एकतेचा महाकुंभ ही नव्या युगाची पहाट! इथे ना कोणी शासक होता ना...; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेला विशेष लेख...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 07:24 IST2025-02-28T07:19:03+5:302025-02-28T07:24:14+5:30
प्रयागराजमध्ये नुकताच संपन्न झालेला महाकुंभ हे एक अद्वितीय आयोजन होते. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचे महाकुंभ हे मूर्तरूप आहे, असे मी मानतो!

एकतेचा महाकुंभ ही नव्या युगाची पहाट! इथे ना कोणी शासक होता ना...; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेला विशेष लेख...
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
प्रयागराजच्या पवित्र भूमीवर महाकुंभ यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे. या पवित्र पर्वासाठी सुमारे १४० कोटी भारतीयांच्या भावना एकाच जागी, एकाच वेळी एकवटल्या होत्या, असा हा एकतेचा महाकुंभ होता. गेल्या दीड महिन्यात देशाच्या कोनाकोपऱ्यातून कोट्यवधी लोक संगमावर येत होते. संगमाच्या जागी भावभक्तीच्या लाटा उसळत होत्या. गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा हा पवित्र संगम प्रत्येक यात्रेकरूचे मन उत्सुकता, ऊर्जा आणि विश्वासाने भरून टाकत होता.
प्रयागराजमधील महाकुंभ म्हणजे आधुनिक व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक, नियोजन आणि धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासाठी एक अभ्यासाचा विषय ठरला आहे. जगात या भव्यतेशी समांतर असेल किंवा त्याचे उदाहरण ठरेल, असे आयोजन कुठेही झालेले नाही. या कोट्यवधी लोकांना कोणतेही औपचारिक निमंत्रण देण्यात आले नव्हते आणि कधी-कुठे जायचे आहे, यासंदर्भात त्यांच्यात आधी कोणताही संवाद झालेला नव्हता. तरीही, कोटीच्या कोटी लोक स्वतःच्या मर्जीने महाकुंभाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघाले आणि त्यांनी पवित्र जलात स्नान करण्याचे भाग्य अनुभवले. महिला, वयोवृद्ध, दिव्यांग बंधू-भगिनी, अशा सर्वांनी संगमावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला. या सोहळ्यात भारतातील तरुणांचा सहभाग माझ्यासाठी विशेष हृदयस्पर्शी होता.
आपल्या वारशाचा अभिमान बाळगणारा भारत एका नव्या ऊर्जेने पुढे जात आहे. ही एका नवीन युगाची पहाट आहे, जी नव्या भारताचे भविष्य लिहिणार आहे. कोट्यवधी लोकांमध्ये आत्मविश्वास जागवणाऱ्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचे हे मूर्तरूप होते. विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आता आपण याच भावनेने एकत्र यायला हवे.
यापूर्वी भक्ती चळवळीतील संतांनी भारतभरातील आपल्या सामूहिक संकल्पाची ताकद ओळखून त्याला प्रोत्साहन दिले होते. स्वामी विवेकानंदांपासून ते अरविंदांपर्यंत प्रत्येक थोर विचारवंताने आपल्याला सामूहिक संकल्पांच्या शक्तीची जाणीव करून दिली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधींनीही याचा अनुभव घेतला होता. विकसित भारतासाठी लोकांची ही सामूहिक शक्ती ज्या प्रकारे एकत्र येत आहे, त्याचा मला विशेष आनंद वाटतो.
वेदांपासून ते विवेकानंदांपर्यंत, प्राचीन धर्मग्रंथांपासून ते आधुनिक उपग्रहांपर्यंत, भारताच्या महान परंपरेने हा देश घडवला आहे. एक नागरिक म्हणून मी प्रार्थना करतो की, आपण आपल्या पूर्वजांच्या आणि संतांच्या आठवणींमधून नवी प्रेरणा घ्यावी. हा एकतेचा महाकुंभ आपल्याला नवे संकल्प घेऊन पुढे जाण्यासाठी साहाय्य करेल. आपण एकतेला आपले मार्गदर्शक तत्त्व बनवूया. राष्ट्रसेवा हीच ईश्वरसेवा आहे, या विचाराने काम करूया.
प्रयागराजमध्ये, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो, तिथे उपस्थित असताना, तर नद्यांच्या प्रती बांधीलकीचा माझा संकल्प अधिकच दृढ झाला. आपल्या नद्यांची स्वच्छता आपल्या स्वतःच्या जगण्याशी खूपच खोलवर जोडली गेलेली आहे. आपल्या नद्यांना जीवनदायिनीप्रमाणे जपणे हीच आपली जबाबदारी आहे. या महाकुंभाने नद्यांच्या स्वच्छतेसाठी सातत्याने काम करत राहण्याची प्रेरणाही दिली आहे.
एवढ्या भव्य सोहळ्याचे आयोजन करणे, हे काही सोपे काम नव्हते. मी माता गंगा, माता यमुना आणि माता सरस्वतीला प्रार्थना करतो की, आमच्या सेवेमध्ये काही त्रुटी राहिली असेल, तर त्यांनी आम्हाला क्षमा करावी. मी जनता जनार्दनाला, लोकांना देवत्वाचे प्रतीक मानतो. त्यांची सेवा करण्याच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव राहिली असेल, तर जनतेनेही क्षमा करावी अशी माझी प्रार्थना आहे.
राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, इथे कुणीही शासक किंवा प्रशासक नव्हते, तर प्रत्येक जण समर्पण भावनेने काम करणारे सेवकच होते. स्वच्छता कर्मचारी, पोलिस, नावाडी, वाहन चालक, अन्नदानाची सेवा देणारे लोक- अशा प्रत्येकाने अथक परिश्रम घेतले. अनेक अडचणी सोसूनही प्रयागराजच्या जनतेने ज्या उत्साहाने यात्रेकरूंचे स्वागत केले, त्याला तोड नाही. त्यांचे आभार! महाकुंभाच्या या सोहळ्याचा महाशिवरात्रीला यशस्वी समारोप झाला असला, तरी महाकुंभाने जागृत केलेली आध्यात्मिक शक्ती आणि ऐक्याची भावना भावी पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहणार आहे.