तबल्याचा ताल, श्वासाची लय आणि रहस्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 07:50 AM2023-04-01T07:50:57+5:302023-04-01T07:51:06+5:30

तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या आश्रमाचा तपपूर्ती सोहळा आणि गुरुजींचा अमृतमहोत्सव ४ एप्रिल रोजी पुण्यात साजरा होत आहे. त्यानिमित्त..

The rhythm of the tabla, the rhythm of the breath and the mystery! | तबल्याचा ताल, श्वासाची लय आणि रहस्य!

तबल्याचा ताल, श्वासाची लय आणि रहस्य!

googlenewsNext

- वंदना अत्रे

जन्माला आल्यापासून आपला श्वासोच्छ्वास एका लयीत चालू आहे याचे भान सामान्यांना आयुष्य संपेपर्यंत येत नाही. मग वाढणारी झाडे, फुलणारी फुले, उडणारे पक्षी, वाहणारा वारा आणि पाणी या प्रत्येकाला निसर्गाने दिलेली लय त्यांना कशी जाणवणार? पण माणसाच्या श्वासात आणि प्राणशक्ती असलेल्या निसर्गातील प्रत्येक घटकाच्या जगण्यात असलेली लय अगदी जाणत्या-अजाणत्या वयापासून सहज जाणणारा एखादा प्रतिभावान जन्माला येतो. ही सगळी कोडी सामान्यांना सोपी करून सांगण्याचे जणू व्रत घेतो. मग लयीची ही भूल घालणारी जादू त्यांना समजू लागते.

रसिक त्यांना तालयोगी म्हणू लागतात. लयीची ही कोडी कशी घालायची-सोडवायची आणि हा बुद्धिगम्य व्यवहार सुरेल कसा करायचा याचे भान आणि शिक्षण पुढील पिढ्यांना देत असलेले हे तालयोगी म्हणजे अर्थात पंडित सुरेश दादा तळवलकर. तबलावादक ही कदाचित त्यांची समाजाला असलेली औपचारिक ओळख. प्रत्यक्षात समग्र संगीतावर अखंड चिंतन करणारे एक ऋषी असेच त्यांना संबोधावे लागेल. 

बारा वर्षांपूर्वी या गुरूने आपल्या शिष्यांसाठी सुरू केला तालयोगी आश्रम! तबला वादक, पखवाज किंवा ड्रम वाजवणारे कलाकार, कथक नृत्याचे साधक, विविध घराण्यांचे गायक, कलेकडे बघण्याच्या प्रगल्भ दृष्टीच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी हा आश्रम हे एक हक्काचे ठिकाण. संगीत शास्त्रातील एखादा प्रश्न घेऊन गुरुजींच्या समोर बसून सुरू झालेली चर्चा संस्कार, साधना, समर्पण या मार्गाने जीवनाच्या सार्थकतेपर्यंत कधी पोहोचते ते समजत नाही आणि तरीही या गुरूकडून बरेच काही शिकणे बाकी आहे, असे मनात येत राहतेच..!
शिष्यामधून कलाकार निर्माण करणे ही प्रक्रिया फार सोपी नाही. आधी ते भान गुरूला यावे लागते.

गावोगावी चालणाऱ्या गायन वादनाच्या क्लासेसमधून तासभर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून कलाकार घडवायचे असतील, तर कोणत्या पद्धतीची आणि दर्जाची मेहेनत घेणे आवश्यक आहे हे जाणणारी जी मोजकी तपस्वी माणसे संगीताच्या क्षेत्रात आहेत त्यात पंडित सुरेश तळवलकर यांचे नाव अगक्रमाने घ्यावे लागेल. लयीचे अतिशय सूक्ष्म भान असलेले एक अव्वल दर्जाचे तबलावादक अशी भले त्यांची औपचारिक ओळख असेल, प्रत्यक्षात मात्र ते वादनाच्या बरोबरीने गायन आणि नृत्य हे खोलवर जाणतात. गायन- वादन- नृत्य या प्रत्येकाचे तालाशी असलेले स्वतंत्र नाते त्यांनी अखंड अभ्यासाने आणि अनुभवाने समजून घेतलेले आहे. कमीत कमी तीन पिढ्यांना गायक- वादकांना तबला साथ करताना त्यांचे सादरीकरण त्यांनी जवळून बघितले आहे. 

- तालयोगी आश्रम सुरू करताना एवढा व्यापक अनुभव गुरुजींच्या मागे होता. वडील दत्तात्रय तळवलकर, पंढरीनाथ नागेशकर, रामदत्त पाटील, साधू वृत्तीचे गुरू विनायक घांग्रेकर आणि लयीवर विलक्षण हुकूमत असलेले कर्नाटक संगीतातील गुरू रामनाद ईश्वरन अशा विविध गुरूंकडून त्यांना जे ज्ञान मिळाले त्याला स्वतःच्या चिंतनाची जोड देत त्यांनी आश्रमातील शिक्षणाचा आकृतिबंध तयार केला आहे. शास्त्र, तंत्र, बुद्धी आणि कला या चार घटकांचा विचार त्यामध्ये प्रामुख्याने आहे. सुरेशजींसारख्या प्रतिभावान गुरूकडून शिकण्यासाठी या शिष्यांना गुरुदक्षिणा म्हणून काय द्यावे लागते? तर गुरूबद्दल मनात निस्सीम भक्ती, कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा आणि जे व्रत स्वीकारले आहे त्यावर निष्ठा! बस. हे आणि इतकेच.

सध्या अमेरिकावासी असलेले पंडितजींचे शिष्य असलेले श्रीनिवास मुक्ती राव यांनी आपली  वास्तू बारा वर्षांपूर्वी आश्रम सुरू करण्यासाठी दिली. सकाळी ९ वाजता अभ्यासाला सुरुवात होते. प्रत्येक विद्यार्थ्याला गुरूंकडूनच शिक्षण मिळते. सकाळी ९ ते दुपारी १ आणि पुन्हा चारपासून रात्री आठ-साडेआठपर्यंत हा ज्ञानयज्ञ अखंड सुरू असतो. गुरू दौऱ्यावर जाताना शिष्यांना अभ्यासासाठी भरपूर ऐवज देऊन जातात. शिष्यांची तयारी अजमावणारी एक बैठक दरमहा होत असते; पण गुरुपौर्णिमा कार्यक्रम हे या आश्रमाचे एक वेगळेपण.

सूर- ताल- नृत्याचे अनेक रोमांचकारी, चकित करणारे प्रयोग यानिमित्ताने जन्म घेतात. इथे येणारे शिष्य हे वाद्य शिक्षणाचा पहिला टप्पा पार करून आलेले असतात. त्या अर्थाने हा ‘मास्टर क्लास’ आहे. देशभरातील विविध प्रांतांमधून येणाऱ्या शिष्यांना कलाकार म्हणून रंगमंचापर्यंत नेण्यासाठी लागणारा संगीताचा संस्कार, आत्मविश्वास आणि नजरिया इथे गुरूकडून मिळतो. विद्यार्थी त्यानंतर शागीर्द, मग कलाकार, शिक्षक त्यानंतर गुरू आणि सर्वांत शेवटी आचार्य असा संगीताचा प्रवास इथे सुरू होतो. कलाकार घडवण्याचे निरपेक्ष व्रत घेतलेला, आध्यात्मिक बैठक असलेला सहृदय गुरू जेव्हा या प्रवासात साथीला असतो तेव्हा घडत जाणारा कलाकार हा काळावर आपली मुद्रा उमटवणाराच असतो! असे शिक्षण ज्यांना मिळते ते शिष्य किती भाग्यवान म्हणायचे...!

Web Title: The rhythm of the tabla, the rhythm of the breath and the mystery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :musicसंगीत