राष्ट्रवादीतील फुटीने ‘सहकारा’तही टिकटिक
By किरण अग्रवाल | Published: July 9, 2023 11:53 AM2023-07-09T11:53:05+5:302023-07-09T11:53:24+5:30
The split in the NCP : स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये मात्र कोणता झेंडा घेऊ हाती? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
- किरण अग्रवाल
पश्चिम वऱ्हाडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजकीय ताकद तशी मर्यादित असली तरी सहकार क्षेत्रावर या पक्षाचा वरचष्मा आहे, त्यामुळे या संस्थांतील दिग्गजांसाठी आपले सुभे सांभाळून पक्षीय नाळ जपणे काहीसे अवघड ठरले तर ते आश्चर्याचे ठरू नये.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुभंगाने राजकीय समीकरणे घडतील व बिघडतीलही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सहकारी संस्थांवरील या पक्षाचे वर्चस्व खिळखिळे होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही आणि तेवढे जरी झाले तरी या फुटीमागील घटकांसाठी ते दिलासादायकच ठरेल, म्हणून आता सहकारातील पडसादाकडे लक्ष लागून राहणे स्वाभाविक आहे.
महाराष्ट्रातील राजकारण हे नवनवीन समीकरणांची जणू प्रयोगशाळाच बनू पाहते आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अगोदर काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत शिवसेना गेली म्हणून टीका होत होती, नंतर शिवसेनेत फूट पडली. आता राष्ट्रवादीत दुभंग घडून अजितदादा पवार यांच्यासह मातब्बर नेत्यांनी भाजप, शिवसेना शिंदे गटासोबत सत्तासोबत केली आहे. नेत्यांच्या या अशा सामिलकीमुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये मात्र कोणता झेंडा घेऊ हाती? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीने स्थानिक स्वराज्य संस्था व एकूण राजकारणात काय परिणाम व्हायचा तो होईलच, परंतु या पक्षाचा सहकार क्षेत्रात जागोजागी दबदबा राहिलेला असल्याने आता त्या संस्थांमधील सत्तेचे काय असा प्रश्न उपस्थित होऊ पाहतो आहे. सहकारातील अनेक दिग्गज हे शरद पवार यांना मानणारे असल्याने सद्य:स्थितीत त्यांचीही अडचण होऊन गेली असून, प्रत्येकाचे तसे स्वायत्त संस्थान असल्याने त्यांचा कल उघड होऊ शकलेला नाही.
पश्चिम वऱ्हाडातील राष्ट्रवादीचा विचार करता, तीनही जिल्ह्यांत निवडून गेलेले एकमेव डॉ.राजेंद्र शिंगणे आमदार आहेत. अकोल्यातील जिल्हा बँक, मार्केट कमिटी, खरेदी-विक्री संघ अशा सहकारी संस्थांवर पक्षाचा प्रभाव असला तरी, जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक अवस्था व लोकप्रतिनिधींची संख्या तशी बेताचीच आहे. जिल्हा परिषदेत पाच सदस्य असून, गेल्या महापालिकेत पाच नगरसेवक होते. मागे तुकाराम बिरकड या पक्षाचे आमदार म्हणून निवडून गेले होते, अमोल मिटकरी यांना विधान परिषदेची संधी मिळालेली आहे, तर गुलाबराव गावंडे यांच्यासारखा धडाडीचा व आक्रमक नेता या पक्षाकडे आहे; परंतु संघटनात्मक स्थिती विकलांग आहे. अशात, फुटीमुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्यासारखी स्थिती आहे व विशेषतः सहकारावर परिणाम होण्याची भीती आहे.
बुलढाणा जिल्ह्यात डॉ. शिंगणे हेच राष्ट्रवादीचा चेहरा राहिले आहेत. जिल्हा बँकेतही त्यांचीच सत्ता होती. अडचणीतील ही बँक सावरण्यासाठी व तिला प्रशासकीय चक्रातून बाहेर काढण्यासाठी सत्तेत पोहोचलेल्या अजितदादांच्या माध्यमातून सॉफ्ट लोन मिळाले तर ते ‘साहेबां’चे बोट सोडून अजितदादांसोबत जाऊ शकतात. तशी मानसिकता त्यांनी स्वतः बोलूनही दाखविली आहे. तेथील जिल्हा परिषदेत आठ सदस्य असून पालिकेत सुमारे २१ नगरसेवक होते. या संख्याबळात आता फाटाफूट होणे अपरिहार्य आहे. पण, ती होत असताना जिल्हा बँक वाचवण्याची अट पुढे येऊ घातलेली दिसत आहे.
वाशिम जिल्ह्यात त्यातल्या त्यात संघटनात्मक स्थिती बरी आहे. तेथील जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असून अन्य १३ सदस्य आहेत. मंगरूळपीरचे सुभाष ठाकरे यांनी यापूर्वी राज्य मंत्रिपद भूषविले असून, कारंजाचे स्व. प्रकाश डहाके माजी आमदार होते. त्यामुळे जिल्ह्यात बऱ्यापैकी पक्षाची ताकद आहे, यात आता विभागणी झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, राजकीय पक्षांमधील फुटी या पक्षांतर्गत नेतृत्वाच्या स्पर्धकांना संधी देणाऱ्याच ठरतात. शिवसेना फुटली तेव्हाही तेच बघावयास मिळाले व आता राष्ट्रवादीतही तेच होऊ घातले आहे. अकोल्यात पक्षाचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख, वाशिममध्ये चंद्रकांत ठाकरे हे अजितदादांसोबत आहेत म्हटल्यावर संग्राम गावंडे व वाशिमचे ज्येष्ठ नेते पांडुरंग ठाकरे हे शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत. अर्थात कोणीही कोणासोबतही राहोत, लोकांच्या प्रश्नांसाठी कोण काम करणार हेच महत्त्वाचे ठरणार आहे.
सारांशात, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे राजकीय समीकरणांच्या बदलासोबतच सहकारातील वर्चस्वाचे काय, अशा चिंतेची टिकटिक क्रमप्राप्त ठरली आहे. यातून पडणारे तडे केवळ पक्षाच्याच नव्हे, तर एकूणच सहकारी संस्थेच्याही अडचणीत भर टाकणारे ठरू शकतात म्हणून त्याची चिंता अधिक आहे.