मैदानात मेडलचा खेळ अन् बाहेर लैंगिक छळाचा 'गेम'!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 08:35 AM2023-01-22T08:35:11+5:302023-01-22T08:37:46+5:30
अथक मेहनत घेऊन मैदानात मेडलसाठी जीवाचे रान करायचे आणि खेळात टिकून राहण्यासाठी लैंगिक छळ सहन करायचा असा 'गेम' अनेक वर्षांपासून सुरू आहे.
अथक मेहनत घेऊन मैदानात मेडलसाठी जीवाचे रान करायचे आणि खेळात टिकून राहण्यासाठी लैंगिक छळ सहन करायचा असा 'गेम' अनेक वर्षांपासून सुरू आहे.
देशातील पुरस्कार विजेते नामांकित पहिलवान तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करीत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी पहिलवानांचे लैंगिक शोषण केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. मागील १० वर्षांत फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, जिम्नॅस्टिक आदी खेळांशी संबंधित स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या तब्बल ४५ पदाधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत.
फुटबॉल कोचकडून लैंगिक शोषण
१७ वर्षाखालील महिला फूटबॉल टीमसोबत युरोप दौऱ्यावर गेलेल्या एलेक्स एम्ब्रोस या कोचवर खेळाडूने लैंगिक छळाचा आरोप केला. फुटबॉल महासंघाने त्यांना बरखास्त केले होते.
सायकलिंग कोचने केला लैंगिक छळ
महिला सायकलपटूने कोच आर. के. शर्मावर स्लोवेनिया दौयात हॉटेलवर एकाच रुममध्ये राहण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. नंतर शर्मा यांच्यासोबत सर्व करार रद्द केले.
बास्केटबॉल कोचकडून लैंगिक दुराचरण
७ महिला अॅथलिट खेळाडूंना बास्केटबॉल कोच पी. नागराजन यांच्यावर अनेक वर्षांपासून लैंगिक दुराचरण केल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
क्रिकेट कोचकडून छेड
नवी दिल्लीतील महिला क्रिकेटपटूने कोचवर छेडछाडीचा आरोप केला होता. याबाबत तिने खासदार गौतम गंभीर यांच्या मदतीने पोलिसात तक्रार केली होती.
जिम्नॅस्टिकमध्ये अभद्र टिप्पण्णी
महिला जिम्नॅस्टिकने कोच मनोज राणा व त्यांचे सहकारी चंदन पाठक यांनी प्रशिक्षण शिबिरात अभद्र टिप्पणी केल्याचा आरोप केला. पोलिसांनी मनोज राणा यांना अटक केली
बॉक्सिंग सचिव झाला गजाआड
तामिळनाडू स्टेट अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव एम. के. करुणाकरन यांच्यावर महिला बॉक्सरने लैंगिक छळ, छेडछाडीचा आरोप केला. पोलिसांनी त्यांना गजांआड केले.
हॉकी कोचने केला लैंगिक छळ
हॉकी टीमची खेळाडू रंजिता देवी यांनी कोच महाराज किशन कौशिकवर लैंगिक छळाचा आरोप केला. नंतर कौशिक यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
क्रिकेट सचिवाचे कारनामे
आंध्र किक्रेट असोसिएशनचे सचिव चामुंडेश्वरनाथ यांच्यावर टीममध्ये स्थान देण्यासाठी महिला खेळाडूवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता. गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांना पदावरून हटविले होते.
सात वर्षांपूर्वी केरळची ज्युनिअर महिला अॅथलिट अपर्णा रामचंद्रन हिने कोचकडून झालेल्या लैंगिक छळामुळे त्रस्त होऊन स्पोर्ट्स अॅथॉरिटीच्या हॉस्टेलमध्येच आत्महत्या केली होती.