ललित नावाची गूढ कथा! ससून... तेव्हा देशभर पेढे वाटले गेलेले, आता वेगळेच ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 07:58 AM2023-10-19T07:58:17+5:302023-10-19T07:59:12+5:30

सुरुवातीला ललित कथा वाटणारी ससून रुग्णालयाची गोष्ट नंतर गूढ झाली. आता तर ती भयंकर ‘क्राइम स्टोरी’ झाली आहे! एक ...

The mysterious story of Lalit patil! Sassoon hospital... then the farms were distributed all over the country, now a different operation | ललित नावाची गूढ कथा! ससून... तेव्हा देशभर पेढे वाटले गेलेले, आता वेगळेच ऑपरेशन

ललित नावाची गूढ कथा! ससून... तेव्हा देशभर पेढे वाटले गेलेले, आता वेगळेच ऑपरेशन

सुरुवातीला ललित कथा वाटणारी ससून रुग्णालयाची गोष्ट नंतर गूढ झाली. आता तर ती भयंकर ‘क्राइम स्टोरी’ झाली आहे! एक काळ होता की जेव्हा येरवडा कारागृहातील एका कैद्यावर ससूनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली, तेव्हा देशभर पेढे वाटले गेले. कारण, ज्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, त्या रुग्णाचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते! हा वारसा असणारी ही ठिकाणे. आज इथे स्वातंत्र्यानंतर काय घडते आहे?  ड्रगमाफिया ललित पाटील याला मुंबई साकीनाका पोलिसांनी बंगळुरू-चेन्नईदरम्यान बुधवारी अटक केली आणि साऱ्यांच्या नजरा या बातमीतील तपशिलाकडे वळल्या. ललित पाटीलच्या अटकेमुळे ड्रग रॅकेटमध्ये आणखी जे कुणी असतील, त्यांचे धाबे नक्कीच दणाणले असेल. ऑगस्ट महिन्यापासून ड्रगच्या प्रकरणाचा छडा पोलिस लावत आहेत. ऑगस्ट महिन्यात साकीनाका पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आणि तेव्हापासून ललितच्या आताच्या अटकेपर्यंत पोलिसांनी मजल मारली आहे.

ललित हा अटक करण्यात आलेला पंधरावा आरोपी. या पूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले, ते पुण्यातील सुप्रसिद्ध ससून रुग्णालयाबाहेर ड्रग तस्करी करताना दोन आरोपींना पकडल्यानंतर. तेव्हा हा प्रकार केवळ ड्रगची तस्करी नसून, यामध्ये अनेकांचे लागेबांधे आहेत, या चर्चेला वाव मिळाला. ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्यामुळे या चर्चेला पुष्टी मिळाली. येरवडा कारागृह प्रशासन, पोलिस खाते आणि ससून रुग्णालय यांची मिलीभगत आहे का, असे खुले सवाल विचारले गेले. ‘लोकमत’ने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. ललित पळून गेल्यानंतर पोलिस खात्याने नऊ पोलिसांना निलंबित केले. ससून रुग्णालयात नेमके काय सुरू आहे आणि कैद्यांची तिथे नेमकी कशी ‘बडदास्त’ ठेवली जाते, यासाठी समिती नेमण्यात आली आहे. पण, समितीतील सदस्य संशयितांच्या समकक्ष असल्याने या समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर संशयाच्या भोवऱ्यात सापडले. सुरुवातीला मौन बाळगणारे डॉ. ठाकूर, ‘लोकमत’ने आवाज उठवल्यानंतर बोलते झाले. पण, ललितवर नेमके कुठले उपचार सुरू होते, इतके दिवस तो रुग्णालयात कसा काय होता, रुग्णालयातून तो बाहेर कसा जात होता, ड्रग रॅकेट कसे चालवत होता, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

या प्रकरणात राजकीय नेतेही असल्याचा आरोप काही नेत्यांकडून होत आहे. ‘मी पळून गेलो नाही, तर मला पळवून लावले गेले आहे,’ या ललितच्या ताज्या वक्तव्यानंतर तर या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. ललित पाटील प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये छापा टाकून तीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आणि तेथील कारखाना सील केला. या ड्रग्ज प्रकरणातही मुंबई पोलिसांना ललित पाटील हवा होता. त्यामुळे एकाच वेळी पुणे पोलिस आणि मुंबई पोलिस ललितचा शोध घेत होते. पुणे पोलिसांनी ललितचा भाऊ भूषण पाटीलला अटक केली. मुंबई पोलिसांना भूषणही हवा आहे. ललितला पकडल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे बाहेर येणे गरजेचे आहे. यामध्ये कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न कुणाकडूनही होऊ नये, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आतापर्यंतच्या साऱ्या घडामोडी पाहिल्या, तर व्यवस्थेला एखादा गुन्हेगार पैशांच्या बळावर हवे तसे वाकवू शकतो, असा समज कुठल्याही नागरिकाच्या मनात निर्माण होईल. सामान्य रुग्णांची सरकारी रुग्णालयात कशी स्थिती असते, हे सर्वांना माहीत असताना कैद्यांची मात्र बडदास्त ठेवली जाते, तेथून ते ड्रग्ज रॅकेट चालवतात, हेच संतापजनक आहे.

राजकीय दबावामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागते, खोटी प्रमाणपत्रे द्यावी लागतात, या डॉक्टरांच्या म्हणण्याचीही दखल घ्यायला हवी. हा राजकीय दबाव कुठला, कुणाचा हे समोर यायला हवे. चुकीची कृत्ये करण्यासाठी राजकीय दबाव येत असेल, तर तो झुगारून देऊन कायद्याच्या कक्षेत काम करायला सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यायला हवे. पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी एका वेगळ्या ‘नेक्सस’चा उल्लेख त्यांच्या ताज्या पुस्तकात केलेला असताना तर हा मुद्दा आणखी महत्त्वाचा. ललित पाटीलसारखा गुन्हेगार संपूर्ण यंत्रणेची खिल्ली उडवू शकतो, हे आतापर्यंतच्या घटनाक्रमावरून समोर आलेच आहे. देशाभोवती आवळत चाललेला ड्रग्जचा विळखा सातत्यानं वाढतोच आहे. अवघ्या यंत्रणेला ‘भूल’ देऊन नको ते ‘ऑपरेशन’ करण्याचा प्रयत्न सार्वजनिक रुग्णालयेच करणार असतील तर त्या देशाचे आरोग्य कसे असणार आहे?

Web Title: The mysterious story of Lalit patil! Sassoon hospital... then the farms were distributed all over the country, now a different operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.