वाचनीय लेख : खुर्चीने केले खुर्चीलाच लक्ष्य!

By विजय दर्डा | Published: February 5, 2024 08:18 AM2024-02-05T08:18:03+5:302024-02-05T08:19:07+5:30

लक्षद्वीपच्या विलक्षण देखण्या समुद्रकिनाऱ्यावर नरेंद्र मोदी विसावले काय, मालदीवमधले मुईज्जू यांचे अख्खे सरकारच धोक्यात आले!

The chair made the chair the target, maldive and lakshdweep parliment conflict after modi viral photos | वाचनीय लेख : खुर्चीने केले खुर्चीलाच लक्ष्य!

वाचनीय लेख : खुर्चीने केले खुर्चीलाच लक्ष्य!

डाॅ. विजय दर्डा 

राजकीय कूटनीतीच्या इतिहासात बहुधा असे कधीच घडले नसेल की, एखादा पंतप्रधान आपल्या देशाच्या समुद्रकिनाऱ्यावर खुर्चीत आरामशीर बसला, त्याने सहज समुद्रात एक डुबकी मारली आणि त्याच्या लाटा इतक्या तीव्रतेने पसरल्या की, जवळपास ८०० किलोमीटर अंतरावरच्या एका देशाच्या राष्ट्रपतींची खुर्चीच धोक्यात आली. वाक्प्रचाराच्या भाषेत सांगायचे तर ‘खुर्चीने खुर्चीला लक्ष्य केले.’

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीलक्षद्वीपला पोहोचले तेव्हा कूटनीतीच्या समुद्रात अशा लाटा निर्माण होतील, याचा कोणालाही अंदाज नव्हता. या लाटांचा प्रभाव पहा, एका महिन्याच्या आत मालदीवचे राष्ट्रपती मुईज्जू यांच्यावर महाअभियोग चालवण्याची तयारी सुरू झाली आहे. मुईज्जू यांची खुर्ची धोक्यात आली आहे. भारत आणि मालदीव यांच्यामधील या कटू प्रसंगाच्या निमित्ताने मला मालदीवचा  दौरा आठवला. त्या प्रवासात  तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल गयूम यांच्याशी माझी भेट झाली होती. ‘साऊथ एशिया एडिटर्स फोरम’चा अध्यक्ष या नात्याने मालदीवमध्ये मी एक बैठक आयोजित केली होती. आम्ही काही पत्रकारांनी अब्दुल गयूम यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला, भेटीची वेळ मागितली. आम्हाला बोलावणेही आले. गयूम आणि त्यांच्या पत्नी नसरीन इब्राहिम यांनी आमचे उत्तम स्वागत केले. आम्हाला त्यांच्या घरी मेजवानीही दिली. त्यावेळी बोलताना गयूम दाम्पत्य आनंदाच्या स्वरात सांगत होते, ‘भारत आणि मालदीव यांचे संबंध चुंबकासारखे आहेत. दोन्ही देश एकमेकांपासून दुरावून स्वतंत्रपणे चालण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाहीत. भारत मालदीवचा अत्यंत घनिष्ठ मित्र आहे.’

- मग आत्ताच असे काय घडले ज्यामुळे मालदीवचे सध्याचे राष्ट्रपती मुइज्जू वेगळ्या वाटेने निघाले? गयूम यांच्यानंतर मोहम्मद नाशीद यांच्यापासून इब्राहिम सोलीह यांच्या कारकिर्दीपर्यंत भारताबरोबर घनिष्ठ मैत्री राहिली. मालदीवमध्ये अशी परंपरा आहे की, निवडून आल्यानंतर प्रत्येक राष्ट्रपती पहिल्यांदा भारत भेटीवर जातात. कारण दोन्ही देशांमधले स्नेहपूर्ण संबंध! खरंतर, अनेक बारीकसारीक गोष्टींच्या बाबतीत भौगोलिक अर्थाने मालदीव भारतावर अवलंबून आहे. परंतु, मुईज्जू यांनी परंपरा तोडली. ते पहिल्यांदा तुर्कस्तानला गेले. नंतर संयुक्त अरब अमिरातीत आणि त्यानंतर भारताचा सगळ्यात मोठा शत्रू चीनमध्ये पोहोचले. चीनच्या मांडीवर तर ते आधीपासूनच खेळत आले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी ‘भारत हटाओ’ असे लिहिलेला टी-शर्ट घातला होता. निवडून आलो, तर भारतीय सैनिकांना मालदीवच्या बाहेर हाकलण्याची भाषाही त्यांनी केली होती. भारताने समुद्रावरील देखरेख, शोधकार्य आणि मालदीवच्या लोकांना आणीबाणीच्या वैद्यकीय मदतीसाठी दोन हेलिकॉप्टर्स आणि एक विमान दिलेले आहे. त्यांची देखभाल आणि संचलनासाठी  काही भारतीय सैनिक तेथे आहेत. मार्चपर्यंत त्यांना हटवण्याची घोषणा मुईज्जू यांनी केली आहे.

या सगळ्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सुंदर अशा लक्षद्वीप बेटाला भेट दिली. तेथे त्यांनी स्नोर्कलिंग केले आणि थोडावेळ ते समुद्राच्या किनाऱ्यावर बसले. ‘आपल्या देशाच्या अतीव सुंदर समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटा,’ असे आवाहन त्यांनी केले. यानंतर मुइज्जू यांच्या एक मंत्री मरियम शिवना यांनी मोदी यांच्यावर काही शेरेबाजी केली. माल्शा शरीफ आणि मह्जुम माजिद यांनीही भारताविरुद्ध विधाने केली. यातून वाद निर्माण होऊन ‘मालदीववर बहिष्कार टाका,’ अशी मागणी समाजमाध्यमांवर जोरात होऊ लागली. एका भारतीय पर्यटन कंपनीने तर मालदीवसाठी झालेले सर्व बुकिंग रद्द करून टाकले. डिसेंबर २०२३ पर्यंत भारतीयांच्या पर्यटन नकाशावर मालदीव पहिल्या क्रमांकावर होते. मालदीवचा पर्यटन उद्योग या घडामोडींमुळे घाबरून जाईल, हे स्वाभाविकच होते. पर्यटन उद्योगाच्या दबावाखाली मुइज्जू यांना आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित करावे लागले. परंतु, त्यांनी त्यांना काढून टाकले नाही. 

मुईज्जू यांच्या भारतविरोधी पवित्र्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवरून मालदीवमध्ये बेचैनी पसरली. सर्व दैनंदिन गरजांपासून औषधे, यंत्रांचे सुटे भाग अशा अनेक बाबतीत मालदीव भारतावर अवलंबून आहे. मुइज्जू यांच्या हटवादीपणामुळे मालदीवचे मोठे नुकसान होऊ शकते, याची कल्पना विरोधी पक्षीयांना व्यवस्थित होती. मालदीवमधील सामान्य लोक भारतीयांबद्दल प्रेम बाळगतात, हे मी त्या देशाच्या दौऱ्यावेळी अनुभवले होते. त्या देशात भारताला संकटकाळात मदतीला येणाऱ्या ‘मोठ्या भावा’चा मान आहे. तेथे सत्ताबदलाचा प्रयत्न भारताने असफल केला होता. सुनामीच्या वेळीही भारताने बरीच मदत केली होती. कोविड काळात लसींचा मोठा पुरवठा केला गेला. कोविडचा प्रसार रोखणे आणि उपचार यातही भारताने योगदान दिले. दरवर्षी भारत मालदीवला मोठी आर्थिक मदत करत असतो.

विरोधी पक्ष हे सर्व जाणून आहे. म्हणूनच ‘मुईज्जू यांनी केलेल्या आगळिकीबद्दल भारतीय पंतप्रधानांची माफी मागितली पाहिजे,’ अशी मागणी मालदीवमधील विरोधी पक्ष जम्मूरी पार्टीचे नेते कासीम इब्राहिम यांनी स्पष्टपणे केली. यासंदर्भात तेथील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.
विरोधकांचा पवित्रा किती प्रखर आहे, याची कल्पना संसदेमध्ये यावरून झालेल्या मारामारीवरून येऊ शकते. मुईज्जू यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याची तयारी आता विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. मुईज्जू यांच्यासमोर आता दोनच मार्ग आहेत. एक तर भारताशी संबंध सुधारणे किंवा खुर्ची गमावणे. मालदीव चीनच्या मांडीवर जाऊन बसू शकत नाही हे तर निश्चित आहे; कारण भारतापेक्षा तो पुष्कळ लांब आहे. मुईज्जू यांच्या लक्षात या गोष्टी येतील, मालदीव आणि भारत यांचे मैत्रीपूर्ण संबंध चालू राहतील, अशी आपण आशा करूया. हेच दोघांच्याही हिताचे आहे.

(लेखक लोकमत समूह आणि एडिटोरियल बोर्डचे, चेअरमन आहेत) 

 

Web Title: The chair made the chair the target, maldive and lakshdweep parliment conflict after modi viral photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.