प्रेक्षकांच्या जिभेला रक्त लावून खेचून नेते ते खरे नाटक! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 05:36 AM2022-07-05T05:36:44+5:302022-07-05T05:37:27+5:30

महाभारताच्या नाट्यरूपांतराचा अचंबित करणारा आंतरराष्ट्रीय आविष्कार घडवणारे ख्यातनाम दिग्दर्शक सर पीटर ब्रुक नुकतेच निवर्तले. त्यांच्या जीवनधारणांचा शोध.

The real drama that draws blood from the tongues of the audience! | प्रेक्षकांच्या जिभेला रक्त लावून खेचून नेते ते खरे नाटक! 

प्रेक्षकांच्या जिभेला रक्त लावून खेचून नेते ते खरे नाटक! 

Next

सर पीटर ब्रुक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक

मला कधीही बांधलेल्या नाट्यगृहांचे आणि बंदिस्त रंगमंचांचे आकर्षण वाटले नाही.... का? या प्रश्नाचे उत्तर मला प्रयत्न करूनही गवसले नाही हे खरे आहे, पण मुळातच दिशांच्या मीतीने बांधून घालता येतो तो नाट्यानुभवच नव्हे, असे मी मानतो. मला रिकाम्या जागांचे अनिवार आकर्षण आहे. ही जागा कुठेही असू शकते. जंगलात, वाळवंटात, बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात, डोंगरांच्या पायाशी... कुठेही! त्या रिकाम्या चौकटीत कथा, शब्द, संवाद, संगीत, प्रकाश आणि अभिनयाच्या बळावर नाट्यानुभवाची निर्मिती करणे, या आव्हानाने मला सदैव धडपडत राहण्याची प्रेरणा दिली.

या रिकाम्या जागेत भरता येऊ शकतील, अशा ताकदीच्या कथा मला मिळाल्या त्याही देशोदेशीच्या लोककथा आणि मिथकांमध्ये. लोककथांचा जनक कुणी एक नसतो. मिथके तर शतकानुशतकांच्या बदलत्या लोकजाणिवांमधून घडत जातात. त्यातली गुंतागुंत जितकी गडद, तितक्याच त्यात रिकाम्या जागांच्या शक्यता अधिक! याचा पुरेपूर अनुभव मला  ‘महाभारता’ने दिला. या अजोड कथेचा ध्यास घेऊन मी भारतात कुठेकुठे फिरलो, भटकलो, त्याचा हिशेब करणे कठीण! त्यात मी गोरा माणूस. लोक मला म्हणत, हा तर वसाहतवादाचा अतिरेकी स्वार्थ झाला. वसाहतींना लुटायचे आणि अखेरीस सारे लुटून झाले की त्यांचे सांस्कृतिक संचितही तुमच्यासारख्या कलाकारांनी लुटून न्यायचे! 

मला हे कधीच पटले नाही. मी म्हणतो, महाभारत हे एकट्या भारताचे कसे? ते जगाचे आहे. अवघ्या विश्वाचे अस्तित्व पुसून त्याची एक  ‘रिकामी जागा’ करण्याची क्षमता महाभारतात आहे. त्याने मला वेडावले हे तर खरेच, पण माणूस जिवंत असेपर्यंत दरेक पिढीतल्या कलाकारांना या कहाणीची भूल पडतच राहील. का? कारण त्या कथेत दडलेल्या अक्षरश: अगणित शक्यता! नाट्य हे या शक्यतांमधूनच आकाराला येते. मी दिग्दर्शक म्हणून माझ्या प्रेक्षकांसमोर जे काही  ‘दृश्य’ उभे करतो, त्यामागचे  ‘अदृश्य’ बघता यावे, कळावे म्हणून प्रेक्षकांच्या जिभेला रक्त लावते आणि खेचून घेऊन जाते ते खरे नाट्य! रंगमंचावर वावरणारे एखादे पात्र म्हणते, ‘आणि...’- त्यानंतरच्या नि:शब्द निर्वातात खरे नाट्य उभे करता आले पाहिजे.  

रिकाम्या जागांचा ध्यास घ्या. त्या जागांमध्ये एक विलक्षण सुगंध असतो, झपाटून टाकणारी ऊर्जा असते आणि मुख्य म्हणजे तुम्हाला जे हवे ते निर्माण करता येण्याची बेबंद शक्यता! रंगमंचावर नट जो कुणी असतो, ते पात्र म्हणजे तो नट नव्हे; हे प्रेक्षक जाणतातच. खरेतर रंगमंचावर तीन अस्तित्वे असतात. तो नट किंवा नटी, ते पात्र आणि ते दोघे जिथे एकत्र येऊन भेटतात; ती जागा. ती अदृश्य असते. त्या अदृश्याला दृश्यरूप देण्याची ताकद बाळगतो, तो खरा नट आणि असे करण्याची शक्यता निर्माण करतो, तो खरा नाट्यानुभव! 
ही जादू घडायची असेल, तर नट अतिताणात असता कामा नये, तसाच तो अतिसैलसरही असता कामा नये. त्याच्यासमोरचा प्रेक्षक मठ्ठ, मूर्ख असता कामा नये, तसा तो भस्सकन हसणारा छचोर किंवा डोक्यावर आठी असलेला अतिचिकित्सकही असता कामा नये. या दोन्ही बाजू जेव्हा हे जादुई संतुलन साधतात; तेव्हा जे काही उभे राहते, तेच  ‘नाट्य’! 

संस्कृती असो, धर्म असो, विचारसरण्या असोत, लैंगिक सुखाचे अनुभव असोत की शारीरिक नशेची साधने, मी या साऱ्या विश्वात सतत बुडालेला राहिलो. हे सारे अनुभवले, भोगले आणि वेळ आली तेव्हा सोसलेही.  आता म्हातारा झालो आहे, तर त्या अधिकाराने एवढे जरूर सांगेन, की या सर्व अनुभवांची चव घ्यावी. परीक्षा घ्यावी. प्रश्न विचारण्याचा भोचकपणा जरूर करावा, पण निष्कर्ष काढायची घाई करू नये; एवढेच माझ्या आयुष्याने मला शिकवले आहे. कारण, निष्कर्ष असा काही नसतोच.

 (सर पीटर ब्रुक यांनी विविध निमित्ताने दिलेल्या मुलाखतींच्या आधाराने केलेले संकलन)

Web Title: The real drama that draws blood from the tongues of the audience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.