नवतेच्या अंगीकारातून प्रशस्त झाले विकासाचे राजमार्ग!

By किरण अग्रवाल | Published: March 16, 2024 01:23 PM2024-03-16T13:23:57+5:302024-03-16T13:26:06+5:30

Adoption of newness : समाज जीवनाने जी नवता किंवा अभिनवता अंगीकारली त्यातूनच या शहरांचे, जिल्ह्यांचे व एकूणच परिसराचे विकासाचे मार्ग अधिक प्रशस्त झाल्याचे म्हणता यावे.

The highway of development was paved with the adoption of newness! | नवतेच्या अंगीकारातून प्रशस्त झाले विकासाचे राजमार्ग!

नवतेच्या अंगीकारातून प्रशस्त झाले विकासाचे राजमार्ग!

-किरण अग्रवाल

पश्चिम वऱ्हाडच्या मातीत 'लोकमत' आला, मायबाप वाचकांच्या पसंतीच्या बळावर येथे रुजला आणि बघता बघता रौप्य महोत्सवी टप्पा ओलांडला गेला. आता २७ व्या वर्षात प्रवेश करताना मागे वळून बघितले तर गेल्या २६ वर्षात खूप काही बदलून गेल्याचे दृष्टीस पडते. या काळाचे सिंहावलोकन करायचे तर स्मृतींचा पडदा असंख्य घटना घडामोडींच्या आठवणींनी गच्च भरून जातो. यातील प्रसंग विशेष बाजूला ठेवत विचार करायचा झाल्यास समाज जीवनाने जी नवता किंवा अभिनवता अंगीकारली त्यातूनच या शहरांचे, जिल्ह्यांचे व एकूणच परिसराचे विकासाचे मार्ग अधिक प्रशस्त झाल्याचे म्हणता यावे.

 

चां गले भविष्य घडविण्यासाठी वर्तमानातले परिश्रम महत्त्वाचे ठरतातच, पण त्यासाठी भूतकाळाचा पायाही मजबूत असावा लागतो. विकासासारख्या व्यापक परिमाणे असलेल्या बाबीसाठी तर सर्वकालिक व सर्वस्तरीय धडपड आणि प्रयत्नच गरजेचे ठरतात. पश्चिम वऱ्हाडाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व औद्योगिक परिघावरील सक्रियता याचीच साक्ष देणारी असून, त्यामुळेच अलीकडील काळात शहरे कात टाकून विकसित होताना दिसत आहे.

सिंहावलोकन ही संकल्पना तशी खूप व्यापक आहे. तिचा आवाका हा काही शब्दात अगर थोड्या थोडक्या जागेत मांडणे शक्य होणारे नाही. यातही सर्वव्यापी विकासाचे सिंहावलोकन करायचे तर ते तसे खूप अवघड कार्य ठरावे, कारण हा विकास घडून येतो तस तसे समाजकारणही बदलत जाणारे असते. एखादे शहर वा परिसर बदलतो तो केवळ उंच उभ्या राहणाऱ्या इमारतींनी किंवा चकाकणाऱ्या रस्त्यांनीच नव्हे, तर या भौतिक सुविधांखेरीज मनुष्याच्या मानसिकतेत होत असलेल्या परिवर्तनानेदेखील. काळ बदलतो तशा गरजा बदलतात त्याप्रमाणे समाजातील स्थित्यंतरे होत असताना पिढी बदलते तशी विचारधाराही बदलताना दिसून येते.

शेती असो, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य की आणखी कोणतेही क्षेत्र; त्यात नवनवीन प्रयोग केले जाताना दिसत आहेत. पारंपरिक पद्धती किंवा विचारांना काहीसे बाजूला ठेवून वेगळे काही साकारण्याचा प्रयत्न नवीन पिढीकडून होत असल्याने या सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होताना दिसून येत आहेत. काळ बदलला, गरजा व अपेक्षा बदलल्या तशी आव्हानेही बदलली आहेत. ती स्वीकारत किंबहुना त्यावर स्वार होऊन पुढचे पाऊल टाकले जात आहे, त्यामुळे शेतीचे तंत्र बदलले तसे शिक्षणातील पाटी-पेन्सिल जाऊन त्याची जागा ऑनलाइन क्लासरूमने घेतली आहे. जागतिक तंत्राची व विचारांची तोंड ओळख असलेली तरुण पिढी आता कर्ती सवरती झाल्याने त्यांच्याकडून होणारा बदल लक्षवेधी ठरत आहे. त्यासाठी गतकाळातील वाटचालीत संस्था आणि व्यक्तींनीही नवे ते स्वीकारण्याची मानसिकता ठेवल्याची बाब सिंहावलोकन करताना अधोरेखित होणारी आहे.

अगदी कृषीचे क्षेत्र घेतले तर पारंपरिक कापूस व सोयाबीन आदींच्या पलीकडचा विचार करून येथील शेतकऱ्यांनी नवीन पीक, वाण स्वीकारुन कृषी क्रांती घडविण्याचे दिसून येते. अलीकडील काळात तर निसर्गाचा लहरीपणा बळावला आहे. मान्सूनचे वेळापत्रकच बदलून गेले असून अवकाळी पावसाने वेळोवेळी मोठे नुकसान घडविले आहे, तरी साऱ्या अडचणींवर मात करीत बळीराजा मोठ्या हिमतीने नवनवीन प्रयोग करून आपल्या कुटुंबाचे व एक प्रकारे समस्त समाजाचे पोषण करीत आहे. दळणवळणाची साधने वाढली आहेत. राष्ट्रीय व राज्य महामार्गातही 'समृद्धी' आली आहे. पंचवीसेक वर्षांपूर्वी गावात सायकली व लहान दुचाकींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसे, आता कुटुंबाला राहायला पुरेशी जागा नसली तरी दाराशी चारचाकी उभी असलेली दिसते. साधन सुविधांनी राहणीमान उंचावले आहे. पूर्वीच्या सायकल रिक्षांची जागा आता ऑटो रिक्षांनी घेतली आहे, पण बसस्थानक व रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशाला विचारल्या जाणाऱ्या, ''चलो भैय्या कहा चलना है...'' चा गोडवा टिकून आहे.

 

शिक्षणाची पाटीच बदलून गेली आहे. पोटाला चिमटा देऊन अनेक मध्यमवर्गीयही मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये शिकायला धाडत आहेत. मुलांच्या उज्ज्वल भविष्याची आस ठेवून त्यांना उच्चविद्या विभूषित करण्याच्या दृष्टिकोनातून पालकांचे सुरू असलेले प्रयत्न पाहता कोचिंगच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुले शिकत आहेत तशी ती अन्य वेगवेगळ्या क्षेत्राकडेही वळत आहेत. विशेषता क्रीडा क्षेत्रात अनेक मुले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचून वऱ्हाडचे नाव उंचावत आहेत. आरोग्यातही मोठी प्रगती झाली आहे. २५ ते ५० रुपये फी घेणाऱ्या फॅमिली फिजिशियन कल्चरपासून ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सपर्यंतचा टप्पा गाठला गेला आहे. आता इमर्जन्सीमध्ये नागपूर व मुंबईला जाण्याची गरज नाही इतक्या आरोग्यविषयक सुविधा किमान आपल्याच अकोल्यात उपलब्ध झाल्या असून दुर्धर आजाराच्या रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारे अनेक 'देवदूत' रुग्णसेवा देताना दिसत आहेत. औद्योगिक क्षेत्रात खूप मोठे उद्योग आलेत असे नव्हे, पण पारंपरिक उद्योगांखेरीज अन्य उद्योगांकडेही उद्योजक वळले आहेत.

 

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. साहित्यिक उपक्रम भरभराटीस आले आहेत, तालुका पातळीवर राज्यस्तरीय साहित्य संमेलने होत आहेत. त्यातून माय मराठीचा जागर घडवणारी साहित्य सेवा घडतांना दिसते. विशेष म्हणजे, मराठी गझलसारख्या साहित्य प्रकारात अनेक नवतरुण पुढे येताना दिसत आहेत. अभिरुची संपन्न समाजाच्या निर्मितीच्या दृष्टीने व सांस्कृतिक समृद्धतेच्या जोपासनेच्या संदर्भाने ही बाब खूप दिलासादायक म्हणता यावी. सामाजिक चळवळीही मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्या आहेत. विविध अराजकीय संस्था, संघटना, प्रतिष्ठानांच्या मार्फत सामाजिक, धार्मिक सेवेचे कार्य अखंडितपणे सुरू असलेले दिसते. आपल्यासोबत इतरांच्या भल्याचा, कल्याणाचा यामागील भाव महत्त्वाचा असून, या संवेदना टिकून राहतील; त्या बोथट होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे.

शासन, प्रशासन आपल्या परीने काम करीतच असते. व्यवस्थेची आपली म्हणून एक गती असते, तिला गतिमान करण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून घडून येते. स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा विधिमंडळ वा लोकसभा; तेथील लोकप्रतिनिधी आपापली भूमिका जबाबदारीने निभावत असतात. कमी अधिक अगर उणिवा कुठे नसतात?, पण जनता जागरूक असली की लोकप्रतिनिधीही सजग असतात. सर्व पक्षीयांच्या याच सजगतेतून अलीकडे अनेकविध विकासकामे घडून आलेली व येताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधी बरोबरच अधिकारपदावरील काही अधिकारींनीही यादृष्टीने लक्षणीय कामे केलेली आहेत, त्यातून शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे.

 

केवळ अकोलाच नव्हे, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील काही तालुकास्तरीय शहरांचाही चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे. तेथे नव्याने साकारत असलेल्या शासकीय कार्यालयांच्या इमारती या नवीन वास्तुशिल्पाचा नमुना ठरत आहेतच, पण गावात उभी राहणारी व्यावसायिक संकुले व गृहनिर्माण प्रकल्पही नवीन रूप घेऊन उभे राहताना दिसत आहेत. यातही लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, ग्रामीण पातळीवर अलीकडेच ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात बहुसंख्य ठिकाणी तरुण सदस्य व सरपंच निवडले गेले आहेत. नेहमीच्या गावकीच्या राजकारणाला बाजूस सारून नवीन कल्पनेचे पंख ल्यालेले हे तरुण ग्राम विकासासाठी मोठी धडपड करताना दिसून येत आहेत. लोकमतच्या वतीने लवकरच सरपंच अवॉर्ड्स प्रदान केले जाणार आहेत, त्या निमित्ताने जागोजागच्या ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेताना या तरुणांनी आपल्या गावाची दशा व दिशा बदलण्यासाठी प्रयत्न चालविल्याचे नजरेत भरले. केवळ तंटामुक्ती, दारूबंदी व कुऱ्हाड बंदी पर्यंतच त्यांचे प्रयत्न मर्यादित राहिले नाहीत; तर संपूर्ण गावाची विद्युत व्यवस्था सोलरवर साकारण्याचे, विकास कामांसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी गावातच व्यावसायिक संकुले उभारून आर्थिक सक्षमता, स्वयंपूर्णता साधण्याचे आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याची जाणीव ठेवून त्यादृष्टीनेही भरकस प्रयत्न करण्याचे त्यांचे उपक्रम नजरेत भरणारे आहेत. तात्पर्य शहरांचा चेहरा बदलत नसून खेड्यापाड्यांचाही विकास साधून त्यांचाही चेहरा बदलताना दिसत आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी आपण कोरोना अनुभवून झालो आहोत. कोरोनाच्या महामारीने जो धडा शिकविला त्यातून अनेकविध बदलही झालेत. ते तंत्रात झाले, तसे जीवनशैलीतही झालेत. आता आगामी काळ हा 'एआय'चा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असणार आहे. सर्वच क्षेत्रात या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार असल्याने जग व त्यातील माहिती - तंत्रज्ञान अधिकच जवळ किंबहुना हातात येणार आहे. यात माहितीची सत्यता पडताळून घेणे हे कसोटीचे ठरेल खरे, पण हे तंत्र जीवनाला नवी दिशा अगर कलाटणी देणारे ठरेल हे नक्की. या वावटळीत टिकून राहायचे तर आपल्याला आपली नैतिक, सामाजिक, व्यावसायिक मानवी मूल्ये जपून माणुसकी वृद्धिंगत करावी लागेल.

(लेखक लोकमतचे कार्यकारी संपादक आहेत.)

Web Title: The highway of development was paved with the adoption of newness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.