The Kashmir Files: बहुत देर कर दी हुजूर आते-आते...! मुस्लिमांना खलनायक करुन पंडितांच्या जखमा कशा भरून येतील?

By विजय दर्डा | Published: March 21, 2022 07:40 AM2022-03-21T07:40:37+5:302022-03-21T07:42:08+5:30

‘द काश्मीर फाईल्स’मधली हिंदूंची कत्तल पाहून देशभर आग भडकता कामा नये. मुस्लिमांना खलनायक करून पंडितांच्या जखमा कशा भरून येतील?

the kashmir files movie how can the wounds of pandits be healed by making muslim villains | The Kashmir Files: बहुत देर कर दी हुजूर आते-आते...! मुस्लिमांना खलनायक करुन पंडितांच्या जखमा कशा भरून येतील?

The Kashmir Files: बहुत देर कर दी हुजूर आते-आते...! मुस्लिमांना खलनायक करुन पंडितांच्या जखमा कशा भरून येतील?

Next

विजय दर्डा

द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची सध्या देशातच नव्हे, तर जगभर चर्चा आहे. आठवडाभरात सिनेमाने पुष्कळ पैसे कमावले हे तर खरेच, पण  त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे सर्वत्र चर्चा-वादविवादाचा मोठा कल्लोळ उडवून दिला. खुद्द पंतप्रधान मोदी म्हणाले, हा सिनेमा लोकांनी जरूर पाहावा!

काश्मीरमध्ये हिंदूंची खुलेआम कत्तल झाली आणि काश्मिरी पंडितांना आपले घरदार सोडून विस्थापित व्हावे लागले, त्यावर हा सिनेमा आधारित आहे. हे सारे पडद्यावर  पाहताना हृदय हेलावते, रक्त उसळते. हल्ली जो भेटतो, तो फक्त या चित्रपटाचीच चर्चा करतो. प्रत्येकाच्या मनात तेच प्रश्न असतात. दहशतवाद्यांनी गिरीजा टिक्कूवर बलात्कार करून करवतीने तिचे तुकडे का केले असतील? ज्या शेजाऱ्यावर जिवापलीकडे विश्वास होता, त्यानेच  जीव वाचविण्यासाठी धान्याच्या कोठीत पंडित लपला आहे असे सांगून, विश्वासघात का केला असेल? पंडिताच्या रक्ताने भरलेले गहू पत्नीच्या तोंडात कोंबण्याचा प्रसंग किती भयानक असेल...? देशभरात  भयावह उत्तेजना मला जाणवते आहे, भविष्याचा विचार थरकाप उडवतो आहे. 

पाकिस्तानवर विश्वास ठेवणाऱ्या नराधमांनी काश्मिरी पंडितांच्या रक्ताने झेलम, चिनाब नद्यांचे पाणी लालेलाल केले, त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही. खून मैत्रीचा झाला, विश्वास... आपलेपणाची शिकार झाली. राखीला रक्त लागले आणि आई या शब्दाचे जणू पावित्र्यच  नष्ट झाले. मानवता, विश्वास आणि प्रेमाला कलंकित करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. मानवता, बंधुभाव आणि पवित्र  नात्यांना रक्ताचे टिळे लागले. त्या काळात निर्दय, नराधमांनी जे काही केले, त्याचे परिणाम लोक आजवर भोगत आले आहेत. हे कधीतरी संपवावे लागेल. जगण्याचा मुख्य आधार विश्वासच असतो. काश्मीरमध्ये या  विश्वासाचे बी पुन्हा रुजत घालावे लागेल.

मागच्याच महिन्यात मी काश्मीर खोऱ्यात जाऊन आलो. २१ फेब्रुवारीच्या याच स्तंभात काश्मीरचे दु:ख मी मांडले होते. ‘झिरो टॉलरन्स’ धोरणामुळे दहशतवाद आटोक्यात येताना दिसत होता... तेव्हाच मला जाणवले होते की, काश्मीरच्या वेदनांवर विश्वासाचे, प्रेमाचे मलम लावण्याची फार गरज आहे. मी तो प्रवास केला, तेव्हा तर या सिनेमाची चर्चाही नव्हती. पण “काश्मीर फाईल्स” प्रदर्शित झाला आणि काश्मिरी पंडितांच्या दु:खाची चर्चा देशभर सुरू झाली. ती तशी सुरू होणे स्वाभाविकही होते. कारण १९९० च्या आसपास सुमारे दीड लाख लोक विस्थापित झाले. आपल्याच देशात कोणी निर्वासित व्हावे, याच्याइतकी दुर्दैवाची गोष्ट नाही. हा मुद्दा मी आजवर प्रत्येक व्यासपीठावर मांडला आहे. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाकडे मी नेहमीच लक्ष वेधत आलो आहे. काश्मिरी पंडितांच्या घरवापसीसाठी मनमोहन सिंग सरकारने जम्मूत ५२४२ घरे आणि बडगाम जिल्ह्यातील शेखपोरात २०० सदनिका तयार केल्या. तेव्हाच मी म्हटले होते, विस्थापितांना नुसती घरे बांधून देणे हे  पुरेसे नाही. काश्मिरी पंडितांवर हल्ला करण्याची कोणी हिंमतच करणार नाही, अशी स्थिती निर्माण करता आली पाहिजे. जो जिथे राहत होता, तिथेच  परत गेला पाहिजे... कधी ना कधी तरी अशी स्थिती उत्पन्न होईल अशी आशा सर्वांना होती आणि हा सिनेमा आला. आता एक गाणे आठवतेय... ‘बहुत देर कर दी हुजूर आते आते...!’

- खपली काढली तर जखमा ताज्या होतात, असे आपल्याकडे म्हटले जाते. जखमेवर इलाज करत राहिलेच पाहिजे. वातावरण बिघडू नये म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी मुंबई दंगलीवरील श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल खुला करण्यास मनाई केली होती. आज हा सिनेमा पाहिलेले लोक विचारतात, हिंदूंची खुलेआम कत्तल करणाऱ्या अहमद डर ऊर्फ बिट्टा कराटे याने एका मुलाखतीत तशी कबुली दिली होती, तरी त्याला शिक्षा का झाली नाही? - हा प्रश्न  योग्यच आहे, त्याचे उत्तर मिळालेच पाहिजे. या नृशंस हत्याकांडाच्या वेळी सरकार कोणाचे होते, याने फरक पडत नाही. फारूक अब्दुल्ला मुख्यमंत्री असतानाही काश्मीरमध्ये हिंदू लोक मारले जात होते. जगमोहन राज्यपाल झाल्यावरही हत्या थांबल्या नाहीत. दोघांच्याही काळात हिंदू इथून पळाले. 

१९८९ पासून २००३ पर्यंत काश्मिरात हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांची यादी ‘सेंटर फॉर इंटिग्रेटेड अँड होलिस्टिक स्टडीज’ने तयार केली आहे. हल्ल्यांची बीभत्सता अंगावर शहारे आणते. राज्य आणि केंद्र सरकार तेव्हा काय करत होते, असा प्रश्न लगेच मनात येतो. त्यावेळच्या नेत्यांनाही  मी हा प्रश्न अनेकदा विचारला आहे, पण अपयश कबूल करण्याचे  धैर्य त्यांच्यात नाही. ‘मुस्लिमांना त्रास दिला’, अशी प्रतिमा निर्माण होण्याच्या भीतीने दहशतवाद्यांवर कारवाई केली गेली नाही का? - या प्रश्नावरही सगळे गप्प बसतात. असा विचार कोणी केला असेल, तर ती मोठी चूक होय. हिंदूंना भारत जितका प्रिय आहे, तितकाच मुस्लिमांनाही आहे. दहशतवादी भले एका धर्माचे नाव घेत असतील, पण दहशतवाद्याला  कोणता धर्म नसतो, हे विसरता कामा नये. काश्मिरात दहशतवाद जन्म घेत होता, तेव्हाच तो मुळात उखडून टाकून पाकिस्तानला हे कठोर शब्दात सांगायला हवे होते की, गरज पडली तर आम्ही तुम्हालाही उचलून फेकू. इंदिरा गांधींनी असेच केले होते.

सद्य:स्थितीत मी इतकेच म्हणेन की, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात हिंदूंची कत्तल पाहून देशभरात जी उत्तेजना निर्माण झाली आहे ती सार्थ ऊर्जेत परिवर्तित करता आली पाहिजे. या उत्तेजनेतून आग भडकता कामा नये, त्यातून स्नेहाची ऊब तयार करता आली पाहिजे. या प्रक्रियेत काश्मिरातील मुस्लिमांना त्रास होता कामा नये, त्यांच्याबद्दल घृणा उत्पन्न होता काम नये. काश्मिरी मुसलमानांना खलनायक म्हणून रंगवून पंडितांचा फायदा होणार नाही. घृणेतून केवळ विभाजन आणि हानी होते. सर्वांची बाजू ऐकून त्यांना मदत केली पाहिजे. पंडितांनी घाटीत पुन्हा येऊन राहावे यासाठी मुसलमानांनी तसे वातावरण तयार केले पाहिजे. राजकारणातला एक पक्ष जो खेळ खेळू पाहतो आहे त्याबद्दलही सतर्क असले पाहिजे.

जाता जाता :

गेल्या आठवड्यात मी मालदीवला गेलो होतो. दोघे मूळचे दुबई निवासी आणि दोन दुबईत जन्मून पाकिस्तानात राहायला गेलेले असे लोक मला भेटले. आई-वडील दुबईत कामाला आले आणि तेथेच राहिले. ते सांगत होते, फी जास्त असूनही त्यांच्या वडिलांनी मुलांना दुबईच्या भारतीय शाळेमध्ये घातले, कारण पाकिस्तानी शाळेत ते द्वेष शिकले असते. त्यांच्या मोबाइलमध्ये खान अब्दुल गफार खान, पंडित नेहरू आणि ‘फ्रीडम ॲट मिडनाइट’ पुस्तकाचे फोटो होते. गप्पा रंगात आलेल्या असताना आमच्या बरोबरचे अरबी गृहस्थ पटकन म्हणाले, पाकिस्तान काय देश आहे का? लोकांना सरळसरळ गॅस चेम्बरमध्ये कोंडून ठेवले आहे. पाकिस्तानी असलेले दोघेही त्यांच्या सुरात सूर मिसळत होते आणि मी फक्त पाहत होतो...

Web Title: the kashmir files movie how can the wounds of pandits be healed by making muslim villains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.