आजचा अग्रलेख: द्रौपदींसाठी सोहराय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 10:20 AM2022-07-22T10:20:26+5:302022-07-22T10:21:33+5:30
महिला म्हणून दुसऱ्या असल्या तरी आदिवासी महिला म्हणून राष्ट्रपतिपदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या राष्ट्रपती असतील.
बहीण-भावांच्या प्रेमाचे प्रतीक, निसर्ग आणि पशुपक्ष्यांच्या प्रति श्रद्धा तसेच देवी-देवतांच्या प्रति विश्वास व्यक्त करण्याचा संथाल आदिवासी समाजाचा मुख्य उत्सव म्हणजे सोहराय हा सण! भाताची कापणी झाल्यावर कार्तिक अमावास्येपासून तीन दिवस हा सण मोठ्या धूमधडाक्यात संथाल आणि छोटा नागपूर परगण्यात साजरा करण्यात येतो. संथाल आदिवासी समाज प्रामुख्याने झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आदी राज्यांत आहे. या आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास कमी आणि त्यांच्या दारिद्र्य, शोषण आणि संघर्षाचा मोठा आहे. या समाजातून येणाऱ्या श्रीमती द्रौपदी मुर्मू येत्या सोमवारी (दि. २५ जुलै) जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुख म्हणून अधिकार हाती घेतील.
महिला म्हणून दुसऱ्या असल्या तरी आदिवासी महिला म्हणून राष्ट्रपतिपदावर विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या राष्ट्रपती असतील. देशाच्या सर्वोच्च पदावर हरिजन-आदिवासी महिला विराजमान होईल, तेव्हा आपणांस अत्यानंद होईल, असे उद्गार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी काढले होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी देश सज्ज होत असताना ओडिशा राज्यातील मयूरगंज जिल्ह्यातील उपरबेडा गावाचे नागरिक जणू सोहराय सणच साजरा करीत आहेत. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या द्राैपदी मुर्मू यांनी शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम केले. आजोबा आणि वडिलांनी गावचे सरपंचपद भूषविले असल्याने घरात राजकारणाचे वारे वाहिले असणार. शिक्षक पदाचा त्याग करून त्यांनी ओडिशा विधानसभेची निवडणूक लढविली. बिजू जनता दलासोबत भाजपने आघाडी सरकार बनविले. त्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदिवासीबहुल झारखंडच्या राज्यपाल पदाची संधी दिली. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत संपत असताना मोदी यांनी सर्वांना चकवा देत देशातील सर्वांत जुन्या संथाल आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपतिपदाचा मान देण्याचा निर्णय घेतला.
संथाल समाज हा सध्याच्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून होता. १७७० च्या भीषण दुष्काळामुळे हा समाज छोटा नागपूर परगण्यात येऊन स्थिरावला. तो शेतीवर काम करून गुजराण करीत होता. या समाजाचे सातत्याने शोषणच होत राहिले. ब्रिटिशांच्या विरोधात मोठे बंड केले तेव्हा कोठे त्यांना जमिनीचे हक्क मिळाले. रघुवर दास यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीच्या सरकारने झारखंडमध्ये ब्रिटिशकालीन संथाल आदिवासी कूळ कायदा आणि छोटा नागपूर कूळ कायदा बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा द्राैपदी मुर्मू यांनी ते विधेयक परत पाठवून आदिवासींचा जमिनीचा मालकी हक्क अबाधित राहील, याची तरतूद करायला लावली. अशा एका कणखर आदिवासी महिलेची आज राष्ट्रपतिपदावर निवड झाली आहे. योगायोग म्हणजे त्यांच्या विरोधात लढणारे माजी परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा मूळचे भाजपचे आहेत. ते झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्याचे आहेत. त्याच भागात संथाल समाजाचे मोठे वास्तव्य आहे. हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्वही केले आहे.
द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत, एवढ्यापुरता मुद्दा नाही. भाजप सरकारकडून देशातील लोकशाही संकेतांचा आणि परंपरेचा संकोच केला जात आहे, त्याला विरोध करण्यासाठी आपली लढाई आहे, अशी भूमिका यशवंत सिन्हा यांनी मांडली होती. भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष वगळता सर्व विरोधी पक्ष सिन्हा यांना पाठिंबा देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपच्या आघाडीत नसणाऱ्या अनेक पक्षांनी आदिवासी महिला म्हणून मुर्मू यांना पाठबळ दिले. त्यामुळेच त्यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. यापूर्वी दोनच वेळा राष्ट्रपतींची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रपतींना केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यायचे असले तरी राष्ट्रप्रमुख म्हणून मोठा मान आहे.
देशाच्या आजवरच्या वाटचालीत अनेक महान व्यक्ती, विचारवंत, मुत्सद्दी नेत्यांनी या पदावर विराजमान असताना जेव्हा जेव्हा देशांतर्गत किंवा बाह्य शक्तींकडून देशहिताला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न झाला तेव्हा सरकारच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिलेत, अशी महान परंपरा आहे. आदिवासी महिला राष्ट्रपती होते आहे, याचा साऱ्या देशाला आनंद झाला आहे. प्रतीकात्मक गोष्टी, घटना किंवा निर्णयाचादेखील समाजमनावर सकारात्मक परिणाम होतो. मूळनिवासी आदिवासी समाजाचा हा सन्मान मानून द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन करायला हवे!