प्रस्थापित राजकारणाला आव्हान देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न !

By नंदकिशोर पाटील | Published: July 24, 2024 12:53 PM2024-07-24T12:53:04+5:302024-07-24T12:56:21+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रदीर्घकाळ ज्या राजकीय पक्षांचा प्रभाव राहिला त्यात काँग्रेसनंतर शेकापचा नंबर लागतो.

The question of the existence of Shetakari Kamgar Paksha, which challenges the established politics! | प्रस्थापित राजकारणाला आव्हान देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न !

प्रस्थापित राजकारणाला आव्हान देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न !

- नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर

भाई जयंत पाटील यांच्या पराभवाने शेतकरी कामगार पक्षाचे विधानपरिषदेतील अस्तित्व संपुष्टात आले आहे. आता श्यामसुंदर शिंदे (लोहा) यांच्या रूपाने एकमेव आमदार विधानसभेत उरले आहेत; मात्र त्यांनीही महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपशी संधान साधल्याने त्यांचे देखील मत शेकापच्या या सरचिटणीसांना मिळाले नसल्याची शक्यता आहे. डाव्या, पुरोगामी विचारांची पाठराखण करत शेतकरी, कष्टकरी, शोषित-वंचितांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या, सरंजामशाही वर्गाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारा, उपेक्षित वर्गातील नेतृत्वाच्या माध्यमातून प्रस्थापित राजकारणाला आव्हान देणाऱ्या शेकापची ही अवस्था पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना नाउमेद करणारी आहे.

महाराष्ट्राच्याराजकारणात प्रदीर्घकाळ ज्या राजकीय पक्षांचा प्रभाव राहिला त्यात काँग्रेसनंतर शेकापचा नंबर लागतो. सांगोल्याचे गणपतराव देशमुख हे पाच दशकं विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत. २०१४ नंतर देशाचा आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलून गेला; मात्र तरी देखील २०१७ पर्यंत गणपतराव देशमुख (सांगोला), भाई विवेक पाटील (पनवेल-उरण), सुभाष पाटील (अलिबाग), भाई धैर्यशील पाटील (पेण) हे विधानसभेचे आमदार होते. भाई जयंत पाटील यांचा परवाचा पराभव सोडला तर सलग तीनवेळा ते विधानपरिषदेवर निवडून गेले होते. याशिवाय, रायगड जिल्हा परिषद; तसेच पेण, पनवेल, अलिबाग, सांगोला पंचायत समितीवर शेकापची सत्ता होती. रायगडसह नांदेड, सोलापूर, नाशिक, परभणी, नागपूर या ५ जिल्हा परिषदांमध्ये पक्षाचे सदस्य निवडून येत असत. अलिबाग, काटोल, बिलोली, इत्यादी नगरपरिषदा शेकापच्या वर्चस्वाखाली होत्या. १९५२ ते ५७ हा तर शेकापचा सुवर्णकाळ समजला जातो. वर्ष १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शेकापचे तब्बल २८ आमदार निवडून आले होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या जन्माची कथाही मोठी रंजक आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधकी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस पक्षातील शंकरराव मोरे, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव आदी बहुजन समाजातील नेत्यांनी १९४७ च्या सुमारास ‘शेतकरी-कामकरी संघ’ स्थापन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पक्षांतर्गत अशा प्रकारची संघटना अथवा संघ स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाने मान्यता दिली नाही. तिथेच मतभेदाची ठिणगी पडली आणि वरील प्रभृतींनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ‘शेतकरी कामगार पक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेऊन टाकला; मात्र अशा प्रकारचा स्वतंत्र पक्ष स्थापन न करता काँग्रेस पक्षात राहूनच शेतकरीवर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका यशवंतराव चव्हाण यांनी मांडली होती. यशवंतरावांची ही भूमिका बहुजन समाजातील अनेक नेत्यांना मान्य झाली नाही. कारण काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष उरला नसून ‘शेटजी-भटजीं’चा पक्ष झाला असल्याची भावना तेव्हा प्रबळ झाली होती. शेवटी २ व ३ ऑगस्ट १९४७ रोजी देवाची आळंदी येथे शंकरराव मोरे-केशवराव जेधे यांनी निवडक कार्यकर्त्यांची सभा घेतली. या सभेला भाऊसाहेब राऊत, जी.डी.लाड, के.पा.खडके, कृष्णराव धुळप, मुळीक, शिरोळे, नाथाजी लाड, बाबूराव जेधे उपस्थित होते. याच बैठकीत शेतकरी कामगार पक्षाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

चळवळीतील कार्य
शेतकरी कामगार पक्षातील अनेक नेत्यांचा स्वातंत्र्यचळवळीत सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तर या पक्षाचे धुरीण अग्रभागी होते. साराबंदी, तुकडेबंदी, शेतमालास हमीभाव, कापूस एकाधिकार योजना, दुष्काळात पीककर्ज वसुलीस स्थगिती, असंघटित कामगार वर्गासाठी कायदे अशा अनेक प्रश्नांवर शेकापने संघर्ष केला आहे. शेकापमधील आजवरच्या नेत्यांच्या नावावर नजर टाकली तर शंकरराव मोरे, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, कृष्णराव धुळप, भाऊसाहेब शिरोळे, जी.डी.लाड बापू, अण्णासाहेब गव्हाणे, एन.डी.पाटील, गणपतराव देशमुख अशा अनेक तालेवार नेत्यांची नावे समोर येतात. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत या नेत्यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे.

मराठवाड्यात प्रभाव
निजामी राजवटीखाली राहिलेल्या मराठवाड्यात स्वातंत्र्योत्तर काळात शेकाप अधिक प्रभावी राहिल्याचे दिसून येते. अण्णासाहेब गव्हाणे, भाई उद्धवराव पाटील, नरसिंगराव देशमुख, तुकाराम मुसळे, भाऊसाहेब देशमुख, भाई केशवराव धोंडगे आदी नेत्यांनी मराठवाड्याचे प्रश्न मोठ्या हिरिरीने मांडले. प्रारंभीच्या काळात परभणी आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेल्या या पक्षाने नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यात देखील आपला जम बसविला होता; मात्र विद्यापीठ नामांतर लढ्यानंतर मराठवाड्यात शेकापची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतली आणि तिथून या पक्षाची वाताहत सुरू झाली. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत या प्रदेशात शेकापचे दोन खासदार आणि १२ आमदार निवडून आले होते. एवढे यश नंतर कधीच मिळाले नाही. लोहा-कंधार, अहमदपूर, तुळजापूर, औसा आणि गंगाखेड अशा काही मोजक्या मतदारसंघांत शेकापचे उमेदवार निवडून येत. आता लोह्यात एकमेव आमदार आहेत. तेही येत्या निवडणुकीत शेकापसोबत राहतील याची खात्री नाही!

वाताहात का झाली?
कोणत्याही राजकीय पक्षाच्या अस्तित्व आणि विस्तारासाठी प्रामुख्याने कार्यकर्ते (केडर), कार्यक्रम, संघटन आणि नेतृत्व (लीडर) लागते. शेकापकडे कधीकाळी नेतृत्व होते; पण संघटनेचा अभाव असल्याने नव्या पिढीला ते आकर्षित करू शकले नाहीत. वास्तविक, प्रखर पुरोगामी भूमिका घेणाऱ्या राजकीय पक्षाची भूमिका शेकापला बजावता आली असती तर हा पक्ष आजही प्रभावी ठरला असता.

वर्चस्व संपुष्टात आल्यात जमा
महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) विधानसभेच्या किमान २० जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव ‘मविआ’समोर ठेवणार असल्याचे समजते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, लोहा (जि. नांदेड) आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, अलिबाग आणि पेण या मतदारसंघांत शेकापचे अस्तित्व अजून टिकून असले तरी लोहा वगळता यांपैकी एकाही मतदारसंघात शेकापचा आमदार नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मताधिक्य मिळाले आहे. गणपतराव देशमुख यांचा गड समजण्यात येणाऱ्या सांगोल्यात शिंदेसेनेचे शहाजीबापू पाटील आमदार आहेत. तरीदेखील सांगोल्याची जागा वगळता इतर ठिकाणी शेकापचे वर्चस्व जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत शेकापला किती जागा मिळतील? हा खरा प्रश्न आहे.

Web Title: The question of the existence of Shetakari Kamgar Paksha, which challenges the established politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.