बंड शमले, धोका कायम! साऱ्या जगाचा श्वास काही क्षणांसाठी का होईना रोखला गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 09:13 AM2023-07-09T09:13:45+5:302023-07-09T09:14:24+5:30

स्वतःनेच विणलेल्या कोषात राहणाऱ्या पुतिन यांच्या वर्तुळात हाताच्या बोटांवर मोजता येऊ शकतील इतक्याच व्यक्तींव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नाही.

The rebellion subsided, the danger remains! Article on Russia Ukrain, Vladmir Putin | बंड शमले, धोका कायम! साऱ्या जगाचा श्वास काही क्षणांसाठी का होईना रोखला गेला

बंड शमले, धोका कायम! साऱ्या जगाचा श्वास काही क्षणांसाठी का होईना रोखला गेला

googlenewsNext

विनय उपासनी मुख्य उपसंपादक

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन, तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप एर्दोगन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन ... जगातल्या या चार देशांच्या अध्यक्षांमध्ये एक समान धागा म्हणजे निरंकुश सत्तेचे पुरस्कर्ते. आपल्याला आव्हान देणारा माईका लाल या भूतलावर असायलाच नको, ही त्यांची पक्की विचारधारा. त्याबरहुकूम त्यांचे राज्य असते. त्यामुळेच कॅग्नरप्रमुख येवगिनी प्रिगोझिन यांनी पुतिन यांच्याविरोधात दंड थोपटले तेव्हा साऱ्या जगाचा श्वास काही क्षणांसाठी का होईना रोखला गेला. पुतिन यांच्या सुदैवाने हे बंड ड म्हणजे पेल्यातले वादळ ठरले. मात्र, हे वादळ तूर्त शमले असले तरी खऱ्या गोंधळाला आता सुरुवात झाली आहे. युक्रेन युद्ध आता अधिकच चिघळत चालले आहे.

युद्धाच्या कारणावरून रशियन सैनिकांमध्येच बेदिली फैलावू लागली आहे. त्यातूनच कॅग्नर या भाडोत्री सैनिकांच्या गटात संताप उफाळून आला. म्हणूनच पुतिन यांनाच पदच्युत करण्याच्या मिषाने प्रिगोझिन यांनी कॅनर आर्मीला मॉस्कोकडे कूच करण्याचे आदेश दिले. परंतु अवघ्या काही तासांत त्यांनी माघार घेतली. त्यामुळे वॅग्नर आर्मीचा हिरमोड झाला. तत्पूर्वी युक्रेन युद्धाच्या सुरुवातीला जो कोणी या युद्धाला विरोध करेल, त्याला देशद्रोही समजले जाईल, अशा लोकांना थेट तुरुंगात धाडले जाईल, अशी उघडउघड धमकी राष्ट्रीय वाहिनीवरून पुतिन यांनी देशवासीयांना दिली होती. मात्र, पुतिन यांना त्याच राष्ट्रीय वाहिनीवर येऊन बंड शमल्याचे जाहीर करत प्रिगोझिन यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जाणार नाही, असे स्पष्ट करावे लागले. एरवी पुतिन यांचे विरोधक संशयास्पदरीत्या भूतलावरून नष्ट होतात. आता प्रिगोझिन बेलारूसमध्ये आहेत की रशियात, यावरून गोंधळ सुरू आहे. प्रिगोझिन सेंट पिटर्सबर्गमध्ये असल्याचे बेलारूस म्हणते. पण तिथे त्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा दिसत नाहीत. कदाचित प्रिगोझिन यांनी पुतिन यांच्याप्रमाणेच अनेक डमी बनवले असावेत, असा संशय आहे. पण काहीही असो, एकूणच रशियातली स्थिती गोंधळाची आहे.

असे का झाले?

स्वतःनेच विणलेल्या कोषात राहणाऱ्या पुतिन यांच्या वर्तुळात हाताच्या बोटांवर मोजता येऊ शकतील इतक्याच व्यक्तींव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नाही. त्यामुळे निवडक व्यक्तींनी सांगितलेल्या माहितीच्या आधारावरच पुतिन जगाकडे पाहतात. त्यानुसार निर्णय घेतात, असे पाश्चात्त्य गुप्तचर संस्थांचे निरीक्षण आहे. त्यामुळे प्रिगोझिन यांच्या संभाव्य बंडापासून त्यांना गाफिल ठेवले

हवाई दल प्रमुखांवर संशय येवगेनी प्रिगोझिन पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारणार असल्याची गुप्त माहिती (मिलिटरी इंटेलिजन्स) पाश्चात्त्य विशेषत: सीआयए गुप्तचर संस्थांना होती. रशियन लष्करातील काही मोजक्या अधिकाऱ्यांनाही याची कुणकुण होती, असेही आता उघड होऊ लागले आहे. मात्र, कोणीही याबाबत क्रेमलिनला पूर्वसूचना दिली नाही अथवा दिली असेल तर त्याकडे काणाडोळा केला गेला, असे वाटण्याइतपत वस्तुस्थिती आहे. आता बंड शमल्यानंतर हवाई दलाचे प्रमुख सर्गेई सुरोव्हिकिन यांच्यावर संशयाची सुई स्थिरावली आहे. वॅग्नर गटाचे ते गुप्त सदस्य असल्याचे आता उघड होऊ लागले आहे

त्यांनीच प्रिगोझिन यांना फूस लावल्याचे 'रिपोर्ट' येऊ लागले आहेत. प्रिगोझिन यांनी माघार घेतल्यानंतर सुरोव्हिकिन सार्वजनिक कार्यक्रमांत दिसलेले नाहीत. त्यांना अटक झाली, ते भूमिगत झाले, ते परागंदा झाले अशा वेगवेगळ्या वावड्या उठू लागल्या आहेत. कदाचित त्यांचा ठावठिकाणा लागणारही नाही. कदाचित त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोणतीही शक्यता तूर्त तरी नाकारता येत नाही. पुतिन अधिक धोकादायक एकूणच प्रिगोझिन यांच्या बंडाने प्रश्नांची माळ निर्माण केली आहे. पुतिन यांची सत्तेवरील पकड ढिली होऊ लागली आहे का, त्यांना युक्रेनची युद्धभूमी आणि वस्तुस्थिती यांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात आहे का, पुतिन जगात एकटे पडू लागले आहेत का, असे असंख्य प्रश्न या बंडामागून उद्भवू लागले आहेत.

पुतिन यांच्या शालेय जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी नमूद करणे योग्य ठरेल. व्लादिमिरच्या छोट्याशा घरात एका उंदराने उच्छाद मांडला होता. त्याच्या या उच्छादाला घरातले सगळे वैतागले होते. अखेरीस उंदराला पकडून बाहेर फेकण्याचे ठरले. स्वतः व्लादिमिर या मोहिमेत पुढे राहिला. उंदराचा ठावठिकाणा लागला. त्याला पकडण्यासाठी धावपळ सुरू झाली. एका क्षणी उंदराला कोपऱ्यात गाठण्यात व्लादिमिरला यश आले. पण त्याचवेळी उंदराने व्लादिमिरवर हल्ला चढवला. व्लादिमिरने घटनास्थळावरून पळ काढला. कोपऱ्यात सापडलेल्या त्या उंदरासारखी परिस्थिती सध्या पुतिन यांच्यावर आली आहे. आणि अशाचप्रकारे कोपऱ्यात सापडलेले व्लादिमिर पुतिन हे जगासाठी धोकादायक आहेत.

Web Title: The rebellion subsided, the danger remains! Article on Russia Ukrain, Vladmir Putin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.