द ग्रँड विराट-शमी शो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 09:16 AM2023-11-17T09:16:37+5:302023-11-17T09:16:47+5:30

शमीच्या वेग आणि अचूकतेच्या भन्नाट स्पेलपुढे किवीजनी अक्षरश: नांगी टाकली. तब्बल सात गडी बाद करताना शमीने अनेक विक्रमांवर मोहोर उमटवली.

The Grand Virat Kohli And Mohammad Shami Show in the world cup semi final match | द ग्रँड विराट-शमी शो...

द ग्रँड विराट-शमी शो...

ज्याला खेळताना पाहत लहानाचे मोठे झालो, त्याच्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहिले, त्याच्याच साक्षीने त्याचाच जागतिक विक्रम मोडण्याचे भाग्य खूप कमी लोकांना लाभते. किंग विराट कोहलीच्या नशिबी बुधवारी हे दुर्लभ क्षण आले. त्याने एकदिवसीय सामन्यांमधील शतकांचे अर्धशतक नोंदविताना सर्वाधिक ४९ शतकांचा भारतरत्न सचिन तेंडुलकरचा जागतिक विक्रम सचिनच्याच साक्षीने आणि तोदेखील सचिनच्या घरच्या मैदानावर, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मोडला. विराटने सचिनच्या तुलनेत अगदीच कमी सामने खेळून ही पन्नास शतके ठाेकली आहेत. आता विराट, सचिन व रोहित शर्मा, असे वनडे सामन्यांच्या सर्वाधिक शतकांच्या यादीत पहिल्या तिन्ही स्थानांवर भारतीय खेळाडू आहेत. याशिवाय एका विश्वचषकात सर्वाधिक धावांचा सचिनचा आणखी एक विक्रमही विराटने मोडीत काढला.

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील या सामन्यात विराटसोबत श्रेयस अय्यरचे तडाखेबंद शतक, रोहित शर्मा व शुभमन गिल या सलामी जोडीने सुरुवातीच्या षटकांमध्ये पुन्हा लावलेला धडाका, के.एल. राहुलची छोटीशी स्फोटक खेळी यांच्या बळावर भारताने न्यूझीलंडपुढे ३९८ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले. इंग्लंडमध्ये गेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी हे खरेतर पुरेसे होईल असे वाटले होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. अत्यंत चिवट, प्रतिभावान अशा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सामन्यात रंगत आणली. कर्णधार केन विल्यमसन, शतकवीर डॅरिल मिचेल यांनी भारतीयांच्या काळजाचे ठोके वाढवले. याचवेळी मोहम्मद शमीने चमत्कार घडवला. विराटच्या शतकांच्या अर्धशतकाला शमीच्या बळींच्या अर्धशतकाची जोड मिळाली.

शमीच्या वेग आणि अचूकतेच्या भन्नाट स्पेलपुढे किवीजनी अक्षरश: नांगी टाकली. तब्बल सात गडी बाद करताना शमीने अनेक विक्रमांवर मोहोर उमटवली. तो आता जगात वेगवान ५० बळी घेणारा गोलंदाज आहे.  एकदिवसीय सामन्यांतील भारतीयाची सर्वोत्कृष्ट कामगिरी त्याच्या नावावर आहे. विराटची फलंदाजी जर पाच-दहा, वीस-पंचवीस सामन्यांमधून एकदा अनुभवायची गोष्ट असेल, तर हिरव्या-तांबूस खेळपट्टीवर पेनाने रेघ आखावी, अशी शमीच्या वेगवान चेंडूची सीम आणि तिचा सामना करताना फलंदाजाची त्रेधातिरपीट, हा अनेक दशकांमध्ये कधीतरी दिसणारा गोलंदाजीचा अप्रतिम आविष्कार आहे. योगायोग असा, की विश्वचषकाच्या सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये शमीला बाहेर राहावे लागले. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे तो संघात आला आणि तो आला, तो खेळला व तो जिंकला, असे देखणे दृश्य सहा सामन्यांमध्ये दिसले.

प्रेक्षकांमध्ये महान क्रिकेटपटू विव्हियन रिचर्डस्, सिनेसृष्टीचा महानायक रजनीकांत व असंख्य तारे-तारका, इंग्लंडचा थोर फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम अशी मांदियाळी  आणि स्टेडियमवर हजारो क्रिकेटप्रेमी व देश-विदेशात टीव्हीपुढे कोट्यवधी चाहते अशावेळी खेळणाऱ्यांवर दडपण येतेच. ते या सामन्यातही दिसले. त्याचमुळे शमीच्या हातून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा सोपा झेल सुटला. त्याचे त्याला खूप वाईट वाटले. कदाचित पुढच्या स्पेलमध्ये त्वेषाने चेंडू टाकण्याची, विकेट मिळविण्याची ईर्षा व जिद्द त्यातूनच आली असावी. शमीच्या या अद्भुत कामगिरीला वैयक्तिक आयुष्यातील खाचखळग्यांची पृष्ठभूमी आहे.

उत्तर प्रदेशातील सहसपूर नावाच्या खेड्यात जन्मलेला हा गरीब घरातील खेळाडू जणू शापित गंधर्व आहे. त्याची क्रीडाप्रतिभा इतकी विलक्षण असूनही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बालपणी केलेला संघर्ष, उत्तर प्रदेश ते पश्चिम बंगाल अशी धावपळ, देशांतर्गत तसेच जागतिक क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी घेतलेले परिश्रम, पत्नीने केलेले आरोप, त्यावरून पोलिसांचा ससेमिरा, कोर्टकज्जे असे इतके काही शमीने भोगले, की या जालीम दुनियादारीऐवजी तो चेंडूवरच प्रेम करू लागला, क्रिकेटप्रती त्याची निष्ठा आणखी प्रखर बनली. तो अधिक आक्रमक बनला. विराटची उत्तुंग कामगिरीही  शमीपुढे झाकोळली. शमी सामनावीर ठरला. यशाची प्रचंड भूक ही विराट व शमी दोघांचेही वैशिष्ट्य आहे. ही भूक आणि कामगिरीतले  सातत्य महान खेळाडू घडविते. या जडणघडणीचे मूर्तिमंत उदाहरण विराट व शमीच्या रूपाने जगाने पाहिले. भारतीयांची यंदाची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी कोणीही अंतिम सामन्यात आले तरी झळाळता विश्वचषक पुन्हा उंचावण्याचे स्वप्न रोहित आणि चमू नक्की साकारेल, अशी खात्री भारतीयांना वाटते. रविवारच्या जगज्जेतेपदासाठी टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा!

Web Title: The Grand Virat Kohli And Mohammad Shami Show in the world cup semi final match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.