ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा आत्मा चरफडत असेल!

By विजय दर्डा | Published: October 31, 2022 10:19 AM2022-10-31T10:19:59+5:302022-10-31T10:20:23+5:30

आधी ईस्ट इंडिया कंपनीची मालकी एका भारतीयाने मिळवली, आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरही भारतीय वंशाचा तरुण!

The spirit of former British Prime Minister Winston Churchill will be burning! | ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा आत्मा चरफडत असेल!

ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा आत्मा चरफडत असेल!

googlenewsNext

-  विजय दर्डा 

मला अचानक विन्स्टन चर्चिल यांची आठवण का आली? १९४० ते ४५ आणि १९५१ ते ५५ या काळात ते ब्रिटनचे पंतप्रधान होते; त्याच पदावर आता भारतीय वंशाचे  ऋषी सुनक स्थानापन्न झाले आहेत. चर्चिल यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत ब्रिटनचा गुलाम होता. स्वातंत्र्यलढा निर्णायक टप्प्यात पोहोचलेला असताना चर्चिल म्हणाले होते, ‘मी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी पंतप्रधान झालेलो नाही. भारताला स्वातंत्र्याचे स्वप्न पाहण्याचा अधिकारच नाही आणि स्वतंत्र झाले तरी भारतीय देश चालवू शकणार नाहीत!

काळ कसा बदललाय पहा. चर्चिल यांच्यानंतर मध्ये पंधरा पंतप्रधान होऊन गेले. आता त्या खुर्चीत ऋषी सुनक विराजमान झाले आहेत. ज्या भारतीय वंशाला आपण दुय्यम मानले, ज्याच्या राष्ट्रपित्याला अर्धनग्न फकीर म्हटले, त्या भारतीय वंशाची एक व्यक्ती ब्रिटनची पंतप्रधान कशी काय झाली?- असा प्रश्न पडून चर्चिल यांचा आत्मा आता चरफडत  असेल. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये चर्चिल पुन्हा ब्रिटनचे पंतप्रधान झाले.  पंडित जवाहरलाल नेहरू इंग्लंडला गेले तेव्हा चर्चिल यांनी त्यांना विचारले की ‘आपल्याला आम्ही तुरुंगात टाकले होते तरी आपण आमची घृणा करत नाही?’ पंडितजी उत्तरले होते की, ‘आमचा देश महावीर आणि बुद्धाचा आहे.

आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत. आम्ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चालत राहिलो आणि इंग्रजांना भारत सोडावा लागला. एका स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान म्हणून मी आपल्याला भेटायला आलो आहे. मनामध्ये घृणा असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही!’ चर्चिल यांना हे ऐकून नक्कीच आत्मग्लानीचा अनुभव आला असेल. कारण याच माणसामुळे १९४३ सालच्या भीषण दुष्काळात जवळपास ३० लाखांहून जास्त भारतीयांचा बळी गेला होता. गोदामे अन्नधान्याने भरलेली होती. परंतु, चर्चिल यांनी दारे उघडली नाहीत. उलट म्हटले की, ही मदत तुम्हाला पुरणार नाही, कारण भारतीय पुष्कळच मुलांना जन्म देत असतात! चर्चिल यांचे हे सगळे बोलणे आठवून सुन्न व्हायला होते; पण आता काळ बदलला आहे. भारतीय असल्याबद्दल गर्व बाळगण्याचे दिवस आले आहेत. 

ऋषी सुनक यांचे भारतीय पूर्वज केनिया मार्गे ब्रिटनमध्ये पोहोचले. सुनक आता पूर्णपणे एक ब्रिटिश नागरिक आहेत यात शंका नाही. त्यांच्या देशाचे हित हेच त्यांच्या दृष्टीने अग्रक्रमाचे असेल यातही शंका नाही. असलेच पाहिजे; पण आपण ते भारतीय वंशाचे आहेत याचा अभिमान नक्की बाळगू शकतो. भारतीय धार्मिक परंपरा त्यांच्या रक्तात आहे. आणि ते तिचे प्रदर्शन करताना संकोचत नाहीत. भारताचे प्रतिष्ठित उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता त्यांची पत्नी आहे. त्यामुळे भारताशी सुनक यांचे नाते घट्ट आहे.

उद्योग आणि राजकारणात येण्याचा सल्ला आपल्याला सासरे नारायण मूर्ती यांनी दिला असेही ते सांगतात. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती हे अत्यंत संस्कारशील दाम्पत्य आहे. आणि सुनक यांच्यातही ते संस्कार डोकावतात.ऋषी सुनक ज्या हुजूर पक्षाचे, त्याचा भारताबद्दलचा दृष्टिकोन कधीही चांगला नव्हता; परंतु अनेकदा काळ बदलायला भाग पाडत असतो. त्यांच्याच पक्षाच्या बोरीस जॉन्सन यांनी पहिल्या वेळी सुनक यांना ते ब्रिटिश वंशीय नसल्याने पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू दिले नव्हते. लीस ट्रस यांचा टिकाव लागला नाही आणि  सुनक यांना संधी मिळणे क्रमप्राप्त झाले. 
 

सुनक पंतप्रधान झाल्यानंतर ब्रिटन हा किती उदार देश आहे असेही बोलले जाऊ लागले आहे. परंतु, सुनक यांना पंतप्रधान करणे ब्रिटनला भाग पडले आहे.  पुढच्या निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्ष  जिंकू शकला आणि  सुनक पुन्हा पंतप्रधान झाले तरच ब्रिटन उदार देश आहे हे मान्य करता येईल. सध्या ब्रिटनची एकंदर परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा परिस्थितीत अर्थमंत्री म्हणून  उत्तम कामगिरी करणारे सुनक  यांच्यापेक्षा पंतप्रधान म्हणून दुसरा पर्याय नव्हताच.
फार तर असे म्हणता येईल की, भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांची पिढी आता राहिलेली नाही.

नवीन पिढी ब्रिटनच्या विकासात भारतीयांचे योगदान पाहत आहे. भारत जेव्हा परतंत्र होता, तेव्हा जितके इंग्रज येथे राज्य करण्यासाठी येऊन राहत होते, त्यापेक्षा जास्त भारतीय आज ब्रिटनमध्ये राहतात. १९४१ च्या खानेसुमारीनुसार त्यावेळी जवळपास १.४४ लाख इंग्रज भारतामध्ये राहत होते. आज मूळचे भारतीय असे सोळा लाखांपेक्षा जास्त लोक ब्रिटनमध्ये राहत आहेत. ही संख्या ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे २.६ टक्के आहे. त्यात ३४ टक्क्यांपेक्षा जास्त युवक आहेत. मूळच्या भारतीय अशा सुमारे ५० टक्के लोकांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला आहे. 
 

ब्रिटनच्या आर्थिक विकासात भारतीय वंशाचे मोठे योगदान आहे. राजकारणातही त्यांचा प्रभाव सातत्याने वाढतो आहे. २०१९ च्या निवडणुकीत मूळचे भारतीय असलेले १५ खासदार निवडून आले. तितकेच लोक पाकिस्तान वंशी होते. मूळचे बांगलादेशी असलेले चार लोकही संसदेत पोहोचले. याचा अर्थ ब्रिटनमध्ये वंशभेद संपला, असा मुळीच नाही. भेदभाव अजूनही आहे. परंतु, भारतीयांनी तेथे इज्जत कमावली, प्रतिष्ठा मिळवली. जेव्हा हिंदुस्थान युनी लिव्हरचे सीईओ आणि एमडी संजीव मेहता यांनी भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी विकत घेतली, तेव्हा आपली छाती आनंदाने फुलली होती.

विश्व युद्धाच्या वेळी ब्रिटिश संसदेच्या जवळ असणारे चर्चिल यांचे अकराशे खोल्यांचे  कार्यालयही हिंदुजा समूहाने केव्हाच खरेदी केले आहे. तेथे आता हॉटेल उघडले जात आहे. भारतीयांनी जगभर केवळ आर्थिकच नव्हे, तर राजकारणातही लक्षणीय टप्पा गाठला आहे. मॉरिशस, फिजी अशा देशात तर भारतीय राजकारणाच्या शीर्षस्थानी आहेत. कॅनडामध्येही भारतीयांचा पुष्कळच प्रभाव आहे. पोर्तुगालचे पंतप्रधान अन्तोनिओ कोस्टा हेही मूळचे भारतीय आहेत. येणारा काळ भारतीयांसाठी चांगला असेल हे नक्कीच; पण एका गोष्टीचे स्मरण ठेवले पाहिजे, ते म्हणजे आपण आपले संस्कार सोडता कामा नयेत. कारण तीच आपली शक्ती आहे.

Web Title: The spirit of former British Prime Minister Winston Churchill will be burning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.