पावसाने पुन्हा आणले डोळ्यांत पाणी!

By किरण अग्रवाल | Published: October 16, 2022 11:39 AM2022-10-16T11:39:50+5:302022-10-16T11:42:32+5:30

The rain brought tears to the eyes again : अकोला जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा अगदी ढगफुटीसदृश्य जोरदार पाऊस झाला; त्यामुळे कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

The rain brought tears to the eyes again! | पावसाने पुन्हा आणले डोळ्यांत पाणी!

पावसाने पुन्हा आणले डोळ्यांत पाणी!

Next

 -  किरण अग्रवाल

प्रारंभीचा फटका सहन करून दुबार पेरणी केलेल्या बळीराजाला पुन्हा पावसाने नागवले आहे, पण गेल्या वेळेच्याच नुकसानीची भरपाई मिळण्याची मारामार असताना नवीन नुकसानीचे काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक बनले आहे.

कधी कधी निसर्ग वा संकटेही अशी काही परीक्षा घेतात की, सहनशीलता तसेच धैर्यही पणास लागावे. रब्बीचा हंगाम सुरू होताना पावसाचा फटका सहन करून पीक पेरणी केलेल्या बळीराजाला या हंगामाच्या मध्यातही ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीने असा काही दणका दिला आहे की, त्याच्या आशा-आकांक्षाच भुईसपाट झाल्या आहेत. अशा स्थितीत सरकारने पंचनाम्यांचे कागदी घोडे न नाचवता नुकसानग्रस्तांसाठी तातडीने मदत जाहीर करणे गरजेचे आहे.

हंगामाच्या प्रारंभीच्या जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने अशी काही संततधार लावून धरली होती की, अनेकांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. महागामोलाचे बियाणे वाया गेलेच, मेहनतीवरही पाणी फिरले होते. अखेर कशी तरी उधार-उसनवारी करून पुन्हा पेरणी केली. तर आता हाताशी पीक येऊ घातले असताना अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर तालुक्यांसह बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांच्याही काही भागात पुन्हा अगदी ढगफुटीसदृश्य जोरदार पाऊस झाला; त्यामुळे कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

गेल्या आठवड्यात काही ठिकाणी झालेल्या धुवाधार पावसामुळे काढणीस आलेले सोयाबीन व वेचणीस आलेल्या कापसासह अन्य पिके जमीनदोस्त झाली आहेत. एकट्या अकोला जिल्ह्यात ८ ते १० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने सुरू केले आहेत; पण यापूर्वीच्याच पंचनाम्यांचे सोपस्कार आटोपूनही मदत मिळाली नसताना आता पुन्हा हे कसली कागदे नाचवताहेत? शासनात असो, की प्रशासनात; शेतकरीपुत्रच बसलेले असताना ही काय चेष्टा चालवलीय बळीराजाची? तिकडे पीक विमा उतरविलेल्या कंपन्या त्यांची मुजोरी सोडायला तयार नाहीत, इकडे गेल्या वेळच्या नुकसानभरपाईपोटी शासनाचा मदत निधी येऊनही तो संबंधितांच्या बँक खात्यात अजून जमा होऊ शकला नाही. अरे, किती लालफीतशाहीचा कारभार कराल आणि कुठे फेडाल हे सारे?

दुर्दैव असे की, एकीकडे राजकीय अस्थिरतेमुळे ज्याच्या दारात हात पसरावेत तेच त्यांच्या विवंचनात दिसत आहेत; आणि दुसरीकडे निसर्गही जणू हात धुऊन मागे लागला आहे. त्यामुळे बळीराजा कोलमडून पडल्यासारखी स्थिती झाली आहे. शेतातील सोयाबीन सडले, तर बाजारात भाव पडले. १०/१२ हजारांपर्यंत गेलेले सोयाबीन आता अवघ्या पाच हजारांवर आले आहे. मातीत मिसळलेल्या पांढऱ्या सोन्याकडे हताशपणे पाहात बसलेल्या बांधा-बांधावरील शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आसवं घरातील सर्वच सदस्यांची अस्वस्थता वाढवीत आहेत. ती आसवं शासनातील कुणाला दिसणार नसतील तर याच आसवांत उद्या मतपेट्या वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीत, हे सर्व संबंधितांनी लक्षात घ्यायला हवे.

हंगाम उधळून लावणाऱ्या पावसाने जे नुकसान घडविले आहे, त्याचे सरसकट पंचनामे नोंदवून तातडीने मदत जाहीर करण्याची व ओल्या दुष्काळाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे; पण इतर व सत्तेतीलही पक्ष काय करीत आहेत? अजूनही खंजीर, गद्दार व खोक्यांच्या आरोप - प्रत्यारोपाखेरीज ते बाहेर पडताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संवेदनशील नेतृत्वकर्ते म्हणून पाहिले जात आहे, तेव्हा त्यांनी याकडे तातडीने लक्ष पुरविण्याची अपेक्षा आहे.

सारांशात, नुकत्याच झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीने दुबार पेरणी करून सावरू पाहणाऱ्या शेतकऱ्याला पार उद्ध्वस्त करून टाकल्याचे पाहता शासकीय पंचनाम्याच्या सोपस्कारात वेळ न दवडता तातडीने नुकसानग्रस्तांच्या हाती भरपाई कशी मिळेल यासाठी निर्णय होणे गरजेचे आहे.

Web Title: The rain brought tears to the eyes again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.