असंतोषाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 09:22 AM2023-07-06T09:22:56+5:302023-07-06T09:23:07+5:30

पूर्ण पोलिस यंत्रणेवर नाही, असे ती आजी सांगत होती. अखेर फ्रान्समधील स्थिती थोडी स्थिर होण्याच्या मार्गावर आहे.

The riots in France spread to Switzerland and Bulgaria. | असंतोषाची ठिणगी

असंतोषाची ठिणगी

googlenewsNext

गेला आठवडाभर फ्रान्स धगधगत होता. फ्रान्समध्ये होणाऱ्या दंगलीची धग स्वित्झर्लंड, बल्गेरियापर्यंतही पोहोचली. कार चालवताना नियमाचा भंग केला म्हणून सतरा वर्षांच्या तरुणावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तो मरण पावला. नाहेल मोर्झक असे या मुलाचे नाव तो अल्जिरिअन वंशाचा होता. पोलिसांविरुद्ध खदखदणारा असंतोष बाहेर पडायला ही ठिणगी पुरेशी होती. हजारो लोक रस्त्यावर आले. अनेक ठिकाणी हिंसेला तोंड फुटले. अटक केलेल्यांमध्ये तेरा वर्षांच्या मुलांचाही समावेश होता आणि अशा मुलांची संख्या हजारोंच्या घरात होती. दंगलखोरांना रोखण्यासाठी ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा फ्रान्समध्ये रस्त्यावर उतरला होता. नाहेलच्या आजीने जमावाला अनेकदा शांततेचे आवाहन केले. ज्या पोलिसाने गोळी मारली त्याच्यावर माझा राग आहे.

पूर्ण पोलिस यंत्रणेवर नाही, असे ती आजी सांगत होती. अखेर फ्रान्समधील स्थिती थोडी स्थिर होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व घटनांमागे केवळ तेथील पोलिस यंत्रणेचे वर्तनच नव्हे, तर तेथील स्थलांतरितांबाबतचे धोरण, वंशवाद अशीही कारणे आहेत. चालत्या कारवर पोलिसांनी गोळीबार केल्याच्या १३८ घटनांची नोंद २०२२ या एकाच वर्षात झाली आहे. तेरा जणांचा यात मृत्यू झाला. फ्रान्समध्ये घडलेल्या या घटनेमुळे २००५ मधील घटनेची चर्चा होत आहे. पंधरा आणि सतरा वर्षांच्या झईद आणि बोना या दोन किशोरवयीनांचा पोलिसांनी पाठलाग केला. मुलांजवळ आवश्यक कागदपत्रे नव्हती. पोलिसांपासून पळून जाताना एका विद्युत स्थानकात त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला आणि विजेच्या धक्क्याने दोघांचाही मृत्यू झाला. फ्रान्स महिनाभर धगधगत होते. यातील महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पोलिसांवर आरोप होते, अशा संबंधित पोलिसांना तेथील न्याययंत्रणेने दहा वर्षांनंतर निर्दोष मुक्त केले.

फ्रान्समध्ये आताची स्थितीही फारशी वेगळी नाही. मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराचे परिणाम दिसायला लागले, तेव्हा १९७० च्या दशकात तेथील धोरण बदलले. युरोपातील बेल्जियम, इटली, स्पेन अशा देशांमधून कामगारांची गरज होती म्हणून मोठ्या प्रमाणावर कामगार फ्रान्समध्ये आले. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकेतील देशांतूनही लोक फ्रान्समध्ये आले. १९७० च्या दशकात स्थलांतरावर निर्बंध आणण्यास सुरुवात झाली. फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या वर्षी स्थलांतरितांसाठी एक विधेयक आणले असून, कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांना नियमित करण्यात येणार आहे. तसेच, गुन्ह्यांची नोंद असलेल्यांना फ्रान्सबाहेर काढण्यात येण्याची तरतूद असणार आहे. केवळ स्थलांतरितांमुळे या ठिकाणी 'फॉल्ट लाइन्स' तयार झाल्या आहेत, असे नव्हे, तर वंशश्रेष्ठत्ववादाचेही कारण यामागे दडलेले आहे. विविध देशांत वसाहती स्थापन करण्यात फ्रान्सही आघाडीवर होता. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली.

लोकशाही, समतेच्या तत्त्वांचा जागर साऱ्या जगभर होत असताना आपल्याच हुकमतीखाली असलेल्या वसाहतींबाबत मात्र युरोपातील देशांनी वेगळे धोरण राबविले. फ्रान्समध्ये वंशवादाने अनेक त्रस्त आहेत. ज्या वयात तरुणांच्या मनामध्ये मोठी स्वप्ने असतात, अशा वयात संवेदनशून्य प्रशासनाचा सामना हजारो किशोरवयीन जेथे करतात, अशा देशाची अंतर्गत परिस्थिती लक्षात यावी. आज अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटनच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्रांत फ्रान्सला स्थान आहे. फ्रान्सपेक्षा हजार पटीने विविधता आणि शांततापूर्ण सौहार्द असलेल्या भारताला मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व नाही.

भारत आणि फ्रान्सचे संबंध उत्तम आहेत. संरक्षण क्षेत्रामध्ये फ्रान्सकडून घेतलेली सामग्री कायमच भारताला उपयुक्त ठरलेली आहे. फ्रान्समधील अंतर्गत समस्यांमुळे हे संबंध बिघडण्याची शक्यता नसली, तरी फ्रान्समध्ये सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे या देशाच्या प्रतिमेवर जो परिणाम होत आहे, त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असते. फ्रान्समधील 'शाली हेब्दो' मासिकामधील कार्टूनचे गाजलेले उदाहरणही इथे स्वाभाविक. देशानेच आखलेल्या धोरणांमुळे जे विविध समाज त्या देशांत नांदत आहेत, त्यांच्यावर पाश्चिमात्त्य संस्कृती लादण्यापेक्षा त्यांच्या संस्कृतीचा आदर करणे गरजेचे आहे. फ्रान्सला याबाबत भारताची नक्कीच मदत होऊ शकेल. भारताने जगाला दिलेला विश्वशांतीचा संदेश इथे महत्त्वाचा. कुठल्याही संघर्षात प्रेमाचा विजय होतो. परस्परांच्या संस्कृतींचा आदर हवा. विनाकारण कुणाला लक्ष्य करणे टाळले, तरच शांतता नांदू शकेल. अन्यथा अस्थिरतेच्या विळख्यात फ्रान्समधील समाज अडकण्याची भीती आहे.

Web Title: The riots in France spread to Switzerland and Bulgaria.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.