दोन्ही हात नसलेल्या जिद्दी धनुर्धारीची कहाणी..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:34 AM2024-09-05T11:34:55+5:302024-09-05T11:38:07+5:30

तिला जन्मत:च दोन्ही हात नाहीत. फोकोमेलिया या दुर्मीळ आजारानं तिला ग्रासलं होतं. या आजारात अवयवांची एकतर वाढच होत नाही किंवा ते अर्धवटच राहतात. तिच्या बाबतीतही तेच झालं. निसर्गाचा हा ‘न्याय’ हसतमुखानं तिनं स्वीकारला. दोन्ही हात नसले तरी आजही सर्व गोष्टी ती स्वत:च करते.

The story of a stubborn archer without both hands.. | दोन्ही हात नसलेल्या जिद्दी धनुर्धारीची कहाणी..

दोन्ही हात नसलेल्या जिद्दी धनुर्धारीची कहाणी..

तिला जन्मत:च दोन्ही हात नाहीत. फोकोमेलिया या दुर्मीळ आजारानं तिला ग्रासलं होतं. या आजारात अवयवांची एकतर वाढच होत नाही किंवा ते अर्धवटच राहतात. तिच्या बाबतीतही तेच झालं. निसर्गाचा हा ‘न्याय’ हसतमुखानं तिनं स्वीकारला. दोन्ही हात नसले तरी आजही सर्व गोष्टी ती स्वत:च करते. पायांनाच तिनं हात बनवले. पायांनी ती लिहू शकते. वस्तू उचलू शकते. ती फुटबॉल खेळते, एवढंच काय, नुसत्या पायांनी ती झाडावरही चढते! 

सध्या ती १७ वर्षांची आहे, पण अख्ख्या जगाला तिनं अचंबित केलं आहे. तिरंदाजीची तिला आवड आहे आणि त्यातही तिनं कमालीचं कौशल्य प्राप्त केलं आहे. किती असावं हे कौशल्य? २०२२ मध्ये चीनमध्ये झालेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत तिरंदाजीत वैयक्तिक प्रकारात तिनं तब्बल दोन सुवर्णपदकं जिंकून पदकांची लयलूट केली. 

पण एवढंच नाही, सध्या पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत राकेशकुमारच्या साथीनं तिनं कांस्यपदकही पटकावलं. एकलव्याला तर फक्त उजव्या हाताचा अंगठाच नव्हता, पण या तरुणीला दोन्ही हात नसतानाही धनुर्विद्येत कोणालाही लाजवेल असं कौशल्य तिनं प्राप्त केलं आहे. दोन्ही हात नसतानाही तिरंदाजी करणारी, अंतरराष्ट्रीय आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत पदकं पटकावणारी ती भारताचीच नव्हे, तर जगातली पहिली महिला आहे!

या तरुणीचं नाव शीतल देवी. हात नसल्यानं लहानपणापासून ते अगदी आतापर्यंत रोज नवनव्या आव्हानांना तिला तोंड द्यावं लागतं आहे. पण तरीही तिच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी लोपलं नाही. तिचा संपूर्ण जीवनप्रवासच अडथळ्यांनी आणि चमत्कारांनी भरलेला आहे. 

जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात १० जानेवारी २००७ रोजी तिचा जन्म झाला. २०१९ मध्ये किश्तवार येथे झालेल्या एका युवा कार्यक्रमात तिनं सहभाग घेतला होता. लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी तिला तिथे पाहिलं. प्रशिक्षक अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वाधवान यांनी तिचा आत्मविश्वास पाहून तिला प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. 

तिला काही कृत्रिम अवयव देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण, तपासणी केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, कोणत्याही कृत्रिम अवयवांचा तिला काहीही उपयोग होणार नाही. त्यावेळी तिनं प्रशिक्षकांना सांगितलं, माझे पायच माझे हात आहेत. पायांनी मी अनेक गोष्टी करू शकते. एवढंच काय, मी झाडावरही चढू शकते! शीतलनं हे सांगितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. दोन्ही हात नसतानाही कोणी झाडावर कसं चढू शकतं?..
शीतलची जिद्द आणि आत्मविश्वास पाहून प्रशिक्षकांचाच हुरूप वाढला. त्यांनी तिला तिरंदाजीचं प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. पण, याआधी दोन्ही हात नसलेल्या कोणत्याच विद्यार्थ्याला त्यांनी प्रशिक्षण दिलेलं नव्हतं. त्यांनाही खूप अडचण येत होती. 

अमेरिकेतही असाच एक तिरंदाज आहे. मॅट टुत्झमन. त्यालाही जन्मत:च दोन्ही हात नाहीत, पण त्यानंही आंतरराष्ट्रीय मैदान गाजविताना २०१२च्या लंडन पॅरा ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलेलं आहे. त्याच्यामुळेही शीतलचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. केवळ ११ महिन्यांचं प्रशिक्षण तिनं घेतलं आणि २०२२च्या पॅरा आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदकांसह आणखीही काही पदकं पटकावली. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. 

पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्येही वैयक्तिक प्रकारात तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती, पण केवळ एका गुणानं तिचा क्वॉर्टर फायनलचा प्रवेश हुकला आणि पदकाचं स्वप्नंही भंगलं. पण मिक्स डबलमध्ये तिनं ही उणीव भरून काढली. ही स्पर्धाही इतकी चुरशीची आणि उत्कंठावर्धक झाली, की अनेकांनी आपले श्वास रोखून धरले. शेवटचे चार तीर चालवायचे बाकी होते आणि भारतीय संघ एक गुणानं मागे होता. इटलीची जोडी मातेओ बोनासिना आणि एलेओनोरा सारती यांचा भारतापेक्षा एक गुण जास्त होता. पण, भारतीय संघानं अतिशय संयमानं खेळ केला आणि दोन्ही संघांची बरोबरी झाली. दोघांनाही १५५-१५५ गुण मिळाले. टाय! पण नंतर पंचांनी पुन्हा बारकाईनं परीक्षण केलं आणि शीतलच्या ज्या निशाण्याला त्यांनी नऊ गुण दिले होते, ते नंतर अपग्रेड करून दहा पैकी दहा दिले! इटलीवर मात करून भारतानं कांस्यपदक जिंकलं!

आनंद महिंद्रांनाही होकाराची प्रतीक्षा!
प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी गेल्या वर्षीच शीतलला त्यांच्या कंपनीच्या कोणत्याही श्रेणीची कोणतीही कार निवडण्यास सांगितलं होतं. हवे ते बदल करून ही कस्टमाइज कार ते तिला भेट देणार होते. पण, स्वाभिमानी शीतल म्हणाली होती, १८ वर्षांची झाल्यावर मी तुमची ही भेट स्वीकारेन! आनंद महिंद्रा यांनी तिला पुन्हा या भेटीची आठवण करून देताना सांगतिलं, शीतल, माझं आश्वासन पूर्ण करण्याची वाट मी पाहतो आहे!

Web Title: The story of a stubborn archer without both hands..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.