मिस्त्रींच्या मृत्यूचा धडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:07 AM2022-09-06T11:07:23+5:302022-09-06T11:09:49+5:30
किमान विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तरी अशा मंडळींनी धडा घ्यावा आणि प्रवास करताना नियमांचे काटेकोर पालन करून स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात न घालण्याचा धडा घ्यावा!
मानवी आयुष्य अनमोल आहे आणि जीवन क्षणभंगुर आहे! प्रत्येकाला ही वस्तुस्थिती ज्ञात आहे आणि तरीही अकारण जीव गमाविणाऱ्यांची संख्या मोठी आहे! कधी स्वत:च्या तर कधी इतरांच्या चुकीमुळे ! रोजच रस्ते अपघातात काही दुर्दैवी जीव बळी पडतातच; पण जेव्हा एखाद्या क्षेत्रात मोठे कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तीचा अपघातात जीव जातो, तेव्हा त्यांच्याशी संपर्क नसलेल्या लोकांच्याही मनात कालवाकालव होते. रविवारी दुपारी आलेली सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाची वार्ता अशीच संपूर्ण देशाला चुटपुट लावून गेली. मिस्त्री हे बडे उद्योगपती होते. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार मृत्यूसमयी ते तब्बल २३० अब्ज रुपयांपेक्षाही जास्त संपत्तीचे मालक होते. जगातील आघाडीच्या धनवंतांमध्ये गणना होणारे मिस्त्री हे तसे प्रसारमाध्यमांपासून दूर राहणारे व्यक्तिमत्त्व होते. ते प्रकाशझोतात आले ते २०१३ मध्ये टाटा सन्स या टाटा उद्योगसमूहाच्या ‘होल्डिंग कंपनी’च्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली तेव्हा! अवघ्या तीनच वर्षात त्यांच्याकडून ते पद काढून घेण्यात आले. त्या निर्णयाला मिस्त्री यांनी न्यायालयात आव्हान दिले आणि त्यामुळे ते राष्ट्रीय चर्चेचा विषय झाले.
पुढे न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला. त्यानंतर त्यांच्यावरील प्रसारमाध्यमांचा झोत कमी झाला; मात्र रविवारी दुर्दैवी अखेर झाल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले आहे. एखाद्या बड्या व्यक्तिमत्त्वाचा अपघाती मृत्यू होतो तेव्हा त्यामागे घातपात असल्याची चर्चा लगेच सुरू होते. प्रिन्सेस डायनाच्या १९९७ मधील अपघाती निधनापासून ते अगदी अलीकडील विनायक मेटे यांच्या मृत्यूपर्यंत, अनेकदा तसा अनुभव आला आहे. त्यामुळे मिस्त्री यांच्या निधनासंदर्भात तसे झाले नसते तरच नवल! मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे आणि त्यामधून सत्य काय ते बाहेर येईलच; परंतु प्रथमदर्शनी तरी निव्वळ मानवी चुकीमुळे अपघात झाल्याचे आणि स्वत: मिस्त्री यांच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव गेल्याचे दिसत आहे. ते ज्या गाडीतून प्रवास करीत होते, ती गाडी जगभर नावाजलेल्या कंपनीद्वारा उत्पादित महागडी गाडी होती.
सर्वसामान्य गाड्यांमध्ये न आढळणाऱ्या विविध सुरक्षाविषयक उपाययोजना त्या गाडीत होत्या. गाडीत एकूण सात एअरबॅग होत्या आणि त्या उघडल्या होत्या, असे छायाचित्रांवरून दिसते. विशेष म्हणजे गाडीचा समोरचा भाग मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त होऊनही, समोरील दोघेही वाचले आणि अजिबात हानी न पोहोचलेल्या पाठीमागील भागातील दोघेही मात्र मृत्युमुखी पडले ! प्रामुख्याने या कारणामुळेच मिस्त्री यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याच्या चर्चेला तोंड फुटले. अशी चर्चा सुरू करणाऱ्यांनी एक महत्त्वाची बाब लक्षात घेतलेली नाही आणि ती म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या दोघांनीही सीटबेल्ट लावलेला नव्हता! वेगात असलेली गाडी जेव्हा टकरीमुळे अचानक थांबते तेव्हा प्रवासी प्रचंड वेगाने समोरच्या बाजूला फेकले जातात. ते होऊ नये यासाठीच सीटबेल्टची योजना असते. एका अभ्यासानुसार, सुमारे ७० किलो वजनाची व्यक्ती सीटबेल्ट लावून गाडीत बसली असेल आणि केवळ ताशी ५० किलोमीटर वेगाने जरी प्रवास करीत असेल, तरी समोरच्या बाजूने टक्कर झाल्यास, त्या व्यक्तीवर गुरुत्वाकर्षण शक्तीच्या ३० पट (३० जी) एवढे बल कार्य करते. सोप्या भाषेत, त्या व्यक्तीसाठी तो अनुभव जवळपास २४०० किलो वजन आदळण्यासारखा असतो! मिस्त्री यांची गाडी तर ताशी १०० किलोमीटरपेक्षाही जास्त वेगात होती! त्यामुळे केवळ सीटबेल्ट लावण्याकडे केलेले दुर्लक्षच त्यांना भोवल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसते.
दुर्दैवाने आपल्या देशात सीटबेल्ट लावण्याकडे प्रचंड दुर्लक्ष होते. विशेषतः मागील आसनांवर बसलेल्यांना तर त्याची अजिबात आवश्यकता वाटत नाही. धनवान गाडी विकत घेताना जास्तीत जास्त सुविधा असाव्या यासाठी आग्रही असतात आणि गाडीचा वापर करताना सीटबेल्ट लावणे कमीपणाचे समजतात! माझ्या गाडीत अमुक एवढ्या एअरबॅग आहेत, अशी फुशारकी मारतात आणि सीटबेल्ट लावलेला नसल्यास एअरबॅग उघडत नाहीत, याकडे दुर्लक्ष करतात ! किमान विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तरी अशा मंडळींनी धडा घ्यावा आणि प्रवास करताना नियमांचे काटेकोर पालन करून स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात न घालण्याचा धडा घ्यावा!