राष्ट्रकुल स्पर्धेतून क्रिकेट, हॉकी वगळण्याचे राजकारण! भारतीय पारंगत असलेलेच खेळ का वर्ज्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:48 AM2024-10-24T10:48:05+5:302024-10-24T10:49:05+5:30

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा ज्या खेळांमध्ये दबदबा, नेमके तेच खेळ राष्ट्रकुलमधून वगळण्यात आले आहेत. यामागे राजकारणही असू शकते.

The politics of excluding cricket and hockey from the Commonwealth Games! Why are the games that India is good at? | राष्ट्रकुल स्पर्धेतून क्रिकेट, हॉकी वगळण्याचे राजकारण! भारतीय पारंगत असलेलेच खेळ का वर्ज्य?

राष्ट्रकुल स्पर्धेतून क्रिकेट, हॉकी वगळण्याचे राजकारण! भारतीय पारंगत असलेलेच खेळ का वर्ज्य?

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

ग्लासगो येथे २०२६ साली होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमधून हॉकी, नेमबाजी, क्रिकेट आणि कुस्ती यासारखे काही खेळ वगळले गेले. ज्या खेळांमध्ये भारत पारंगत आहे प्रामुख्याने तेच खेळ राष्ट्रकुलमध्ये राहणार नसल्याने सध्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. कारण भारताच्या पदकतालिकेवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. खर्चावर लगाम लावण्याचे कारण समोर करून राष्ट्रकुल खेळ महासंघाने प्रमुख क्रीडा प्रकारांना वगळण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय आहे.

ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतून हटवण्यात आलेल्या खेळांवर नजर टाकल्यास एक गोष्ट लक्षात येते की, या खेळांवर प्रामुख्याने भारत आणि चीन या दोन देशांचाच जास्त दबदबा होता. भारताचे सर्वाधिक नुकसान हॉकी, क्रिकेट आणि बॅडमिंटन वगळल्यामुळे होणार आहे. कारण या तिन्ही खेळांमध्ये आपण पदकाचे प्रमुख दावेदार होतो. बॅडमिंटनचा समावेश न करणे एकवेळ समजून घेता येऊ शकेल, कारण चीन, जपान, कोरिया आणि भारत या चारच संघांचा या खेळावर जास्त प्रभाव आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंमध्ये भारताचे काही शटलर आहेत; पण ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, बेल्जियम, अर्जेंटिना, कॅनडा यासारख्या देशांचा वरचष्मा असूनही हॉकीला वगळणे समजण्यापलीकडचे आहे. गेल्या काही काळापासून भारतीय संघाने हॉकीचे सुवर्णयुग पुन्हा आल्यासारखा खेळ केला आहे. दुसरीकडे, क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास आपल्या देशात धर्म म्हणून या खेळाकडे पाहिले जाते. त्यामुळेच जगाच्या कोपऱ्यात कुठेही भारताचा सामना असला तरी चाहते हजेरी लावत असतात.

यजमान देश आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मग अशा सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीलाच पिंजऱ्यात कोंडून ठेवण्यात काय हशील? राष्ट्रकुल महासंघाची धोरणे भारतासाठी अवघड रसायन होऊन बसले आहे. यामागे भारतीयांची पदकसंख्या आणखी घटवणे असे राजकारणदेखील असू शकते. कारण, क्रिकेट, हॉकी आणि नेमबाजी हे खेळ महासंघाला मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करून देतात. त्यामुळे खर्चाचे कारण देणे पटण्यासारखे नाही. आता नव्याने समाविष्ट झालेल्या खेळांचा विचार करायचा झाल्यास ॲथलेटिक्स (ट्रॅक अँड फिल्ड), जलतरण, कलात्मक जिम्नॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, भारोत्तोलन, मुष्टियुद्ध, ज्युदो, बाउल्स, ३x३ बास्केटबॉल यासारख्या खेळांमध्ये अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, न्यूझीलंड या देशांच्या वर्चस्वाला धक्का लावणे सोपे नाही. शिवाय या खेळांमध्ये भारताच्या पदकाच्या आशा कितपत आहेत, याचाही विचार करावा लागेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये भारताने जवळपास प्रत्येक प्रकारात पदक मिळवल्याने यामध्ये भारताच्या पदकाच्या आशा उंचावतील; पण मुष्टियुद्ध, ज्युदो, जलतरण यामध्ये भारताच्या पदकांविषयी ठामपणे सांगता येणार नाही. त्यामुळे एकूणच आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पदक मोहिमेला फार मोठा धक्का लागला आहे.

जागतिक स्तरावर भारताला जर आपले नाणे खणखणीत वाजवायचे असेल तर कुठलेही कारण न देता या खेळांमध्ये लवकरात लवकर पारंगत व्हावेच लागेल, तेव्हा कुठे २०३६ सालची ऑलिम्पिक यजमानपदाची दावेदारी आपण छातीठोकपणे पेश करू शकू. त्यासाठी खेलो इंडिया, विद्यापीठाच्या स्पर्धा किंवा शालेय क्रीडा स्पर्धांमधून आपल्याला अधिकाधिक चांगले खेळाडू घडवावे लागतील. दर्जेदार स्पर्धांचे सातत्याने आयोजन करत राहावे लागेल. यासाठी चीनकडून आपण काही धडे घेऊ शकतो. लंडन ऑलिम्पिक १९४८ ची सांगता झाल्यानंतर चीनने काही काळ मोठ्या स्पर्धांच्या आयोजनापासून स्वत:ला दूर ठेवले आणि या काळात उत्तमोत्तम ॲथलिट आपल्या देशात घडवले. त्याचा परिणाम आता जगासमोर आहे.

Web Title: The politics of excluding cricket and hockey from the Commonwealth Games! Why are the games that India is good at?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.