पिअर प्रेशर! तरुणाईला छळणारा प्रश्न, गुड न्यूज कधी देणार?
By संतोष आंधळे | Published: November 18, 2024 10:13 AM2024-11-18T10:13:11+5:302024-11-18T10:15:33+5:30
इतर जोडप्यांना मूल आहे मग तुम्हाला का नाही, या प्रश्नाने तरुणांना भंडावून सोडले आहे.
संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी
लग्न होऊन साधारण दीड-दोन वर्षं झालेली रचिता कॉलेजकालीन मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात बसली होती. बोलता बोलता विषयाची गाडी वळली आई-बाबा होण्याच्या मुद्द्याकडे. सगळे नवथर विवाहित. मग सासरी-माहेरी मोठ्यांची या टॉपिकवरची आडवळणाची बोलणी कशी असतात, यावर सर्वजण व्यक्त होऊ लागले. त्यातला सहित जरा स्पष्टवक्ता. त्याने सांगितले की माझ्या आई-बाबा आणि सासू-सासऱ्यांना स्पष्टच सांगितलंय की, इतक्यात काही आमच्याकडून ‘गुड न्यूज’ची अपेक्षा ठेवू नका. घोळक्यातल्या प्रत्येकाने त्याला सहमती दर्शवणारा ‘थंब’ दाखवला...
असे प्रसंग आताशा वरवर सगळीकडे ऐकण्या-वाचण्यात येऊ लागले आहेत. नवविवाहितांना ‘गुड न्यूज कधी देणार’, हा प्रश्न नवा छळवाद वाटू लागला आहे. यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. विवाह सोहळ्यासाठी पोह्यांचा कार्यक्रम करून मुलगा-मुलगी पसंत करण्याचे दिवस आत लोप पावत चालले आहेत. हल्ली बरीचशी लग्ने - सन्माननीय अपवाद वगळता - परस्परच जुळलेली असतात. घरातली वडीलधारी मंडळी या बदलाशी जुळवून घेताना चाचपडत असतात. मुला/मुलीने वा नात/नातीने परस्पर प्रेमविवाह केला तर ही मंडळी थोडी धुसफूस करतात पण वर्ष-दोन वर्षांत त्यांचा पुढचा प्रश्न असतो ‘गुड न्यूज’चा...
हल्लीच्या पिढीला त्यांना आपली मते उघडपणे मांडायला आवडतात. जागतिकीकरणात फार मोठे बदल घडत असताना त्यांचा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत असतो. चांगले काय आणि वाईट काय याची जाणीव त्यांना होत असते. स्वैराचार नसावा, मात्र आयुष्य जगताना त्यांना मोकळीक असावी, या विचारधारेची हल्लीची तरुणाई आहे. काही प्रमाणात ज्येष्ठांच्या सूचना चांगल्याही असतात. मात्र त्याचा ज्यावेळी अतिरेक होतो त्यावेळी मात्र तरुण व्यक्त होऊ लागतात. वैयक्तिक आयुष्याबद्दल कुटुंबातील जवळच्या व्यक्ती सल्ले देतात. तोपर्यंत ठीक असते. मात्र त्यानंतर अनेक केवळ ओळखीचेही वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसतात. त्यावेळी मात्र त्याचा त्रास व्हायला लागतो. उदारणार्थ, लग्न कधी करणार, लग्न झाले की मूल कधी होणार? सध्याच्या घडीला मूल हवं की नको याचे स्वातंत्र्य त्यांना असायला हवे. आजकाल आजूबाजूला अनेक जोडपी आहेत त्यांना मूल होण्यासाठी असणाऱ्या कोणत्याही वैद्यकीय समस्या नसतानासुद्धा त्यांना मूल नकोसे वाटते. त्यांना त्यांचे आयुष्य मोकळपणाने जगण्यासंदर्भातील त्यांचे स्वतःचे असे काही विचार असतात. तसेच त्यांना हवे असेल मूल तर त्यांना हव्या असणाऱ्या वयाच्या टप्प्यावर ते मूल ते जन्माला घालतील. मात्र त्यासाठी त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचे ‘पिअर प्रेशर’ असता कामा नये. इतर जोडप्यांना मूल आहे मग तुम्हाला का नाही, या प्रश्नाने तरुणांना भंडावून सोडले आहे.
काही दिवसांपूर्वीच सिनेअभिनेत्री प्रिया बापट हिने एका मुलाखतीत सांगितले की, ‘माझ्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत, नाही आहेत मला मुलं... पण हे जे काही आहे तो निर्णय माझा आहे. उद्या जर मला वाटलं की ४२व्या वर्षी मला मूल जन्माला घालायचंय तर मी घालेन जन्माला. हे तेव्हाही नाही वाटलं तर नाही घालणार. पण हे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे. लोकांची ही अपेक्षा असते की, या जोडप्याचं मूल बघायचंय. प्रत्येक जोडप्याची अपेक्षा ही मूल होणंच नाहीये ना !... जोडप्याने मूल जन्माला घातलं पाहिजे हा अलिखित नियमच मला पटत नाहीये. मला वाटतं हे प्रश्न विचारणे थांबविले पाहिजे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जोडप्याला मूल हवे की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण मूल जन्माला घातल्यानतंर त्याचा योग्य पद्धतीने सांभाळ होणेसुद्धा आवश्यक आहे. मुलांचे संगोपन ही एक मोठी जबाबदारी असते. मात्र, त्याचवेळी विवाहित जोडपे तरुण असतानाच त्यांनी मूल जन्माला घातल्यास त्याची प्रकृती उत्तम असते. त्यामुळे लग्नानंतर तरुण वयातच तीन ते चार वर्षांनी मूल असणे चांगले असते. अनेक जोडपी करिअरच्या नादात पाळणा लांबवितात. त्यामुळे काही प्रमाणात वंध्यत्व येण्याची शक्यता असते. मात्र, त्यावरही वैद्यकीय विश्वात चांगले उपचार आहेत. हे सर्व असले तरी आयुष्यात मूल हवे की नको याचा अधिकार जोडप्यांना असायला हवा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती असता कामा नये.