Cryptocurrency: अमेरिकेत ‘एफटीएक्स’चे दिवाळे : ‘क्रिप्टोकरन्सी’ स्वनाशाच्या मार्गावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 10:29 AM2022-11-17T10:29:05+5:302022-11-17T10:29:38+5:30

Cryptocurrency: अमेरिकेतील ‘एफटीएक्स’ नावाचा क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणारा बाजार एका रात्रीत उद्ध्वस्त झाला; आता जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये धास्ती आहे!

The bust of 'FTX' in America: 'Cryptocurrency' on the road to self-destruction? | Cryptocurrency: अमेरिकेत ‘एफटीएक्स’चे दिवाळे : ‘क्रिप्टोकरन्सी’ स्वनाशाच्या मार्गावर?

Cryptocurrency: अमेरिकेत ‘एफटीएक्स’चे दिवाळे : ‘क्रिप्टोकरन्सी’ स्वनाशाच्या मार्गावर?

googlenewsNext

- प्रा. नंदकुमार काकिर्डे
(अर्थविषयक पत्रकार)
गेल्या सप्ताहात अमेरिकेतील ‘एफटीएक्स’  नावाचा  आभासी चलनाचा  म्हणजे क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणारा बाजार एका रात्रीत उद्ध्वस्त झाला. ‘एफटीएक्स’ने दिवाळे जाहीर केले. लाखो गुंतवणूकदारांच्या आभासी  चलनातील गुंतवणुकीची माती झाली. जगभर खळबळ माजली. या घटनेनंतर आभासी चलनाच्या मृगजळामागे धावणारा भारतीय गुंतवणूकदार, त्याचे देशातील नियंत्रक जागे होतात किंवा कसे हे पाहणे महत्त्वाचे आहे.  

तरुण पिढी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळी  गुंतवणुकीचा नवा पर्याय म्हणून क्रिप्टोकरन्सीच्या प्रेमात  आहेत. इथेरियम, बिटकॉइन, डीजीकॉइन इत्यादि विविध  नावांच्या क्रिप्टोकरन्सी जगभर अस्तित्वात आहेत. क्रिप्टोकरन्सी ही महाशक्तिशाली संगणकाद्वारे ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून आभासी स्वरूपात निर्माण केली जाते. म्हणजे ती प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. या चलनाची खरेदी- विक्री करणारे ऑनलाइन बाजार भारतासह जगभर आहेत. एफटीएक्स हा तशांपैकी एक बाजार! या बाजाराचे दिवाळे निघाल्याने या आभासी चलनाचे जग हादरले आहे. ‘एफटीएक्स’चे मध्यवर्ती कार्यालय बहामा येथे. गेल्या सप्ताहात हा बाजार बंद पडला. बाजाराच्या प्रवर्तकांनी म्हणजे सॅम बॅकमन फ्राइडने दिवाळखोरी जाहीर केली.  गुंतवणूकदारांची क्रिप्टोतील कोट्यवधी डॉलर्सची  गुंतवणूक मातीमोल झाली.  या घडामोडींमुळे आभासी चलनाचे धिंडवडे जगासमोर येत आहेत. काही तज्ञांच्या  मते या आभासी चलनाची स्वविनाशाकडे वाटचाल सुरू झाली आहे.  

३० वर्षे वयाच्या सॅमने एफटीएक्स उभारले. त्याला ‘क्रिप्टो विझ किड’ अशी पदवी दिली गेली. त्याने इतक्या छोट्या वयात ई फायनान्स क्षेत्रात क्रांती केल्याचे बोलले गेले. भल्या भल्या धुरिणांना त्याची भूरळ पडली. त्याने या बाजाराचे मोठे साम्राज्य उभे केले; पण ते पत्त्याच्या बंगल्यासारखे  तकलादू होते, हे ते कोसळल्यानंतरच लक्षात आले. त्याने या बाजारात व्यवहार करणाऱ्यांना भरपूर लालूच दाखवली, सवलती दिल्या. या सॅमने अलामेडा रिसर्च नावाची दुसरी कंपनी उभारली. त्याच्या सुमारे १३० कंपन्या आहेत. त्यात काही तरुण भारतीय बुद्धिमान तंत्रज्ञ आहेत. त्या कंपनीला एफटीएक्समधून कर्ज दिले. त्यासाठी सुरक्षा म्हणून एफटीएक्सचेच आभासी चलन तारण  ठेवले. आयजीच्या जिवावर बायजी उदार या नात्याने. गुंतवणूकदारांना त्याचा वास लागला. मग गुंतवणूकदार बाहेर पडण्यासाठी धावले. त्याचे पर्यवसान या बाजाराचे दिवाळे निघण्यात झाले. सॅमने माफी मागितली; पण त्याचा काय उपयोग?
अलीकडेच टेस्ला कंपनीच्या इलॉन मस्क यांनी प्रचंड रक्कम देऊन खरेदी केलेल्या ट्विटरची वाट लावण्यास प्रारंभ केला. दुसरीकडे फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग त्यांचीच ‘री’ ओढत आहे. सॅमच्या कृत्यामुळे आभासी चलनाचे विश्व डळमळीत झाले आहे. त्याला कोणताही कायदा नाही. कोणी जबाबदार नाही. कोठेही  लिखापढी नाही. सारेच आभासी, गुंतवणूकदारांना घातलेला गंडा मात्र खरा. गुंतवणूकदारांची माती करणारा. त्याला वाचवण्याचे प्रयत्न बायनान्स या दुसऱ्या प्रतिस्पर्धी बाजाराने केले; पण त्यांनी या बुडत्या जहाजाची एवढी मोठी गळती पाहिल्यावर काढता पाय घेतला. 

भारतात रिझर्व्ह बँकेने  आभासी चलनाला म्हणजे क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिलेली नाही. आपल्याकडे क्रिप्टोकरन्सीच्या जाहिराती, प्रसार, व्यवहार  राजरोस सुरू आहेत. भारतीय शेअर बाजार, सोनेचांदी बाजार,  कमोडिटी  बाजार यांना सेबीसारखे नियंत्रक आहेत; पण क्रिप्टोकरन्सीला मात्र नियंत्रक नाही. रिझर्व्ह बँकच ती भूमिका पार पाडत आहे. केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक यांनी एफटीएक्सच्या दिवाळ्यातून योग्य तो धडा घेऊन भारतात या आभासी चलनाचे कडक व योग्य ते नियंत्रण करण्याची हीच वेळ आहे. त्यातील नफ्यावर जबरी प्राप्तीकर लावलेला आहे. मात्र, हे नियंत्रण पुरेसे नाही. त्यासाठी प्रागतिक तंत्रज्ञान धोरण, त्याची भक्कम कायदेशीर चौकट निर्माण केली पाहिजे.

आपल्या देशाला आर्थिक गैरव्यवहारांची मोठी राजकीय परंपरा आहे. शेअर बाजारातही अनेक घोटाळे, गैरव्यवहार झाले. प्रत्येक वेळी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फटके बसले. या आभासी चलनाच्या बाबतीतही काही घोटाळे, गैरव्यवहार होऊ नये, यासाठी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने सक्रिय व्हावे, एवढीच माफक अपेक्षा....

Web Title: The bust of 'FTX' in America: 'Cryptocurrency' on the road to self-destruction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.