कारणे वेगवेगळी; पण डोके सगळ्यांचेच दुखते आहे!

By यदू जोशी | Published: August 4, 2023 10:48 AM2023-08-04T10:48:26+5:302023-08-04T10:51:55+5:30

सत्ताधारी भाजप असो, की शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट; आपापल्या पक्षजनांचे मनोबल सांभाळताना तारेवरची कसरत सगळ्यांच्याच नशिबी आहे! 

The reasons different But everyone's head hurts | कारणे वेगवेगळी; पण डोके सगळ्यांचेच दुखते आहे!

कारणे वेगवेगळी; पण डोके सगळ्यांचेच दुखते आहे!

googlenewsNext

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची संधी विनोद तावडे यांना पुन्हा एकदा मिळाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापले गेले तेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. आधी राष्ट्रीय सचिव मग लगेच राष्ट्रीय सरचिटणीसपद मिळवून त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. आज ना उद्या ते महाराष्ट्रात परततीलही कदाचित. अर्थात तेव्हा त्यांची भूमिका वेगळी असेल. विजया रहाटकर यांनाही सचिवपदाची पुन्हा संधी मिळाली.

पंकजा मुंडे यांना पुन्हा राष्ट्रीय सचिवपद मिळाले. सध्या त्या राजकारणापासून दोन महिने दूर आहेत. या ‘ब्रेक’नंतर त्या परततील आणि स्वत:ला सिद्ध करतील, अशी अपेक्षा आहे. महाविजय २०२४ साठी राज्यातील भाजप एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या साथीने सज्ज झाली आहे; पण नवीन नवीन मित्र जोडताना पक्षातील अस्वस्थतादेखील लपून राहिलेली नाही. लोकसभेच्या किमान दहा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. तेथील ‘राष्ट्रवादी ताकद’ अजित पवार यांच्यासोबत राहील की शरद पवार यांच्यासोबत, यावरून भाजपमध्ये साशंकता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने एकाकी पडलेले शरद पवार, ४० आमदार, १३ खासदार साथ सोडून गेल्याने शक्ती कमी झालेले उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे तिघे एकत्र येऊन खरेच चमत्कार करू शकतील का? आज जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात दिसते ती तशीच  लोकसभेला आणि नंतर विधानसभेला दिसेल का? - या प्रश्नांमध्ये भविष्यातील राजकारण दडलेले आहे. नेते सोडून गेले; पण अनेक ठिकाणी कार्यकर्ते, तळातले नेटवर्क आजही उद्धव ठाकरेंसोबत आहे असे म्हणतात, तेच शरद पवार यांच्याबाबतही खरे आहे. अजित पवार यांचे भाजपसोबत जाणे अजिबात न रुचलेला मोठा वर्ग राष्ट्रवादीत आहे. त्यात प्रामुख्याने कार्यकर्ते, धर्मनिरपेक्ष विचारांचे लोक आहेत. शरद पवार आजही आपल्याला नेतृत्व देऊ शकतात, असा त्यांचा विश्वास असला तरी पुण्यात  पंतप्रधान मोदींसोबत पवार व्यासपीठावर बसल्याने शंका गडद झाल्या आहेत. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा लोकमान्यांनी एकेकाळी ब्रिटिशांना विचारलेला प्रश्न पवारांनी परवाच्या कार्यक्रमात विचारायला हवा होता, अशी भावना अनेकांनी सोशल मीडियात व्यक्त केली.

मोदी, भाजपसह अजित पवारांवर कडाडून हल्ले करण्याची भूमिका शरद पवार यांनी नजीकच्या काळात घेतली तर त्यांच्या विश्वासार्हतेवर लागलेले प्रश्नचिन्ह दूर होईल. एनडीए की इंडिया यापैकी पवारांना स्पष्टपणे एकाची निवड करावी लागेल. शरद पवार यांच्याविषयी मध्यंतरी उद्धव ठाकरे हेही साशंक असल्याचे म्हटले जात होते; पण ‘आपण सोबत राहू’ असा शब्द पवार यांनी ठाकरेंना बंगळुरूहून परतताना विमानात दिला म्हणतात. त्यानंतर दोन-चार दिवसांत पवार म्हणाले, की उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी आम्ही तिघांनी ठरविले तर महाराष्ट्रात काहीतरी नक्कीच होईल!

- त्याचा पुढचा टप्पा म्हणजे महाविकास आघाडी आमदारांच्या बैठकीत वज्रमूठ सभा पुन्हा सुरू करण्याचे ठरले आहे. बलाढ्य महायुतीसमोर महाविकास आघाडी नव्याने उभी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत; पण लगेच चमत्कार होण्याची शक्यता नाही. आपल्यासोबत उरलेले आमदार अजित पवारांसोबत जाणार नाहीत याची काळजी शरद पवार यांना घ्यावी लागेल. 

उद्धव ठाकरे गटातल्या आमदारांची अस्वस्थता वेगळी आहे. मुख्यमंत्री शिंदे वा त्यांच्या मंत्र्यांकडे कामे घेऊन जायला त्यांना मनाई केली आहे म्हणतात. राष्ट्रवादी फुटली; पण शरद पवार अन् अजित पवार गटातील मंत्री, आमदारांचे संबंध उत्तम आहेत, त्यांची कामेही पटापट होतात; निधीही मिळतो. मात्र, आमच्यासाठी भिंत बांधून ठेवली असल्याची ठाकरे गटातील आमदारांची खंत आहे. 

राष्ट्रवादी अचानक सत्तेत आल्याने एकनाथ शिंदे गटातले शिवसेना आमदार कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. मुख्यमंत्री आमची कामे तत्काळ करतात; पण राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार यांची आमच्या जिल्ह्यांतील दादागिरी आम्ही कशी सहन करायची? - असे परवा एक शिंदे समर्थक तरुण आमदार विधानभवन परिसरात तावातावाने पण खासगीत बोलत होते. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांची नावे घेऊन अशी नाराजी बोलून दाखविली जात आहे. उद्या या आमदारांची संख्या वाढली तर ते मातोश्रीचा दरवाजा ठोठावणार नाहीत कशावरून? राष्ट्रवादीपासून आपल्या आमदारांचे ‘संरक्षण’ करण्याचे आव्हान शिंदेंसमोर आहे. 

जाता जाता : विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. ते दबंग आहेत. आक्रमकपणे बोलतात. ओबीसी नेत्याला त्यांच्या रूपाने संधी मिळाली. त्यामुळे विदर्भातीलच आणि ओबीसी असलेले नाना पटोलेंचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद तर नाही जाणार ना?

Web Title: The reasons different But everyone's head hurts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.