महिलांसाठी असलेली को-हाऊसिंग सोसायटी. हे वृद्धाश्रम नाही, नर्सिंग होमही नाही किंवा नुसती अपार्टमेंट्स असलेली सोसायटीदेखील नाही. तर यामध्ये प्रत्येक सदस्याला दोन खोल्यांचा फ्लॅट स्वतंत्रपणे मिळतो आणि इतर सुविधा मात्र शेअर करून वापराव्या लागतात. इथे एक मोठी टीव्ही रूम आहे. फिरायला लॉन आहे. गप्पा मारायला मोठी खोली आहे. इथे एकत्र मूव्ही नाईट केली जाते आणि योगाचे वर्ग घेतले जातात. अनेक सोयीसुविधा इथे आहेत आणि मुख्य म्हणजे एकमेकींची सोबत आहे. इथे राहणाऱ्या महिलांचा वयोगट ५८ ते ९४ असा आहे.
म्हणजेच काही जणी नुकत्याच सेवानिवृत्तीच्या वयाच्या आहेत, तर काही जणी अगदी वृद्ध म्हणता येईल अशा वयाच्या आहेत; मात्र वयाने ज्येष्ठ नागरिक असल्या, तरी यापैकी अनेकजणी अजूनही नियमित काम करतात. तर काही जणी स्वयंसेवक म्हणून काम करतात. तिथे राहणाऱ्या ज्यूड तिसदाल ७१ वर्षांच्या आहेत आणि आर्ट कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्या म्हणतात, “आम्हा सगळ्यांची वयं जास्त आहेत हे खरं असलं, तरी आम्हाला कोणी सहज ‘म्हाताऱ्या बाया’ असं म्हणू शकणार नाही.”
इथे एकमेकींची काळजी घेण्यासाठी हेल्थ बडी नावाची कल्पना इथे राहणाऱ्या महिलांनी ठरविली आहे. यात २ किंवा ३ इतर महिलांचा गट असतो. प्रत्येक गटातील महिला आपल्या गटातील इतर महिलांची नियमितपणे चौकशी करतात. त्यांच्यापैकी कोणाला जर बिछान्याला खिळवून ठेवणारं आजारपण असेल, एखादीची काही शस्त्रक्रिया झाली असेल तर गटातील इतर महिला तिच्यासाठी त्या काळापुरता स्वयंपाक करतात.
ज्यूड तिसदाल एकदा पडल्या आणि त्यांच्या खांद्याचं हाड मोडलं. त्यावेळी त्यांना या सिस्टीमचा खूप फायदा झाला. त्या म्हणतात, “माझी मुलगी आणि नात भेटायला येऊन गेल्या; पण मला जेवण मिळालं असेल का? प्यायला पाणी द्यायला कोणी असेल का? असल्या किरकोळ गोष्टींची त्यांना काळजी करावी लागली नाही. इथे मला लागेल त्या वस्तू आणून द्यायला आणि गप्पा मारत एखाद्या वाइनच्या ग्लाससाठी सोबत करायला मैत्रिणी आहेत.”
इथे येण्यापूर्वी बंदिस्त फ्लॅटमध्ये एकट्या राहणाऱ्या राहणाऱ्या बालाझ नावाच्या बाई म्हणतात, “कोरोनाच्या काळात इथे राहणं हे किती मोठं सुख आहे, हे माझ्या लक्षात आलं. इथे आम्ही रोज एकमेकींना भेटू शकायचो. मी त्या काळात इथे राहात नसते तर मला वेड लागलं असतं.”
अर्थात, या पद्धतीने एकत्र राहण्यात सगळं फक्त सोयीचंच असतं का? काहीच गैरसोय नसते का? तर अर्थातच तसं नाही. वर्षानुवर्षे आपल्या स्वतंत्र घरात राहण्याची सवय झाल्यावर अनेक निर्णय सगळ्यांच्या संमतीने घेणं या गोष्टीशी जुळवून घ्यावं लागलं; पण इथे राहणाऱ्या बहुतेक जणी म्हणतात तसं, “जुळवून तर सगळीकडेच घ्यावं लागतं; पण इथे जुळवून घेणं आनंददायी आहे.”
...इथे फक्त स्त्रिया राहतात!
लंडनमधील ‘न्यू ग्राउंड’ या को-हाऊसिंगमध्ये एकूण २५ फ्लॅट्स आहेत. इथे एका विवाहित जोडप्यासह एकूण २६ रहिवासी आहेत. इथे फक्त स्त्रिया राहतात आणि त्याच सगळी कामं करतात. इथे राहणाऱ्या स्त्रियांचे पुरुष नातेवाईक त्यांना भेटायला येऊ शकतात; मात्र राहायला येऊ शकत नाहीत. सध्या ब्रिटनमध्ये को-हाऊसिंग या प्रकारची एकूण ३०२ घरं आहेत.