संतांनी ‘विचार’ दिला, आपण फक्त ‘पुतळे’ उभारले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 08:13 AM2022-06-06T08:13:06+5:302022-06-06T08:13:56+5:30
आज प्रत्येकाच्या शैक्षणिक पदव्यांच्या भेंडोळ्या वाढताहेत, पण त्यातून व्यक्तिमत्व विकासापेक्षा अहंकार वाढत चालला आहे. आपण कुठून कुठे चाललो आहोत?...
- ज्ञानेश्वर रक्षक, नागपूर
भारतीय समाजात विवाह जुळवणीचा प्रवास फार मोठा असतो. आज तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतात. दोघांनाही आपल्याला शोभेल, असे स्थळ हवे असते. मुलाला शासकीय नोकरी किंवा खासगी कंपनीत गडगंज पगाराची नोकरी असेल तर उत्तमच. दोघेही नोकरी करणारे असतील, तर दुधात साखर, पण आपले स्वभाव जुळताहेत की नाही, हे पाहण्यापेक्षा पत्रिका जुळते की नाही, यावर दोन्ही बाजूंनी भर दिला जातो. त्यासाठी अनेक व्रतं करण्यास सांगितली जातात.
सध्या कोणत्याही लग्नात अशी व्रतवैकल्ये वाढीस लागलेली दिसतात. जसजसे आपण ‘शिक्षित’ होत चाललोय, तसतसे ‘विचार’ मागे पडत चाललेत की काय, असे वाटते. विकासाच्या वाटेवर जाण्यापेक्षा आपण स्वत:च आपले पाय मागे ओढतो आहोत, इतरांनाही तसे करायला भाग पाडतो आहोत. समाजाला योग्य वाटेवर नेण्यासाठी आपल्या संतांनी आजवर कठोर परिश्रम केले आहेत. त्यांचा विचार कालच्यापेक्षाही आज अधिक सुसंगत आणि गरजेचा वाटतो.
इव्हेंट मॅनेजमेंट, श्रीमंतीचा देखावा, मेकअपचा मुलामा, सुंदर चेहरे खराब करत मेकअप उतरला तर मुला-मुलींचे प्रेमही उतरताना दिसते. ‘मी जी मुलगी लग्नासाठी पाहिली, ती ही नाही’, इथपर्यंत मजल जात कोर्टाची पायरी चढली जाते. लग्नाच्या देखाव्यात पैशाचा चुराडा कर्जबाजारीपणा माथी मारून जातो. मनोरंजन आणि संस्कार यातील फरक संपुष्टात येत असल्यामुळे आज लग्न आणि काही दिवसात घटस्फोट... ही संस्कृती समाजात वाढताना दिसते आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात...
‘‘कितीतरी मुली असती सुंदर
परि हुंड्यासाठी राहती कुवार
तैसाचि मुलांचा व्यवहार
जातीत भासे कित्येक॥६॥ग्रा.अ. २१’’
आज प्रत्येकाच्या शैक्षणिक पदव्यांच्या भेंडोळ्या वाढल्या, पण त्यातून व्यक्तिमत्व विकासापेक्षा अहंकार वाढत चालला आहे. प्रेमाची भाषा बदलली आहे. लग्नानंतर काहीच दिवसात संसाराची घडी
विस्कटताना दिसते. प्रेमातील आणाभाका सिनेमा-नाटकांपुरत्याच मर्यादित ठरतात. ज्योतिष, कुंडलीने ग्रह-तारे पाहून मुहूर्त काढून लग्नाच्या वेळा ठरवल्या जातात. लग्न जुळल्यावर शुभकार्य नर्विघ्नपणे पार पडावे म्हणून प्राण्यांचा बळी दिला जातो, लग्नाची
तिथी मुहूर्त काढण्यासाठी भली मोठी दक्षिणा दिली जाते. आपण कुठून कुठे चाललो आहोत?...
राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत लिहिले आहे...
‘‘काही मुलींना खपवू पाहती
ध्यानी न घेता नीति-अनीति
ऐसी लाचार केली स्थिती
नाना रूढ्यांनी ॥७६॥ ग्रा.अ. २१’’
‘‘ज्योतिषासी देऊन-घेऊन
मनासारिखे काढविती गुण ।
प्रसंगी नावही सांगती बदलून
दंभ दारुन वाढला ॥ ७७॥ ग्रा.अ. २१’’
या साऱ्या गोष्टी आज शिकलेल्या कुटुंबात मोठ्या प्रमाणात दिसतात. संत, महात्म्यांनी समाजासाठी खस्ता खाल्ल्या, पण आपण त्यांचे फक्त पुतळे उभारले. त्यांची शिकवण, त्यांचे विचार आपण कधी अंगिकारणार आहोत?