सह्याद्रीचा कडा ढासळतोय... आता तरी सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 07:10 AM2023-07-24T07:10:55+5:302023-07-24T07:11:26+5:30

निसर्गातील एकेक घटक आपण नष्ट करीत चाललो आहोत. ते तातडीने थांबविले पाहिजे, अन्यथा निसर्गचक्राबरोबर माळीण, तळिये, इर्शाळवाडी घडतच राहणार!

The edge of Sahyadri is collapsing be careful now | सह्याद्रीचा कडा ढासळतोय... आता तरी सावध व्हा!

सह्याद्रीचा कडा ढासळतोय... आता तरी सावध व्हा!

googlenewsNext

डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ

सह्याद्रीच्या पर्वतरांगात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रसंग घडत आहेत. या धोक्याची जाणीव २०११ साली माधव गाडगीळ समितीने करून दिली होती. संपूर्ण पश्चिम घाटाचा अभ्यास करून त्यांनी हा अहवाल दिला होता. या अहवालात अनेक उपाययोजना सूचवल्या होत्या. मात्र या अहवालावर पुढील प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. परिणामी मागील दहा वर्षांत दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये १०० टक्के नव्हे, १०० पट वाढ झाली. जो सह्याद्रीचा कडा हजारो वर्षे अविचल होता, आज तो अनेक ठिकाणी ढासळत आहे.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गाडली गेली. दरड कोसळल्याने अलीकडे माळीण गाव पूर्ण गाडले गेले. ही घटना विस्मृतीत जाण्यापूर्वी रायगड जिल्ह्यातील तळिये गाव कोसळलेल्या दरडीबरोबर गाडले गेले. गतवर्षी पन्हाळ्याची तटबंदी कोसळली. विशाळगडावरही भेगा पडल्या. या सर्वांचे खापर अतिवृष्टीवर टाकले जाते. मात्र यापेक्षा जास्त पावसातही टिकून असणाऱ्या दरडी आताच का कोसळतात, याचा विचार करायला हवा. 

कोकण हे निसर्गाचं लाडकं आणि देखणं लेकरू विकासाच्या नादात पोखरले जात आहे. कोकणामध्ये रस्ते बांधताना ज्या पद्धतीने काम सुरू आहे, ते पाहूनच धोके लक्षात येतात. कोकणातील डोंगररांगा एक तर कातळ दगडांच्या किंवा लाल माती, दगडांच्या आहेत. महामार्गांच्या बांधकामासाठी अनेक झाडांची तोड होते. महामार्ग जाणाऱ्या भागातील माती काढून टाकली जाते. चढ खोदून बाजूला केले जातात. उतारावर भर घालण्यात येते. या कामासाठी अवजड यंत्रे वापरली जातात. या यंत्रांच्या हादऱ्याने कोकण भूमीत असणारी मृदा सैल होते. पाऊस पडला की उघडी जमीन पाण्याबरोबर मातीही पाठवत राहते. सैल झालेल्या भागातून पाणी जाऊ लागले की भेगा रुंदावतात. अशा भागात रस्ते बांधताना मोठी आणि अवजड कंप करणारी यंत्रे न वापरता मनुष्यबळाचा वापर करून हळुवारपणे गरजेपुरत्या भागातील माती काढण्याची गरज असते. मात्र मानवी बळाचा वापर करून असे मोठे प्रकल्प पूर्ण करावयाचे झाल्यास त्यासाठीचा खर्च आणि वेळ वाढतो. खर्च आणि वेळेची केलेली बचत पुढे मोठ्या विनाशाकडे घेऊन जाते.

काही वर्षांपूर्वी सोळा देशांना त्सुनामीचा फटका बसला. या त्सुनामीमुळे किनाऱ्यांवरील अनेक गावांत प्रचंड हानी झाली. त्यामधून ज्या गावांनी किनारपट्टीवरील खारफुटी किंवा मँग्रोव्हजची तटबंदी अबाधित ठेवली होती, ती गावे बचावली. त्या गावांमध्ये कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. मागील काही वर्षांमध्ये कोकणात खाजगी मालकीची जमीन मोठ्या प्रमाणात विकली गेली. या जमिनीवर खाजगी मालकीचे जंगल होते. या जमिनी, पैसेवाल्या धनदांडग्यांनी खरेदी केल्या. त्या जमिनीवरील जंगल मोठ्या प्रमाणात तोडले गेले. 
कोकण आणि सह्याद्री लाल मातीने व्यापलेला. ही माती ऊन-वारा आणि पावसामुळे लगेच सुटी होते. पाऊस पडू लागला की तिला घट्ट पकडून ठेवणारी झाडांची मुळे आणि गवताचे आवरण नष्ट झाले असल्याने पाण्याबरोबर वाहू लागली. ती नदी पात्रात जमा होते आणि उथळ बनते. 
कोकणातील नद्या तीव्र उतारावरून धावत असल्याने मोठा भाग समुद्रातही वाहून जातो.नद्यांचे पात्र उथळ झाले की आपोआप पावसाचे पाणी आजूबाजूच्या भूभागात पसरते. तसेच गवताळ, झाडांनी व्यापलेल्या डोंगरमाथ्यावर मध्येच अशी बाग तयार झाली, तर ज्या भागात गवताळ आणि वृक्षराजीने झाकलेला भाग आहे, तो जास्त पाणी पकडून ठेवतो. तो भाग जड बनतो. वरचा भाग त्याच पद्धतीचा नसल्याने हा कडेला असणारा भाग सुटून खाली येतो. 

निसर्गातील सर्व घटक परस्परपूरक भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे मनुष्य वगळता अन्य जीव भरमसाठ वाढत नाही. त्यांची संख्या, मर्यादा ओलांडत नाही. काही वनस्पती आणि प्राणी पाण्याचे शुद्धीकरण करतात. 

एक अन्नसाखळी कार्यरत असते. या साखळीतील कडी तुटली, तर त्यांनी करावयाचे कार्य अपूर्ण राहते. त्यामुळे निसर्गातील एकेक घटक जसे नष्ट होतात, तसे त्याचे दुष्परिणाम कालौघात दिसून येतात. हे टाळायला आपण शिकलो, तसे वागलो, तर ही वसुंधरा टिकेल. अन्यथा निसर्गचक्राबरोबर माळीण, तळिये, इर्शाळवाडी घडतच राहणार!

Web Title: The edge of Sahyadri is collapsing be careful now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.