फाशी देणाऱ्या न्यायाधीशांनाच ‘मृत्युदंड’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:43 IST2025-01-24T09:42:57+5:302025-01-24T09:43:18+5:30

Iran News: अशांत आणि अस्थिर देश म्हणून इराण आधीपासूनच प्रसिद्ध आहे. त्यात हिजाब घालणाऱ्यास विरोध करणाऱ्या महसा अमिनी या तरुणीचा १६ सप्टेंबर २०२२ रोजी पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणी जनता पेटून अधिकच उठली होती तेव्हापासून ते आजतागायत कमी-अधिक प्रमाणात इराणमध्ये लोकांचा प्रक्षोभ सुरूच आहे.  

The judges who executed the execution deserve the 'death penalty'! | फाशी देणाऱ्या न्यायाधीशांनाच ‘मृत्युदंड’!

फाशी देणाऱ्या न्यायाधीशांनाच ‘मृत्युदंड’!

अशांत आणि अस्थिर देश म्हणून इराण आधीपासूनच प्रसिद्ध आहे. त्यात हिजाब घालणाऱ्यास विरोध करणाऱ्या महसा अमिनी या तरुणीचा १६ सप्टेंबर २०२२ रोजी पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणी जनता पेटून अधिकच उठली होती तेव्हापासून ते आजतागायत कमी-अधिक प्रमाणात इराणमध्ये लोकांचा प्रक्षोभ सुरूच आहे.  

हिजाब हा केवळ एक विषय, पण जगात सर्वाधिक फाशी देणारा देश म्हणूनही इराणची ख्याती आहे. जगात कुठेही दिल्या जात नाहीत, इतक्या फाशीच्या शिक्षा दरवर्षी इराणमध्ये दिल्या जातात. फाशीच्या या शिक्षेविरुद्ध आणि सुप्रीम कोर्टात जे न्यायाधीश या शिक्षा सुनावतात, त्यांच्या विरोधातही लोकांचा अतिशय राग आहे. त्याचाच परिपाक म्हणून काही दिवसांपूर्वीच इराणची राजधानी तेहरान येथे एका इसमाने थेट सुप्रीम कोर्टात शिरून तिथल्या दोन न्यायाधीशांना गोळ्या घालून ठार केलं. त्यानंतर त्यानं स्वत:ही आत्महत्या केली. हे दोन्ही न्यायाधीश राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, घुसखोरी या विषयांवर सुनावणी करायचे. थेट सुप्रीम कोर्टात आणि तेही न्यायाधीशांची हत्या करणं ही बाब गंभीरच, पण जे न्यायाधीश ‘निरपराध’ लोकांची ‘हत्या’ करतात, त्यांना फाशी देतात, त्यांनाही या जगात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनाही ‘प्राणदंड’च दिला पाहिजे, अशीच अनेक नागरिकांचीही भावना आहे.

अली रजिनी आणि मोघीसेह अशी मारल्या गेलेल्या न्यायाधीशांची नावं आहेत. इराणी सर्वोच्च न्यायालयातील ते ज्येष्ठ न्यायाधीश होते आणि लोकांना फासावर चढविण्यात त्यांचाच मोठा हातभार होता. आजवर अनेक ‘आरोपीं’ना त्यांनी फासावर चढवलं आहे. त्याचमुळे या न्यायाधीशांना ‘हँगमॅन’ म्हणूनही ओळखलं जात होतं. विशेष म्हणजे या न्यायाधीशांना मारल्यामुळे खुद्द इराणमध्येच अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. ज्या मारेकऱ्यानं त्यांना मारलं, तो मारेकरीही न्याय विभागाचाच कर्मचारी होता. फाशीच्या शिक्षेवरून इराणमध्ये किती असंतोष पसरलेला आहे हे यावरून लक्षात येईल. सोशल मीडियावरही या घटनेबद्दल काहींनी आनंदोत्सव साजरा केला. 

ज्या दोन्ही न्यायाधीशांना गोळ्या मारल्या गेल्या, त्यातील रजिनी या न्यायाधीशांच्या हत्येचा प्रयत्न १९८८ मध्येही करण्यात आला होता, पण त्यावेळी ते बालंबाल बचावले होते. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीला मॅग्नेटिक बॉम्ब लावला होता. सातत्यानं आणि ‘क्षुल्लक’ कारणांमुळेही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे दुसरे न्यायाधीश मोघिसेह यांच्यावर तर २०१९मध्ये अमेरिकेनं थेट बंदीच घातली होती. 

इराणमध्ये फाशी दिल्या जाणाऱ्या आरोपींची संख्या किती असावी? दरवर्षी तिथे किती आरोपींना फाशी दिली जाते? - इराणमध्ये गेल्यावर्षी म्हणजे २०२४मध्ये तब्बल ९०१ लोकांना फाशी दिली गेली. त्यात तब्बल ३१ महिला होत्या.  अर्थात हा आहे अधिकृत आकडा. अनधिकृतपणे फासावर लटकवलेल्या लोकांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक आहे, असं जाणकारांचं म्हणणं आहे. सरकारच्या विरोधकांनाही इथे सरसकट फासावर लटकवलं जाण्याचा इतिहास आहे. बऱ्याचदा तर जाहीर फाशी दिली जाते. इराणमध्ये नऊ वर्षावरील मुली आणि १५ वर्षांवरील मुलांनाही फाशी दिली जाऊ शकते.

Web Title: The judges who executed the execution deserve the 'death penalty'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.