पुणेकरांनी पाहिला तो थरारपटाचा फक्त ट्रेलर !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 06:26 AM2022-10-20T06:26:37+5:302022-10-20T06:27:23+5:30
‘पाऊस आणि तुंबणारी मुंबई’ या समीकरणाची आता सगळ्यांना सवय झाली आहे. त्याला ‘तुंबई’ असे नावही देऊन झाले. पण, तुंबणारे पुणे हे चित्र तसे अलीकडचे आहे.
संजय आवटे,
संपादक, लोकमत, पुणे
‘पाऊस आणि तुंबणारी मुंबई’ या समीकरणाची आता सगळ्यांना सवय झाली आहे. त्याला ‘तुंबई’ असे नावही देऊन झाले. पण, तुंबणारे पुणे हे चित्र तसे अलीकडचे आहे. यंदाच्या पावसाळ्याने हे भयंकर चित्र समोर आले. पुण्याच्या पेठांमध्ये पाणी घुसले आहे आणि थेट दुकाने-घरे यात पाणी शिरले आहे, अशी ही रात्र होती. अगदी मध्यवर्ती पुण्यात रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. त्या पाण्यात लोकांची वाहने बुडून चालली होती. अनेक वाहने बंद पडत होती. चालणाऱ्या मुला-बाळांचे, वयोवृद्धांचे, महिलांचे, रुग्णांचे, रस्त्यांवरच जगणाऱ्यांचे अतोनात हाल होत होते. वीज गायब होती. एखाद्या अतिशय अविकसित आणि जुनाट गावातही अशी तारांबळ होणार नाही, असा अनुभव पुणेकर त्या भयाण रात्री घेत होते.
हे चित्र या सोमवारचे. दिवाळी खरेदीची लगबग सुरू असल्याने मंडळी रस्त्यांवरच होती. घराकडे परतत होती. आणि अचानक रात्री नऊच्या सुमारास जोराचा पाऊस कोसळू लागला. पुण्यासाठी हा पाऊस अनपेक्षित होता. नेहमीपेक्षा अधिक होता. मात्र, अभूतपूर्व वगैरे नव्हता. शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस सामान्य नसला तरी गेल्या दहा वर्षांचा विचार करता, यापूर्वी तीन वेळा ऑक्टोबर महिन्यातच असा पाऊस झालेला आहे. मात्र, यावेळी झालेल्या पावसाने पुण्याच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली.
अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे, ‘आयटी’ची राजधानी असणारे, ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ म्हणून स्वतःचा जयजयकार करणारे हे तथाकथित स्मार्ट शहर किती तकलादू आहे, त्याचे पुरावे मिळत होते. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए या परिसराची लोकसंख्या आहे सुमारे सव्वा कोटी. युरोपातल्या एखाद्या देशाएवढी लोकसंख्या जिथे नांदते, ते शहर एवढे दुबळे आणि आजारी कसे, हा प्रश्न या पावसाने पृष्ठभागावर आणला. पावसाने बरेच काही उघडे पडले. त्यात पुण्याच्या शहर नियोजनाचे पितळही उघडे पडले.
पुण्यासारख्या रम्य आणि निसर्गसंपदा लाभलेल्या शहराचे आपण काय केले? विकास हवा आहेच, पण कोणती किंमत मोजून? आपण डोंगर फोडले. झाडे तोडली. बांधकामासाठी नाले बुजवले. ड्रेनेजवर रस्ते बांधले. कोणत्याही कामांसाठी सतत रस्ते खोदले जातात. पाण्याचा निचरा व्हायला मग जागा उरत नाही. पाऊस आल्यावर पाणी वाहून जाणार कसे? पुणे महानगरपालिका स्थापन झाली १९५० मध्ये. पहिली निवडणूक झाली १९५२मध्ये. तेव्हाचे आयुक्त स. गो. बर्वे यांनी तेव्हाच लक्ष्मी रस्त्याच्या रुंदीकरणाचा ठराव सर्वसाधारण सभेत आणला होता. मात्र, तेव्हा तो ठराव नगरसेवकांनी हाणून पाडला. तीच अनास्था महापालिकेच्या कारभाऱ्यांची आजही आहे. रस्ते तयार करताना सच्छिद्र असे ‘हाय परफाॅर्मन्स परव्हियस काँक्रीट’ वापरावे लागते. मग त्यातून पाणी झिरपते. असे रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेला पाच वर्षांपूर्वी प्रस्ताव दिला होता. पण त्यावर पालिकेने काहीच केले नाही. सत्ता कोणाचीही असो, महापालिकेवर सत्ता चालते ती धनदांडग्यांची आणि टक्केवारीची! ज्या पुणे शहरात पंधरा वर्षांपूर्वी २७५ ओढे-नाले होते, त्यातील आता केवळ ६० ते ७० शिल्लक आहेत.
पाऊस तर असतोच बेताल, बेमुर्वतखोर आणि बेबंद. पण, नियोजन नावाची गोष्ट तुम्हाला करता यायला हवी. सिक्कीमसारख्या राज्यापेक्षा मोठा अर्थसंकल्प असणारी पुण्याची महानगरपालिका. देशभरातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिकायला यायचे असते. लग्न होऊन पुण्यात येण्याची विवाहेच्छु मुलींची इच्छा असते. अधिकाऱ्यांना पुण्यात ‘पोस्टिंग’ हवी असते. कलावंतांना पुण्यात ‘परफॉर्म’ करायचे असते. नेत्यांना पुण्यावर मांड ठोकायची असते. पण, खिसा असणाऱ्या या शहरालाही हृदय आहे, हे किती जणांना समजते? तुम्ही या शहराच्या रक्तवाहिन्या बंद करत आहात. तुम्हाला जी वाढ वाटते, ती चरबी आहे, सूज आहे.
शहराच्या रक्तप्रवाहात त्यामुळे अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी झाला की, शहराला प्राणवायू कमी पडायला लागतो. मग हृदयविकाराचा झटका अटळ असतो. या स्थितीत आज पुणे आहे. अनेक शहरांची हीच स्थिती आहे. नागरिकरण वाढत असताना, शहर नियोजनात आपल्याला अपयश येत आहे. पुण्याने सोमवारी रात्री जे पाहिले, तो थरारपटाचा फक्त ‘ट्रेलर’ होता!