साहेबांची संगीत खुर्ची! पंतप्रधान बदलल्यामुळे आलेली अस्थिरता चिंतेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 11:44 AM2022-10-22T11:44:19+5:302022-10-22T11:45:00+5:30
Britain : अल्पावधीसाठी पंतप्रधानपदाचा जॉर्ज कॅनिंग यांचा जवळपास दोनशे वर्षे जुना ११९ दिवसांचा विक्रम मोडल्याची नामुष्की त्यांच्या नावावर नोंद झाली.
आवडत्या नेत्यासारखा वेश परिधान करून, त्याच्या वागण्या-बोलण्याची नक्कल करून आणि तसे बनण्याची स्वप्ने पाहून चालत नाही, तर त्यासाठी मुळातच अंगी गुणवत्ता असावी लागते, हे ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या राजीनाम्याने सिद्ध झाले आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणाऱ्या मागरिट थॅचर यांच्यासारखे दिसण्याचा, वागण्याचा प्रयत्न शाळेत असताना लिझ ट्रेस करायच्या. थॅचर, तसेच थेरेसा मे यांच्यानंतरच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान म्हणून १०, डाऊनिंग स्ट्रीटवर राहायला जाताना त्यासाठी त्यांचे अपार कौतुकही झाले. पण, आर्थिक मंदीची वावटळ जगाच्या कानाकोपऱ्यात आकार घेत असताना ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची सुरुवातही त्यांना करता आली नाही. ४७ वर्षांच्या लिझ ट्रस यांना अवघ्या ४५ दिवसांत, दीड महिन्यात राजीनाम्याची घोषणा करावी लागली.
अल्पावधीसाठी पंतप्रधानपदाचा जॉर्ज कॅनिंग यांचा जवळपास दोनशे वर्षे जुना ११९ दिवसांचा विक्रम मोडल्याची नामुष्की त्यांच्या नावावर नोंद झाली. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ट्रस यांनी ज्यांना अखेरच्या टप्प्यात मागे टाकले. ते इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई, अक्षता मूर्ती यांचे पती ऋषी सुनक आता पंतप्रधान बनतील का, ही भारतीयांची उत्कंठा या घडामोडींनी पुन्हा उफाळून नक्कीच आली आहे खरे. पण, आता ब्रिटनचे राजकारण, अर्थकारण खूप पुढे गेले असल्याने सुनक पंतप्रधान बनले तरी किती कर्तबगार ठरू शकतील, याची शंकाच आहे. आर्थिक संकटातून ब्रिटनला बाहेर काढण्यासाठी लिझ ट्रस यांची पावले सुरुवातीपासूनच चुकत गेली. अत्यंत जवळचे मानले जाणारे क्वासी कार्टंग यांच्यावर त्यांनी अर्थ खात्याची जबाबदारी सोपविली खरी. परंतु, त्यांच्या मिनी बजेटने देशाची, संसदेची व सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांची पुरती निराशा झाली. विशेषतः तिजोरीत पैसा नसताना घोषित केलेला तब्बल ६० अब्ज पौंड खर्चाच्या ऊर्जा सवलत योजनेवर प्रचंड टीका झाली.
करकपातीलाही खासदारांनी विरोध केला. कार्टंग यांच्याऐवजी अर्थमंत्री बनलेले जेरेमी हंट यांनी करकपात व एनर्जी बिल हे दोन्ही निर्णय मागे घेतले. ट्रस यांची कोंडी होऊ लागली. दरम्यान, अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत पौंडाची घसरण सुरू झाली. प्रचंड महागाई व शेअर बाजारातील उलथापालथीच्या मुद्यावर माध्यमे, सत्ताधारी खासदार आणि या सगळ्या घडामोडींमुळे बळ मिळालेला विरोधी मजूर पक्ष अशी चोहोबाजूंनी सरकारवर टीकेची झोड उठवली गेली. अननुभवी लिझ ट्रस हा दबाव सहन करू शकल्या नाहीत. त्यांच्या राजीनाम्यामुळे ब्रिटनमधील राजकीय अस्थिरता मागच्या पानावरून पुढे चालू राहिली आहे. अशाच पद्धतीने स्वपक्षाच्या खासदारांच्या नाराजीमुळे, सहकारी मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे कंटाळून बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपद सोडले. त्यानंतर हुजूर पक्षातून ऋषी सुनक, लिझ ट्रस, जेरेमी हंट वगैरे मंडळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होती. सुनक व ट्रस यांच्यात अंतिम लढत झाली.
खासदारांचा पाठिंबा सुनक यांना तर पक्षाचे कार्यकर्ते श्रीमती ट्रस यांच्या बाजूने राहिले. हुजूर पक्षाच्या सक्रिय कार्यकत्यांनी काळा-गोरा भेदभाव केल्यानेच सुनक यांची संधी हुकली व दीड महिन्यांपूर्वी लिझ ट्रस पंतप्रधान बनल्या. दिवंगत महाराणी एलिझाबेथ यांनी सत्तासूत्रे सोपविलेल्या त्या अखेरच्या पंतप्रधान ठरल्या. आता या पदावर ऋषी सुनक येवोत की आणखी कुणी, त्यांच्यापुढे आव्हानांचा भलामोठा डोंगर उभा आहे. आर्थिक संकट, महागाई वगैरे मुद्दे आहेतच. सत्ताधारी पक्षाची लोकप्रियता पार २१ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. १९९० नंतरची तीस-बत्तीस वर्षांमधील ही हुजूर पक्षाच्या लोकप्रियतेची किमान पातळी आहे. याउलट ३३ टक्के लोकप्रियतेसह मजूर पक्षाची पुन्हा सत्तेवर येण्याची उमेद वाढली आहे. म्हणूनच आता हा पंतप्रधानपदाच्या संगीत खुर्चीचा खेळ पुरे झाला.
मध्यावधी निवडणूक घ्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सार्वत्रिक निवडणुकांना अजून दोन वर्षांचा अवधी आहे. हुजूर पक्षाकडे संसदेत बहुमतही आहे. तथापि, डेव्हिड कॅमेरून, थेरेसा में, बोरिस जॉन्सन, लिझ ट्रस आणि आता येणारे नवे असे वारंवार पंतप्रधान बदलल्यामुळे आलेली अस्थिरता चिंतेचा विषय आहे. अशा वेळी ऋषी सुनक, जेरेमी हंट अथवा श्रीमती पेनी मॉरडॉन्ट असा एखादा नवा चेहरा नवी उमेद घेऊन पुढे येतो का आणि गोऱ्या साहेबांचा देश या संगीत खुर्चीच्या चक्रातून सावरतो का, ही उत्सुकता आहे.