उद्योगाच्या आकाशात महिलांची उत्तुंग भरारी
By विजय दर्डा | Published: November 14, 2022 06:37 AM2022-11-14T06:37:04+5:302022-11-14T06:38:24+5:30
फोर्ब्सच्या ‘आशियाई पॉवर बिझनेस वुमन’ यादीत तीन भारतीय महिला आहेत. महिलांमध्ये विविध प्रकारच्या अपार शक्ती असतातच, प्रश्न संधीचा आहे!
- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,
लोकमत समूह)
फोर्ब्स या अमेरिकन नियतकालिकाने आपल्या ताज्या अंकात वीस ‘आशियाई पॉवर बिझनेस वुमन’ची यादी जाहीर केली आहे. या यादीत तीन भारतीयमहिला आहेत. या नियतकालिकाच्या कोणत्याही यादीत समावेश असणे ही कोणासाठीही सन्मानाचीच गोष्ट असते. १९१७ मध्ये फोर्ब्सचे प्रकाशन सुरू झाले. वर्षात त्याचे आठ अंक प्रकाशित होतात. गेली तीन वर्षे (२०१९, २० आणि २१) भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश जगातील शंभर प्रभावशाली महिलांच्या यादीत करण्यात आला होता. २०२२ च्या ‘आशियाई पॉवर बिझनेस वुमन’ या यादीत तीन भारतीय महिलांचा समावेश झाला आहे : स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) च्या अध्यक्ष सोमा मंडल, एम्क्युअर फार्माच्या कार्यकारी संचालक नमिता थापर आणि होनासा कन्झ्युमरच्या सहसंस्थापक आणि चीफ इनोव्हेशन ऑफिसर गझल अलघ!
कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीतही ज्यांनी आपला व्यवसाय वाढविण्यात यश मिळवले, अशा महिलांनाच या यादीत स्थान मिळाले, हे या यादीचे वैशिष्ट्य आहे. सोमा मंडल या ‘सेल’च्या पहिल्या महिला कार्यकारी संचालक तर आहेतच, शिवाय पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. सोमा मंडल, नमिता थापर आणि गझल अलघ यांनी आपल्या दूरदृष्टीतून सफलतेचा नवा वस्तूपाठ समोर ठेवला, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
याआधी फोर्ब्स इंडियाने हेमलता अण्णामलाई (एम्पियर इलेक्ट्रिक), फाल्गुनी नायर (नायका), आदिती गुप्ता (मेन्सट्रुपेडिया), इंडिया वाणी (कोला कल्लारी कॅपिटल), राधिका अग्रवाल (शॉप क्लूज), शुची मुखर्जी (लाइमरोड), रोशनी नदार मल्होत्रा यांच्यासह इतर अनेक महिलांना आपल्या यादीत स्थान दिले आहे. इतिहासावर नजर टाकली तर दिसेल, भारताच्या मुलींनी प्रत्येकच कालखंडात सफलतेचा ध्वज फडकवला! सम्राट पृथ्वीराज चव्हाण त्याच्या काळात स्त्री शक्ती आणि सन्मानाचे महत्त्व सांगत असे. अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, रजिया सुलतान यांच्या राजवटींची आपल्याला ओळख आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात इंदिरा गांधी यांना कोण विसरू शकेल? एक मोठी लढाई लढून त्यांनी नव्या देशाची निर्मिती केली. वर्तमानकाळाबद्दलच सांगायचे तर भारताच्या मुली अंतराळ, विज्ञान, तंत्रज्ञानापासून ते ऑलिम्पिकपर्यंत नव्या कहाण्या लिहीत आहेत. जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करून आपले सामर्थ्य सिद्ध करत आहेत. भारताचे पायदळ, वायुसेना आणि नौदलाच्या प्रमुखपदीही महिला असण्याचा काळ काही लांब नाही. तिन्ही दलांचे प्रमुखपदही महिलेच्या हाती असेल. २०५० पर्यंत आपण जगामधली तिसरी मोठी आर्थिक शक्ती झालेले असू आणि त्यात सर्वांत मोठी भूमिका महिला बजावणार आहेत. महिला आपल्या संस्कृतीला सोबत घेऊन पुढे जातील, हे त्या प्रगतीचे वैशिष्ट्य असेल. कपडे बदलले म्हणजे संस्कृती बदलत नाही, हे लक्षात घ्या. संस्कृती म्हणजे खरे तर आंतरिक शक्ती! देशातील सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योगात १८ टक्क्यांपेक्षा जास्त ठिकाणी महिलांकडे सूत्रे असल्याचे आकडेवारीवरून दिसते. या १८ टक्के उद्योगात २३ टक्क्यांपेक्षा अधिक लोक काम करतात. देशाच्या एकूण अंतर्गत उत्पन्नात सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योगांचा वाटा २९ टक्क्यांहून जास्त झालेला आहे.
देशाच्या विभिन्न राज्यात असलेल्या व्यावसायिक संस्थांमध्ये मात्र महिलांचा सहभाग अजूनही १४ टक्क्यांपेक्षा जास्त नाही, असे नॅशनल सॅम्पल सर्व्हेचे आकडे सांगतात. त्यातही पूर्व आणि दक्षिण भारतातील महिला अग्रेसर आहेत. देशाच्या अन्य राज्यांमध्ये व्यावसायिक संस्थांमध्ये महिला कमीच दिसतात. हे चित्र बदलण्याची गरज आहे. डॉ. मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना देशाची अर्थदिशा बदलली, त्यावेळच्या धोरणांमध्ये महिलांच्या सहभागाचा विचार केला गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिलांच्या कार्यक्षमतेच्या सुयोग्य वापरावर भर दिला आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या प्रत्येक कंपनीत एक महिला संचालक असणे सेबीने अनिवार्य केले आहे. कंपन्यांमध्ये महिलांची संख्या वाढली खरी; पण यामुळे त्यांचा सहभाग पूर्णत्वाकडे गेला, असे म्हणता येत नाही. अनिवार्यतेमुळे सहभाग मिळालेल्या सर्वच महिला आपल्या अधिकारांचा उपयोग करू शकतात का, हा खरा प्रश्न आहे. ज्यांनी स्व- सामर्थ्यावर आपली कंपनी वाढवली, अशा उद्योग क्षेत्रातल्या अनेक महिला मला ठाऊक आहेत; पण सगळीकडे अशी परिस्थिती नाही.
अमेरिका आणि जपानसारख्या विकसित देशांच्या सर्वोच्च नेतृत्व शिखरावर कोणीही महिला अद्याप पोहोचलेली नाही. आपल्याकडे प्रतिभाताई पाटील आणि आता द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपद भूषवले. एकेकाळी आपलाच हिस्सा असलेल्या पाकिस्तान व बांगलादेश या देशातही महिला नेतृत्वाच्या शिखरावर गेलेल्या दिसतात. महिलांमध्ये अपार शक्ती आणि नेतृत्वाची विलक्षण ताकद असते यावर माझा विश्वास आहे. ही ताकद क्वचित पुरुषांपेक्षाही जास्त असते. प्रश्न उरतो तो फक्त संधी मिळण्याचा!
आज देशात अनेक ठिकाणी मुलींना शाळा सोडायला भाग पाडले जाते. स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण कमी झाले असले, तरीही हा कलंक पूर्णपणे पुसला गेलेला नाही. महिलांसमोर ज्या मूलभूत समस्या आहेत त्या दूर कराव्या लागतील. महिलांच्या अभिनव उपक्रमशीलतेला संधी मिळावी लागेल. ‘वुमेन आंत्रप्रेन्युअरशिप इन इंडिया’चा अहवाल सांगतो की महिलांच्या उद्यमशीलतेला संपूर्णपणे संधी दिली गेली तर रोजगाराच्या १७ कोटी संधी उपलब्ध होऊ शकतील! आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण समाजाला आपला रूढीप्रियतेचा विचार बाजूला ठेवावा लागेल. मग, पाहा आपल्या मुली किती उंच भराऱ्या मारतात ते!