लेख: अपयशाने गांजलेल्या बॉलिवूडचा ‘द एण्ड’?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 07:01 AM2022-08-23T07:01:59+5:302022-08-23T07:02:58+5:30

सुपर स्टार्सचे इगो आणि अवाढव्य मानधन, प्रेक्षकांचा ओटीटीकडचा ओढा आणि ‘बॉयकॉट मोहिमा’ याशिवाय बॉलिवूडमध्ये मूलभूत घोळ आहेत का?

The End of Bollywood why big budget movies going flop | लेख: अपयशाने गांजलेल्या बॉलिवूडचा ‘द एण्ड’?

लेख: अपयशाने गांजलेल्या बॉलिवूडचा ‘द एण्ड’?

googlenewsNext

अमोल उदगीरकर
(चित्रपट अभ्यासक)

amoludgirkar@gmail.com

सुपर स्टार्सचे इगो आणि अवाढव्य मानधन, प्रेक्षकांचा ओटीटीकडचा ओढा आणि ‘बॉयकॉट मोहिमा’ याशिवाय बॉलिवूडमध्ये मूलभूत घोळ आहेत का?

अगदी अलीकडेच तेलुगू प्रोड्युसर्स गिल्ड या तेलुगू निर्मात्यांच्या  संघटनेने सर्व तेलुगू सिनेमांचं शूटिंग बेमुदत काळासाठी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. तेलुगू सुपर स्टार्सचं अवाढव्य मानधन, तिकिटांचे वाढलेले दर,  प्रेक्षकांचा ओटीटीकडचा ओढा, सुपर स्टारचा इगो कुरवाळण्यासाठी तिकीट खिडकीवरचे फुगवलेले आकडे यांनी गांजलेल्या निर्मात्यांनी शूटिंग थांबवून या परिस्थितीवर उपाययोजना शोधण्याचा निर्णय अर्थातच काळजावर दगड ठेवून घेतला होता. सध्याच्या संक्रमणावस्थेचा फटका फक्त बॉलिवूडला बसतोय आणि दक्षिणेकडच्या  फिल्म इंडस्ट्रीची भरभराट चालू आहे, असं जे चित्र अनेकांच्या डोळ्यासमोर आहे ते अर्धसत्य आहे. एखादा ‘केजीएफ’, एखादा ‘आर आर आर’ किंवा एखादा ‘विक्रम’ हा त्या पूर्ण चित्रपटसृष्टीचं प्रतिनिधित्व करत नाही. चिंतेचे वारे सगळीकडेच वाहत आहेत. भारतीय सिनेमासमोरचा हा खऱ्या अर्थाने ‘पॅन इंडियन क्रायसिस ‘ आहे. 

सगळेच डुबत्या नौकेत आहेत म्हणून बॉलिवूडने सुटकेचा नि:श्वास सोडावा, अशी परिस्थिती आहे का? तर नाही. बॉलिवूडसमोरचं सध्याचं संकट गहिरं आहे. आमिर खानचा ‘लालसिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हे दोन्ही महत्वाकांक्षी सिनेमे जोरदार आपटल्यावर या संकटाची जाणीव नव्याने झाली. सोशल मीडियावर सुरू असलेली चित्रपट बॉयकॉट मोहीम या अपयशाला कारणीभूत आहे का? बॉलिवूडमध्येच काही मजबूत मूलभूत घोळ आहेत का, या प्रश्नांची उत्तरं अर्थात गुंतागुंतीची आहेत.

सध्याच्या संकटापूर्वी जणू बॉलिवूडचं सुवर्णयुग चालू होतं आणि आता त्याला ओहोटी लागली आहे, हा गैरसमज झाला.  इंडस्ट्री म्हणून बॉलिवूड हा नेहमीच आतबट्ट्याचा व्यवहार होता. दरवर्षी बॉलिवूड सरासरी सहाशे ते सातशेच्या घरात सिनेमे बनवतं. त्यातले चालायचे इनमीन पंधरा ते वीस. काही सिनेमे कसेबसे पैसे वसूल करून काठावर पास ! सगळा मिळून आकडा कसाबसा पंचवीस ते तीसच्या घरात जायचा. बॉक्स ऑफिसच्या यशाचं हे अत्यल्प प्रमाण!  कोविडनंतर   बॉलिवूडचे सिनेमे पुन्हा प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झाले तेव्हा त्यांच्यासमोरची आव्हाने अजून वाढली; काय होती ती आव्हानं?

बॉलिवूड स्टार सिस्टमचा ऱ्हास! बॉलिवूडची ‘स्टार सिस्टम ‘ कितीही व्यक्तिकेंद्रित असली तरी त्याचे काही किमान फायदे होतेच.  ‘ए लिस्टर ‘ (आमिर, सलमान, शाहरुख, अजय देवगण, अक्षय कुमार, हृतिक रोशन) स्टार्समुळे सिनेमाला प्रत्येक वेळा नसली तरी अनेक वेळा एक भक्कम ओपनिंग मिळायची. चांगली ओपनिंग म्हणजे यशाची अर्धी खात्री.  ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या आमीर खानच्या फ्लॉप सिनेमाने पहिल्याच दिवशी पन्नास कोटीच्या वर गल्ला जमवला होता. पाच दिवसांचा वीकएंड मिळूनही  ‘लालसिंग चड्ढा’ला हा आकडा गाठता आला नाही.  स्टारची सिनेमाला ओपनिंग मिळवून देण्याची क्षमता प्रचंड खालावली आहे.  याची चिन्हे २०१८ पासूनच दिसत होती. पण, आत्ममग्न बॉलिवूडने त्याकडे दुर्लक्ष केलं.  

 कोविड काळात हिंदी सिनेमाला निर्माण झालेला ओटीटी आणि तमिळ -तेलुगू सिनेमांचा पर्याय हे दुसरं आव्हान.  टेलिव्हिजन, केबल टीव्हीसारख्या आव्हानांना  बॉलिवूड पुरून उरलं. पण यावेळेचं आव्हान अजून मोठं आहे. ओटीटी हा उत्तम स्थिरावलेला भक्कम पर्याय  इथं दीर्घकाळ राहणार आहे. दुसरं म्हणजे मल्टिप्लेक्स प्रेक्षकांचं लांगुलचालन करण्याच्या प्रयत्नात बॉलिवूडने ‘बी’ आणि ‘सी’ सेंटरवरच्या, ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या प्रेक्षकांकडे प्रचंड दुर्लक्ष केलं. बॉलिवूडच्या चकचकाटी पडद्यावरची कचकड्याची पात्रं आणि या सिनेमांची कथानकं या प्रेक्षकाला मुळीच अपील होत नव्हती.  सगळ्या चिंता-कटकटींपासून काही वेळ दूर नेणारा हिंदी सिनेमातला पलायनवाद हा सर्वसामान्य प्रेक्षकांना बॉलिवूडशी जोडणारा मोठा दुवा होताच. पण, वास्तववादाचा पाठलाग करण्याच्या नादात बॉलिवूड या स्वप्नरंजनापासून दूर होत गेलं आणि बॉलिवूडशी वर्षानुवर्षे एकनिष्ठ असणाऱ्या ग्रामीण निमशहरी भागातल्या प्रेक्षकांनी पर्याय शोधायला सुरुवात केली. 

हा पर्याय  दिला  तेलुगू -तमिळ  सिनेमांनी. तेलुगू आणि तमिळ सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निष्ठा पिटातल्या प्रेक्षकांना वाहिलेली असते. अतिशय बिन्धास्तपणाने, खुलेआम  प्रेक्षकांचं मनोरंजन हा एकमेव हेतू ठेवून ते सिनेमे बनवतात. हिंदी सिनेमापासून दूर गेलेल्या  सर्वसामान्य प्रेक्षकाला कवेत घेऊन थोपटण्याचं काम या दक्षिणेकडच्या राज्यातल्या सिनेमांनी केलं.  ‘आर आर आर’, ‘केजीएफ’ , ‘बाहुबली’ , ‘पुष्पा’, ‘विक्रम’ या सिनेमांना उत्तर आणि पश्चिम भारतात जे घवघवीत यश मिळतंय त्यामागे  बॉलिवूडपासून दूर गेलेला सर्वसामान्य प्रेक्षकच आहे. या प्रेक्षकाला पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी बॉलिवूडला आपल्या हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येऊन विचार करावा लागेल. बॉलिवूडच्या आगामी सिनेमांबद्दल आणि मंदावलेल्या स्टार्सबद्दल प्रेक्षकांमध्ये काहीही औत्सुक्य नाहीये, ही कडू गोळी गिळूनच या मंडळींना उपाययोजना कराव्या लागतील.

सोशल मीडियावरच्या बॉयकॉट मोहिमांचा फटका बॉलिवूडला बसतोय का? -  काही लोकं ही शक्यता एकदमच झटकून टाकतात आणि काही बॉलिवूडच्या अपयशाचं श्रेय पूर्णपणे या बॉयकॉट मोहिमेला देतात. सत्य अर्थातच या दोन्हींच्या मध्ये कुठं तरी आहे. संघटित बॉयकॉट मोहिमेचा फटका कलेक्शनला बसतो, हे खरं आहे. मान्य करायला हवं. बॉलिवूड हे राष्ट्रविरोधी, हिंदूविरोधी आणि माफियांच्या हातात गेल्याचं या मोहिमांचं नॅरेटिव्ह जास्त धोकादायक आहे. या नॅरेटिव्हमुळे बॉलिवूडची एकूणच विश्वासार्हता पणाला लागली आहे. 

बॉलिवूड ही लढाई हरलंय का ? ते या सातत्याने होणाऱ्या अपप्रचाराला उत्तर देतील का ? बॉलिवूड आणि सोबतच तामिळ, तेलुगू, मल्याळम फिल्म इंडस्ट्री (यात मराठी फिल्म इंडस्ट्रीचा उल्लेख करता आला असता तर आनंदच झाला असता. असो.) या फार चिवट आहेत. यांनी आणीबाणी पचवली. टीव्हीचं आव्हान पचवलं. आर्थिक मंदी पचवली. कोविडची लाट पचवली. त्यांना किरकोळीत काढून चालणार नाही. काळानुरूप स्वतःमध्ये  बदल घडवून बॉलिवूड चिवटपणे टिकून राहील, ही शक्यताच जास्त आहे. ‘हॅप्पी एंडिंग’चा हा दुर्दम्य आशावाद बॉलिवूड सिनेमानेच तर दिलाय! 
 

Web Title: The End of Bollywood why big budget movies going flop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.