भगवान सोमनाथाचे पुनरुत्थान : हजार वर्षांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 08:59 IST2025-02-26T08:58:16+5:302025-02-26T08:59:31+5:30
शिव ही केवळ मूर्ती किंवा प्रतीक नाही, एक अनुभव आहे. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथाच्या पुनरुत्थानाची कहाणी.

भगवान सोमनाथाचे पुनरुत्थान : हजार वर्षांचा प्रवास
- गुरुदेव श्री श्री रविशंकर, आध्यात्मिक गुरू
भारताचा आध्यात्मिक वारसा शाश्वत आहे आणि इतिहास त्याच्या दृढतेचा साक्षीदार आहे. शतकानुशतके आपली मंदिरे, आपले धर्मग्रंथ आणि आपल्या परंपरांवर अनेक आक्रमणकर्त्यांनी हल्ले केले आहेत, तरीही आपली श्रद्धा कधी ढळली नाही.
सुमारे एक हजार वर्षांपूर्वी, बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ हे भक्तीचे प्रतीक म्हणून पाहिले जात होते. हे केवळ उपासनेचे ठिकाण नव्हते, तर आध्यात्मिक ऊर्जेचे एक शक्तिस्थान होते. हे स्थान देशभरातील भक्त, संत आणि साधकांना आकर्षित करत असे. तथापि, इ.स. १०२६ मध्ये महमुद गझनवीने मंदिराची तोडफोड केली तेव्हा इतिहासाने एक दुःखद वळण घेतले. पण विध्वंसानंतरही लोकांची भक्ती अढळ राहिली. प्राचीन परंपरेचे समर्थक असलेल्या अग्निहोत्री ब्राह्मणांनी मूळ सोमनाथ लिंगाचे अवशेष जतन केले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यांनी हे अवशेष एक हजार वर्षे जतन केले, पिढ्यान्पिढ्या अत्यंत गुप्ततेने त्यांचे रक्षण आणि पूजा केली.
गेल्या शतकातील पहिल्या अर्धशतकाच्या काळातील महान संत स्वामी प्रणवेंद्र सरस्वती यांना त्यांच्या गुरूंकडून हे पिंड प्राप्त झाले. त्यांनी या शिवलिंगाच्या पिंडांना कांचीचे शंकराचार्य स्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या हवाली केले. शंकराचार्यांनी १०० वर्षांसाठी हे पिंड लपवून ठेवण्याची सोय केली. त्यानंतर हे पिंड सीताराम शास्त्री यांच्या पूर्वजांच्या ताब्यात गेले. १०० वर्षांनंतर ते पिंड वर्तमान कांची शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती यांना सुपुर्द करण्यात आले. हे पिंड पुनर्स्थापनेच्या कार्यासाठी माझ्याकडे सोपविण्याची सूचना शंकराचार्यांनी केली. त्यानुसार पवित्र कापडात गुंडाळलेले हे अवशेष माझ्याकडे आले.
या अवशेषांना स्पर्श करताच एखाद्याला तीच ऊर्जा जाणवू शकते जी एकेकाळी सोमनाथच्या भव्य गर्भगृहात भरलेली असावी. असती. हे केवळ दगडी अवशेष नाहीत; ते मंत्रांच्या सामर्थ्याने, शतकानुशतके केलेल्या असंख्य प्रार्थना, ध्यान आणि विधी यांच्या सामूहिक शक्तीने ओतप्रोत भरलेले आहेत. २००७ मध्ये जेव्हा शास्त्रज्ञांनी या अवशेषांच्या भौतिक रचनेचा अभ्यास केला तेव्हा त्यांना काही आश्चर्यकारक तथ्ये सापडली. त्यांना आढळले की त्याच्या मध्यभागी एक मजबूत, असामान्य असे चुंबकीय क्षेत्र आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की, त्या स्थितीत तरंगण्यासाठी हा एक अतिशय विशेष आणि दुर्मीळ प्रकारचा चुंबकीय दगड असावा. अशा चुंबकीय गुणधर्मांसह असलेला हा दगड अत्यंत दुर्मीळ आहे. त्याची रचना स्फटिकासारखी दिसत असली तरी ती कोणत्याही ज्ञात पदार्थाशी जुळत नाही; याचाच अर्थ हे अवशेष अज्ञात नव्या किंवा दुर्मीळ पदार्थाचे होते. प्राचीन ग्रंथांमधील लिंगाचे अनेक उल्लेख असे सूचित करतात की कदाचित तो अंतराळातील उल्कापिंड असावा.
या पवित्र वस्तूंचा पुनर्शोध केवळ इतिहास नव्हे, तर आपल्या संस्कृतीला पुनरुज्जीवित करतो. हे केवळ भूतकाळातील अवशेष नाहीत, तर ती एक जिवंत, श्वास घेणारी परंपरा आहे. ही परंपरा जन्म घेते आणि काळानुसार विकसित होत राहते. हा आशीर्वाद सर्वत्र भक्तांना देण्यासाठी हे अवशेष देशभरात नेण्याची आमची योजना आहे.
अध्यात्माचे खरे सार श्रद्धेच्या प्रतीकांच्या पलीकडे आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात मनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चंद्राचा शिवाशी सखोल संबंध आहे. म्हणूनच भगवान शिवाला सोमनाथ, चंद्राचा स्वामी म्हणतात. जेव्हा मन अस्वस्थ असते, तेव्हा शिव हेच उत्तर असते. या पवित्र प्रवासाला निघताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की शिव ही केवळ मूर्ती किंवा प्रतीक नाही, शिव हा एक अनुभव आहे. आपल्या विचारांमागील शांतता, आपल्या भावनांमागील विशालता आणि संपूर्ण अस्तित्वामध्ये व्याप्त असलेली चेतना हीच आहे.