गाव कारभारींच्या निवडीसाठीचा धुरळा उडाला!
By किरण अग्रवाल | Published: December 11, 2022 11:07 AM2022-12-11T11:07:44+5:302022-12-11T11:08:39+5:30
Gram Panchayt election : ग्रामपंचायतींच्या व त्यातही थेट सरपंचपदाच्या निवडणुकीकडे त्याच दृष्टीने पाहता, स्थानिक राजकारणाचे कोणते वा कसे रंग उधळले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- किरण अग्रवाल
थेट सरपंचांसह ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. प्रचाराने वेग घेतला आहे. यात नव्या दमाची तरुण मंडळी पक्षविरहितपणे मोठ्या संख्येने उतरलेली दिसत असल्याने राजकारणातील मळलेल्या वाटा या नवोदितांकडून स्वच्छ होण्याची अपेक्षा करता येणारी आहे.
मोठी निवडणूक लढणे तुलनेने सोपे; पण गावकीचे राजकारण म्हणजे लई भारी. कारण यात रोज सोबत उठणारा-बसणारा व जेवणाराही काय घात करून जाईल याचा अंदाजच बांधता येत नाही. सर्वत्र होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या व त्यातही थेट सरपंचपदाच्या निवडणुकीकडे त्याच दृष्टीने पाहता, स्थानिक राजकारणाचे कोणते वा कसे रंग उधळले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना स्व-विकासाचे अधिकार लाभले आहेत, शिवाय राजकीय वाटचालीची पहिली पायरी म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जाते. त्यामुळे आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही रंगू लागल्या आहेत. नाही म्हणता अपवादात्मक काही ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्याही; पण बहुसंख्य ठिकाणी निवडणुकांचा धुरळा उडून गेला आहे. राजकीय वारसा असणारेच नव्हे, तर नेतृत्वाची क्षमता ठेवून वेगळी वाट चोखाळू पाहणारे अनेक सुशिक्षित तरुण यात उतरलेले दिसत आहेत, ही मोठी समाधानाची व आशादायी बाब म्हणायला हवी. बरे, या निवडणुकीत पक्षीय अभिनिवेष तितकासा नसतो, किंबहुना अपवाद वगळता तो नसतोच. त्यामुळे राजकीय कोऱ्या पाट्या असलेले तरुण यातून पुढे येतात, हे अधिक महत्त्वाचे.
अकोला जिल्ह्यातील 258 साठी 936, बुलढाणा जिल्ह्यात 251 साठी 851, तर वाशिम जिल्ह्यात 287 साठी 912 उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात आहेत. यंदा थेट सरपंचपदासाठी निवडणूक होत असल्याने सदस्यांना ‘काय ते डोंगर, झाडी व हॉटेल...’ दाखवायची गरज उरलेली नाही. याखेरीज ग्रामपंचायत सदस्यपदासाठी तिन्ही जिल्ह्यात मिळून सुमारे दहा हजारांवर उमेदवार नशीब अजमावत आहेत. एकूणच हजारो उमेदवारांची व त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे लाखोंच्या संख्येतील मतदारांची ही निवडणूक पाहता हा खरा लोकशाहीचा उत्सव म्हणायला हवा. लोकशाहीच्या बळकटीकरणाचे बाळकडू हे या ग्रामस्तरावरील निवडणुकीतून लाभेल असे म्हटले तर वावगे ठरू नये.
गावाचा विकास आता गावकारभाऱ्यांच्याच हाती आला आहे. त्यासाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेकडे हात पसरण्याची गरज उरलेली नाही. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ज्या अनेकविध योजना राबविल्या जातात, त्यात सहभागी होत सार्वजनिक, तसेच व्यक्तिगत लाभाच्या योजनांद्वारे अक्षरशः कोट्यवधींची कामे करून घेता येतात. त्यासाठी दांडगी इच्छाशक्ती व वेगळे काही करून दाखविण्याची उर्मी असणे तेवढे आवश्यक असते. राजकीय घराणेशाहीचा गंध नसलेले; परंतु गावासाठी काहीतरी करू इच्छिणारे अनेक शिकले सवरलेले व कामाधंद्याला लागलेले तरुणही त्यामुळेच या निवडणुकीत पुढे आलेले दिसत आहेत.
जवळपासच्या आदर्श गावांचा ‘आदर्श’ घेऊन प्रत्येकच गावाला विकसित करता येऊ शकते. एरवी राजकीय स्वच्छताकरणाच्या गप्पा सर्वत्र केल्या जातात, येथे अधिकतर पक्षीय टोप्या परिधान न करता ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढल्या जात असल्याने व असंख्य उमेदवार प्रथमच निवडणुकांना सामोरे जात असल्याने मतदारांनीही अशा चांगुलपणा जपणाऱ्या, प्रामाणिक तरुणांना संधी देणे गरजेचे आहे, ज्यातून राजकीय स्वच्छताकरण आपसूकच घडून येईल. हीच पिढी पुढे विविध ठिकाणी आपले नेतृत्व करण्यास तयार होणार असल्याने, ती पिढी पहिल्या पायरीवर निवडण्याची जबाबदारी आता मतदारांची आहे.
सारांशात, गावकारभारींच्या निवडणुकीत राजकारणाचा धुरळा उडून गेला असला तरी यात तरुण व नेतृत्वाच्या विकासासाठी धडपडणारी मंडळी मोठ्या प्रमाणात असल्याने जागोजागी नवे नेतृत्व उदयास येण्याची अपेक्षा बळावली आहे. पारंपरिक नेत्यांनी त्यांच्या वाटेत काटे न पसरता त्यांना पुढे होण्याची व स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी देण्याची मानसिकता ठेवावी, इतकेच यानिमित्ताने.