इंडियन प्रीमियर लीग जगभरातील क्रिकेटपटूंसाठी सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीप्रमाणे ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:23 AM2022-05-31T07:23:43+5:302022-05-31T07:23:55+5:30

क्रिकेटमधील या सर्वांत मोठ्या लीगने भारताला दरवर्षी नवे युवा स्टार दिले.

The Indian Premier League has become like a hen laying golden eggs for cricketers around the world | इंडियन प्रीमियर लीग जगभरातील क्रिकेटपटूंसाठी सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीप्रमाणे ठरली

इंडियन प्रीमियर लीग जगभरातील क्रिकेटपटूंसाठी सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीप्रमाणे ठरली

Next

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलने यंदा १५ वर्षे पूर्ण केली. दोन महिन्यांत रोमांचक अशा ७४ सामन्यांमुळे चाहते कमालीचे सुखावले. आर्थिक सुबत्ता आणणारी ही लीग आता जगभरातील क्रिकेटपटूंसाठी सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीप्रमाणे ठरली आहे. एका खेळीतून मालामाल होणारे, प्रसिद्धीच्या झोतात येणारे नवे चेहरे आयपीएलने पुढे आणले. या लीगने लोकप्रियतेचे जे नवनवे उच्चांक गाठले, त्यामुळे भारतीय क्रिकेटची गरज म्हणूनही लीगकडे पाहिल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 

क्रिकेटमधील या सर्वांत मोठ्या लीगने भारताला दरवर्षी नवे युवा स्टार दिले. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत आणि युजवेंद्र चहल हे आयपीएलचा शोध ठरले. दरवर्षी अनकॅप्ड खेळाडू जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध दोन हात करतात. स्वत:ची प्रतिभा पणाला लावतात. यंदा असेच काही चेहरे पुढे आले. त्यात वेगवान उमरान मलिक, तिलक वर्मा, डावखुरा मोहसीन खान, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, राहुल तेवतिया या खेळाडूंनी कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर खेळण्यास दावेदारी सिद्ध केली. लहान शहरातून आलेले हे सर्व चेहरे फार मोठ्या घरचे नाहीत. स्वत:ची आर्थिक स्थितीही त्यांनी स्वबळावर सुधारली आहे. यंदाच्या आयपीएलचे फलित काय, असा प्रश्न अनेकांना पडला असावा. त्याचे उत्तर आहे भारतीय संघासाठी तयार झालेली नव्या वेगवान गोलंदाजांची फळी.

भारतीय क्रिकेट सध्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव या दिग्गज वेगवान गोलंदाजांभोवती फिरतंय. ‘त्यांच्यानंतर कोण?’ हा प्रश्न यंदाच्या आयपीएलने निकाली काढला. उमरानच्या वेगापुढे भलेभले नांगी टाकतात, तिथे मुकेश चौधरी आणि यश दयाल, मोहसीनचा वैशिष्ट्यपूर्ण मारा, कुलदीप सेनचा अचूक टप्प्याने मारा या सर्व गोष्टी राष्ट्रीय संघाच्या भविष्यासाठी पूरक ठरणार आहेत. एकीकडे युवा आणि आश्वासक खेळाडू पुढे येत असताना दिग्गज मात्र सपशेल ‘फ्लॉप’ झाले. रोहित शर्मा संपूर्ण लीगमध्ये एकही अर्धशतकी खेळी करू शकला नाही. विराट कोहली तर २००९च्या सत्रानंतर आयपीएलमध्ये सर्वांत कमी सरासरीने खेळला. रवींद्र जडेजाची ओळख अष्टपैलू खेळाडू अशी असली तरी  नेतृत्व, गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्व स्तरावर तो आपटला. ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर यांचीही कामगिरीही चमकदार नव्हती. या सर्वांमध्ये हार्दिक पांड्याची मात्र पाठ थोपटावी लागेल.

दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर पडलेल्या हार्दिकला मागील वर्षी पुनरागमन करताना तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे वगळण्यात आले होते. टी-२० विश्वचषकात गोलंदाजी करू न शकल्याने त्याच्या अष्टपैलू खेळाडूच्या वैशिष्ट्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते; पण राखेतून निघालेल्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे, हार्दिकने यंदा चमक दाखवली. फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्वाच्या बळावर त्याने गुजरात टायटन्सची विजयगाथा लिहिली. आयपीएल पदार्पणात गुजरातला चषक जिंकून देणाऱ्या हार्दिकची एकूण कामगिरी भारतीय संघात पुनरागमन करण्यास पुरेशी ठरते. आयपीएलच्या फायनलमध्ये बीसीसीआयने नव्या विक्रमाचीही नोंद केली.

जगातील सर्वांत मोठी जर्सी तयार करण्यासह अहमदाबादच्या सर्वांत मोठ्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना आयोजित केला. सामन्याला प्रेक्षकांनी विक्रमी गर्दी केली. येथे एकावेळी १ लाख ३२ हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. आयपीएलच्या अधिकृत माहितीनुसार राजस्थान आणि गुजरात यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी १ लाख ४ हजार आणि ८५९ जण मैदानात उपस्थित होते. आयपीएल लोकप्रिय आहे, यात शंका नाही; पण यंदा स्पर्धेचा जो ग्राफ खाली आला, त्यामुळे या यशोगाथेवर चिंतेचे सावटही आले आहे.  

लीगचा रोमांच लक्षात घेता काही सामन्यांचा निकाल फारच साधारण होता. क्लब स्तरावर सामने खेळले जात आहे की काय, अशी शंका व्यक्त होत होती. कदाचित वाढलेले दोन संघ आणि ६० दिवसांचा लांबलचक कालावधी हादेखील मुद्दा असावा. कोरोनातून अद्याप न सावरलेल्या अनेकांच्या नोकऱ्यांची चिंता कायम असल्याने आयपीएल सामन्यांकडे चाहत्यांनी पाठ फिरविणे स्वाभाविक आहे. लीगमध्ये दिग्गज अपयशी ठरल्यानंतरही राष्ट्रीय संघात तेच ते चेहरे दिसणार नाहीत, याची काळजी बीसीसीआयने घ्यायला हवी, असाही एक प्रवाह आहे. नव्या प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन मिळायला हवे. आयपीएलमधून पुढे येणाऱ्या युवकांना पुरेशी संधी मिळणार असेल तरच आयपीएलची ही यशोगाथा खऱ्या अर्थाने साकार होईल.

Web Title: The Indian Premier League has become like a hen laying golden eggs for cricketers around the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.