आप्पासाहेबांच्या सर्वव्यापी जादूचे रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 10:18 AM2023-02-09T10:18:31+5:302023-02-09T10:21:17+5:30

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त एका अखंड सेवाव्रताचा कृतज्ञ गौरव!

The secret of Appasaheb's omnipresent magic | आप्पासाहेबांच्या सर्वव्यापी जादूचे रहस्य!

आप्पासाहेबांच्या सर्वव्यापी जादूचे रहस्य!

Next

रवींद्र राऊळ, उपवृत्तसंपादक, लोकमत, मुंबई -

‘जय सद्गुरू’ हे शब्द कानावर पडले की मागोमाग श्री-सदस्य, श्री-समर्थ बैठक, नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी असेही शब्द येतातच! हे एक विलक्षण जग आहे : जनसेवेत मग्न असलेल्या अबोल श्री-सदस्यांचं जग! रेवदांड्याच्या श्रीसमर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समितीचे श्री-सदस्य! या श्री-सदस्यांचा केंद्रबिंदू आहे तो रेवदांड्यात. 
केवळ राज्यातच नव्हे तर देशपरदेशात पसरलेल्या लाखो अनुयायांना आप्पासाहेबांच्या भेटीची इतकी ओढ का? त्यांच्याबद्दल इतका अपार आदर वाटावा अशी कोणती जादू आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात? ते कोणता चमत्कार करतात? - ते कोणताही चमत्कार करत नाहीत किंबहुना अंधश्रद्धेला थारा न देण्याचीच त्यांची शिकवण; पण तरीही सामान्यांच्या जीवनात त्यांनी चमत्कारच घडवला आहे. कोणत्या प्रकारचा आहे हा चमत्कार? 

श्रीसमर्थ बैठकांच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि प्रासादिक निरूपणातून घराघरांत आणि मनामनांत मानवतेची मंदिरं उभी करणारे महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणून आप्पासाहेब सर्वश्रुत आहेत. आपल्या वडिलांच्या आध्यात्मिक कार्याचा वसा समर्थपणे जोपासत असतानाच त्यांनी मानवता धर्माला सर्वोच्च प्राधान्य दिलं.

अवघं विश्व आधुनिक युगाकडे सरकत असताना सर्वसामान्य माणसं तशी निर्नायकी आणि हवालदिल!  या चुकल्यामाकल्यांना वेळीच सन्मार्गावर आणण्याचं काम झालं नाही तर, ती अधिकच भरकटण्याची भीती. नानासाहेबांनी भविष्यातला हा धोका ओळखला होता. १९४३ मध्ये डॉ. नानासाहेबांनी श्रीविजयादशमीच्या शुभमुहूर्तावर समाज प्रबोधन कार्याची सुरुवात केली.  दासबोधावर सहज आणि सोप्या भाषेतून निरूपण सुरू केलं. या निरूपणातून मनं बिघडलेल्यांना, दुभंगलेल्यांना जागेवर आणण्याची दिशा धरली. नानासाहेबांनी श्रीसमर्थ बैठकांच्या माध्यमातून एकेक मनुष्य घडवण्यास सुरुवात केली.  

नानासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र आप्पासाहेबांनीही हे समाजकार्याचं शिवधनुष्य उचललं आणि  सामर्थ्यानं सांभाळलंसुद्धा. आध्यात्मिक कार्याला आप्पासाहेबांनी  सामाजिक प्रबोधनाची जोड दिली. देशानं मला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय दिलं, हा नानासाहेबांकडून प्रकट झालेला विचार श्री-सदस्याच्या अंगी रुजवण्यासाठी आप्पासाहेब झटत राहिले. परिवर्तनाच्या या प्रक्रियेत श्री-सदस्यांच्या घरातल्या लहानमोठ्या समस्या नष्ट होऊ लागतात. परिवार सुखी होतो. त्यानंतर पाळी येते ती समाजाचं देणं फेडण्याची. आप्पासाहेबांच्या रसाळ निरूपणानं सारे जण अलगद सामाजिक कार्याकडे ओढले जातात.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज संपूर्ण भारतात  समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक एकता अखंड राखणं, मानवी समाजाच्या पुनरुत्थानासाठी  जनप्रबोधन करणं, स्त्रियांचा सन्मान, हुंडाप्रथा रोखणं, व्यसनाधीनता दूर करणंं, अंधश्रद्धांचं निर्मूलन, आरोग्य शिबिरं आणि रक्तदान शिबिरं, ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण संवर्धन मोहीम आखून तिची अंमलबजावणी, शैक्षणिक साहित्य वाटप तसंच कर्णबधिर, गतिमंद विद्यार्थ्यांना आवश्यक ती साधनं पुरवणं; बसथांबे, पाणपोया यांची निर्मिती, विहिरी पुनर्भरण, गाळउपसा कार्यक्रम, सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोगजार आणि मार्गदर्शन मेळावे आदी विविध सामाजिक कार्यांना आप्पासाहेबांनी उभारी दिली आणि दिशाही!  आप्पासाहेबांनी हरित क्रांतीचा यज्ञ उभारल्यावर बोडके झालेले डोंगर, ओसाड झालेल्या टेकड्या, माळरानं आज एकमेकांशी बोलू लागले आहेत. हजारो हात  टिकाव, फावडी, कुदळी घेऊन आपापल्या कामाला लागतात. कधी शेकडोंच्या झुंडीनं एकत्र येऊन गावंच्या गावं स्वच्छ केली जातात. अचानक उगवलेले शेकडो श्री-सदस्य स्मशानभूमी झाडलोट करून स्वच्छ करतात. इथं धर्म, जात असा विचारही कुणाच्या डोक्यात येत नाही. कब्रस्तानचीही तितक्यात तन्मयतेनं सफाई होते.

श्रीसमर्थ बैठकांतून मानसिक स्वच्छता, लोकसहभागातून ग्राम-शहर स्वच्छता, आणि आता आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून शारीरिक स्वच्छता, असा स्वच्छतेचा त्रिवेणी दृष्टिकोन आप्पासाहेबांनी आपल्या दूरदृष्टीतून जपला. आप्पासाहेब  एकामागोमाग एका श्री-सदस्यांचा उद्धार करत पुढे जात असतात. समाजाकडून आपण बरंच काही घेतलंय, समाजाला परत देण्याची आपली जबाबदारी आहे, ही त्यांची भावना प्रत्येक श्री-सदस्याच्या हृदयातही वसली आहे. 
ravindra.rawool@lokmat.com
 

Web Title: The secret of Appasaheb's omnipresent magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.