मुलीला आईने फेकलं अस्वलासमोर... पुढे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 10:01 AM2022-02-09T10:01:51+5:302022-02-09T10:04:03+5:30
अशा या ‘रानटी’ अस्वलाच्या समोर स्वत:च्याच मुलीला फेकणं म्हणजे जगावेगळीच घटना. उजबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे नुकतीच ही घटना घडली.
आईची थोरवी सगळ्यांनाच माहीत आहे; पण एखाद्या मातेनं आपल्याच लहानग्या मुलीला जंगली अस्वलासमोर फेकलं तर? आश्चर्य वाटेल, पण अशी घटना नुकतीच घडली आहे आणि ती प्रचंड व्हायरलही झाली आहे. या घटनेचे व्हिडिओही सर्वत्र फिरताहेत. पण त्याआधी अस्वल हा प्राणी म्हणजे काय चीज आहे, हे जाणून घेऊ. गावोगावी जाऊन अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी अपरिचित नाही. त्या दरवेशाच्या तालावर अस्वल अक्षरश: ‘नाचत’ असतं. दरवेशी म्हणेल तसं ऐकत असतं.. अस्वलाचा हा खेळ कुठे रस्त्यावर चालू असेल तर अनेक जण; अगदी मोठी माणसंही थांबून तो खेळ पाहातात.
पण ज्याला खेळवू शकू इतका अस्वल हा प्राणी साधा आहे? अनेकांना अस्वलाबाबत माहीत नाही, पण वन्यप्राणी अभ्यासक किंवा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारा,.. ‘जंगलातला सर्वात खतरनाक प्राणी कोणता?’ वाघ, सिंह, हत्ती अशा प्राण्यांची नावं तो सांगेल असं तुम्हाला वाटेल, पण ज्यानं जंगल पाहिलं आणि अनुभवलं असेल, असा जाणकार माणूस नक्कीच सांगेल, ‘जंगलातला सर्वांत खतरनाक प्राणी म्हणजे अस्वल!’ कारण अस्वल कोणत्या वेळी कसं वागेल याचा काहीच नेम नाही. ‘धोका’ वाटला नाही, वाघ-सिंहाच्या ‘राज्यात’ मुद्दाम जाऊन तुम्ही काही ‘खोड्या’ केल्या नाहीत, त्यांची पिलं जवळ असताना तुम्ही तिथे गेला नाहीत, ते भुकेले नसतील, तर बऱ्याचदा हे प्राणी तुम्हाला ‘सोडून’ही देतील.. काहीही करणार नाहीत, पण अस्वलाचं तसं नाही. त्याची नजर अंधुक असली तरी, त्याचं नाक मात्र प्रचंड तीक्ष्ण असतं. अगदी दोन किलोमीटर अंतरावरचा वासही त्याला येऊ शकतो आणि त्याच वासाच्या सहाय्यानं आपल्या भक्ष्याचा मागही तो शोधतो. ‘डोकं फिरलं तर’ कोणाच्याही मागे ते लागू शकतं आणि त्याचा पिच्छा पुरवू शकतं. केसांच्या जंजाळात त्याच्या हातापायांची नखं दिसत नसली, तरी त्यात प्रचंड ताकद असते. आपल्या नखांच्या या राक्षसी ताकदीनं माणसाला अगदी कवटीपासून ते त्याची हाडं दिसेपर्यंत ते सोलून काढू शकतं. जंगल परिसरात राहणाऱ्या अनेक लोकांना या प्राण्याचा चांगलाच अनुभव आला आहे. त्यामुळे वाघ, सिंहापेक्षाही ते जास्त घाबरून असतात, ते अस्वलालाच. म्हणून कोणीही जाणकार व्यक्ती स्वत:हून किंवा अगदी ‘अजाणतेपणीही’ अस्वलाच्या नादी लागत नाही..
अशा या ‘रानटी’ अस्वलाच्या समोर स्वत:च्याच मुलीला फेकणं म्हणजे जगावेगळीच घटना. उजबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे नुकतीच ही घटना घडली. येथे एक अतिशय प्रसिद्ध असं राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय आहे. त्यात वेगवेगळे प्राणी ‘मुक्त’ अवस्थेत ठेवलेले आहेत. त्यातच अस्वलांसाठीही एक भलीमोठी जागा आहे. अर्थातच त्यांना पिंजऱ्यात कोंडलेलं नाही. ते मुक्तपणे फिरू शकत असले, तरी त्यांची फिरण्याची जागा मात्र मर्यादित आहे. नैसर्गिक वातावरण त्यांना उपलब्ध करून देण्यात आलं असलं तरी त्याला लोखंडी दरवाजे आहेत आणि पर्यटकांना हे प्राणी पाहाता यावेत यासाठी लोखंडी जाळ्याही आहेत. झूझू नावाचं एक जंगली अस्वल या प्राणिसंग्रहालयात आहे. ‘अतिशय डेंजर’ म्हणून हे अस्वल प्रसिद्ध आहे. त्याच्यासाठीची तटबंदीही तशीच भक्कम आहे. १६ फूट खोल अशा ‘संरक्षित’ जागेत त्याला ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी एक महिला तिथे आली. पर्यटकांना या अस्वलाला पाहाता यावं यासाठीची जाळ्यांची जी जागा आहे, त्याच्याजवळ ही महिला गेली. तिच्यासोबत होती तिची तीन वर्षांची मुलगी; पण अचानक या महिलेनं आपल्या मुलीला उचललं आणि जाळ्यांच्या आतून त्या अस्वलाच्या दिशेनं फेकलं.
मुलीला अस्वलाच्या पुढ्यात फेकताक्षणीच ते अस्वलही धावतच त्या मुलीजवळ गेलं. आपला पंजा त्यानं तिच्या दिशेनं उगारला. आता पुढे काय होणार या भीतीनं सगळ्यांच्या हृदयाचा थरकाप उडाला.. या मुलीला अस्वल आता डोक्यापासून पायापर्यंत सोलवटून काढणार असं वाटत असतानाच ते थोडा वेळ शांत झालं. मुलीला हुंगून बाजूला बसलं. तेवढ्यात प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनीही लगेच त्या अस्वलाच्या आवडीचं खाद्य त्याच्यासमोर धरलं. अस्वल खाद्याच्या दिशेनं थोडं सरकलं. तेवढ्या वेळात सहा कर्मचारी जिवाची पर्वा न करता आत शिरले आणि त्यांनी त्या मुलीला उचलून बाहेर आणलं. सुदैवाची गोष्ट म्हणजे इतक्या उंचावरून फेकल्यावरही त्या मुलीला खरचटण्याव्यतिरिक्त फार काही झालं नव्हतं.. सगळ्यांच्या तोंडी शब्द होते, ‘देव तारी त्याला कोण मारी!’..
आईला जावं लागेल कोठडीत!
आरोपी महिला मानसिक आजारानं ग्रस्त होती असं म्हटलं जातंय. घटनेनंतर प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच तिला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. तिच्यावर आता खटला चालू आहे. सुदैवानं मुलीला काहीही झालं नसलं तरी मुलीच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली १५ वर्षांपर्यंत तुरुंगाची हवा तिला खावी लागेल.