दान भारताच्या बाजूने!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 07:24 AM2024-01-24T07:24:32+5:302024-01-24T07:25:13+5:30

भारतीय कंपन्यांची कामगिरी उर्वरित जगाच्या तुलनेत निश्चितच उजवी असल्याचे या आकडेवारीच्या आधारे म्हणता येते.

The Indian stock market has overtaken Hong Kong to become the fourth largest in the world. | दान भारताच्या बाजूने!

दान भारताच्या बाजूने!

संपूर्ण जग युद्ध आणि जागतिक मंदीच्या सावटाखाली असताना, भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दोन आशादायक बातम्या आल्या आहेत. युद्ध, मंदी, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) नोकऱ्या जाण्याच्या आशंकेच्या पार्श्वभूमीवर, सध्या जगभर रोजगारनिर्मिती तर घटली आहेच; पण आहेत त्या कर्मचाऱ्यांना घरी धाडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यासंदर्भातील भारतीय आकडेवारी मात्र उर्वरित जगाच्या तुलनेत चांगली आहे. मनुष्यबळ विकास सल्लागार क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी मर्सर मेटल अनुसार, जागतिक पातळीवर ३२ टक्के कंपन्यांनी कर्मचारी कपात केली असताना, भारतात मात्र केवळ १९ टक्के कंपन्यांनीच कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला.

भारतीय कंपन्यांची कामगिरी उर्वरित जगाच्या तुलनेत निश्चितच उजवी असल्याचे या आकडेवारीच्या आधारे म्हणता येते. या बातमीच्या पाठोपाठ आलेली दुसरी आशादायक बातमी म्हणजे, भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगला मागे सारत, जगात चौथा क्रमांक गाठला आहे. सोमवारी सर्व भारतीय शेअर बाजारांमध्ये सूचिबद्ध समभागांचे एकत्रित मूल्य ४,३३० अब्ज डॉलर्सवर पोहोचले होते. गत ५ डिसेंबरला भारतीय शेअर बाजाराने सर्वप्रथम ४ हजार अब्ज डॉलर्सचा आकडा गाठला होता. त्यापैकी २ हजार अब्ज डॉलर्सची भर केवळ गेल्या चार वर्षांत पडली आहे. शेअर बाजाराची सुदृढ प्रकृती ही देशाच्या सुदृढ अर्थव्यवस्थेचे द्योतक जरी नसली, तरी निदर्शक नक्कीच असते. त्यामुळे कर्मचारी कपातीच्या आघाडीवरील भारतीय कंपन्यांची चांगली कामगिरी आणि शेअर बाजाराची भरारी यांची गोळाबेरीज करून, भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाच्या तुलनेत चांगली कामगिरी बजावीत असल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष काढायला प्रत्यवाय नसावा.

भारतात कर्मचारी कपात झाली ती प्रामुख्याने स्टार्टअप्स आणि जागतिक बाजारपेठांवर अवलंबून असलेल्या कंपन्यांद्वारा! भारताच्या मोठ्या देशांतर्गत बाजारपेठेच्या बळावर उर्वरित क्षेत्रातील कंपन्यांनी मात्र उत्तम कामगिरी केली. जागतिक मंदीच्या चाहुलीचे धक्के देशांतर्गत बाजारपेठेने भारतीय कंपन्यांना बसू दिले नाहीत. त्याशिवाय भारतात पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेच्या क्षेत्रात नव्या रोजगाराचे सृजनही होत आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसते. कारणे आणि कारक कोणतेही असले तरी, जगाच्या तुलनेत भारताचा कर्मचारी कपातीचा आकडा बराच कमी असणे, हा नक्कीच भारताच्या आर्थिक अभ्युदयाचा संकेत म्हणता येईल. अर्थात केवळ संकेतांच्या भरवशावर बसून राहणाऱ्यांना नियती कधीच साथ देत नसते, हे विसरून चालणार नाही. संकेत हुरूप वाढविण्याचे काम करीत असतात.  त्यानंतर जे दुप्पट जोमाने कामाला लागतात, त्यांच्याच पदरात यश पडत असते.

संभाव्य जागतिक मंदी हे जगाच्या दृष्टीने संकट असले तरी, प्रचंड लोकसंख्या आणि त्यामधील तरुणाईचा मोठा टक्का या बळावर भारत तिचे संधीत रूपांतर करू शकतो. भारताला ही संधी दवडून चालणार नाही. युरोपातील देश त्यांच्या अंतर्गत समस्यांनी त्रस्त आहेत. रशिया युद्धात गुंतलेला आहे. मध्यपूर्व आशियातील स्थितीमुळे अमेरिकाही अप्रत्यक्षरीत्या युद्धात गुरफटलेली आहे. चीन अजूनही कोविडच्या धक्क्यातून बाहेर पडू शकलेला नाही. बड्या कंपन्या आणि गुंतवणूकदार पहिली संधी मिळताच चीनमधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत. अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडल्याही आहेत. परिणामी, चीनची जागा घेण्यासाठी जगाची नजर भारताकडे लागलेली आहे. जागतिक गुंतवणूकदार मोठ्या संख्येने भारताकडे वळू लागले आहेत. त्याचाच दृश्य परिणाम म्हणजे भारतीय शेअर बाजाराची चौथ्या स्थानी झेप! गेल्या वर्षभरात जगभरातील शेअर बाजार हिंदकळत असताना, भारतीय शेअर बाजाराने मात्र दमदार वाटचाल केली आहे.

अलीकडल्या काही काळात भारतीय मध्यमवर्ग, विशेषतः  युवा वर्ग, मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करू लागला आहे. त्यामुळे अनेक भारतीय कंपन्या शेअर बाजारातून भांडवल उभे करू लागल्या आहेत. भारतीय धोरणकर्त्यांनी त्याला अनुरूप अशी पावले वेळेत उचलल्यास, आगामी काही वर्षांत भारत ‘जगाचा कारखाना आणि पुरवठादार’ होऊ शकतो. त्या दिशेने हळूहळू वाटचाल सुरू झाली आहे; परंतु झपाटा वाढण्याची गरज आहे. तो न वाढवल्यास दक्षिण कोरिया, फिलिपाइन्स, व्हिएतनामसारखे बरेच देश भारताची संधी हिरवण्यासाठी सज्जच आहेत. भविष्याच्या उदरात काय दडलेले आहे, हे काळच  सांगेल; परंतु सध्या तरी दान भारताच्या बाजूने पडताना दिसत आहे.

Web Title: The Indian stock market has overtaken Hong Kong to become the fourth largest in the world.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.