निहोन हिदांक्यो, हिबाकुश व ‘सेंबाझुरू’ बनवणाऱ्या सादाकोची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 10:42 AM2024-10-14T10:42:42+5:302024-10-14T10:43:55+5:30
अण्वस्त्र हा शब्दच वर्ज्य ठरवून अण्वस्त्रमुक्त जगाचे स्वप्न पाहणाऱ्या निहोन हिंदाक्योचा नोबेल शांती पुरस्काराने सन्मान होणे हे ‘युद्धग्रस्तते’त आशेचे चिन्ह आहे.
अनंत घोटगाळकर, लेखक व अनुवादक -
युद्धाच्या कथा मुळीच रम्य नसतात. वेदना आणि विनाशाने भरलेल्या त्या महाभयानक शोकांतिका असतात. जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले गेले, ते क्षण मानवी इतिहासातील सर्वात भीषण क्षण म्हणूनच ओळखले जातात. ६ आणि ९ ऑगस्ट, १९४५ ला त्या अणुहल्ल्यांमुळे ही दोन्ही शहरे क्षणार्धात बेचिराख झाली. एक लाख वीस हजार स्त्री-पुरुष-मुले जळून खाक झाली. मरण पावले तेच भाग्यवान समजले जावेत, अशी अवस्था यातून वाचलेल्या अनेकांची झाली. अवयव गमावलेल्या आणि सर्वांग भाजलेल्या लोकांच्या वेदनांना पारावार राहिला नाही. पुढे अनेकांना किरणोत्सर्गाची बाधा होऊन कर्करोग झाला. गर्भवती स्त्रियांच्या गर्भावर दुष्परिणाम झाले. आनुवंशिक नुकसान कायमचे वाट्याला आले. प्रत्यक्ष पीडितांना आणि अवघ्या जपानला आघातोत्तर तणाव विकार, पर्यावरण हानी, आण्विक हिवाळा, निर्वासितांचे प्रश्न अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. असे अणुबॉम्बपीडित आयुष्य कंठायला सुमारे ६,५०,००० माणसे जिवंत राहिली.
स्फोटातून वाचलेल्या या क्षतिग्रस्त लोकांना जपानी भाषेत ‘हिबाकुशा’, असे म्हणतात. १९५६ उजाडेपर्यंत या हिबाकुशांच्या दुःखाला कोणत्याही मोठ्या व्यासपीठावर वाचा फोडली गेली नव्हती. १० ऑगस्ट, १९५६ रोजी त्यांच्या छोट्या-छोट्या संघटना एकत्र आल्या आणि पॅसिफिक महासागरातील अणुचाचणीचा त्रास सोसावा लागलेल्या लोकांनाही साथीला घेऊन त्यांनी ‘निहोन हिदांक्यो’ या नावाने हिबाकुशांचा एक महासंघ स्थापन केला.
यंदा याच निहोन हिदांक्यो या संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार घोषित झाला आहे. हिबाकुशांच्या सामाजिक व आर्थिक हक्कांबद्दल जाणीवजागृती करत त्यांच्या वाट्याला आले, ते यापुढे कुणाच्याही वाट्याला येऊ नये, म्हणून ही संस्था सर्वतोपरी प्रयत्न करत असते. व्यक्तिगत अनुभवांच्या आधारे अण्वस्त्रविरोधी लोकशिक्षणाची व्यापक मोहीम चालवत असते. अण्वस्त्रांचा यापुढे कधीच उपयोग केला जाता कामा नये, हे जनमानसात ठसवत असते. हिबाकुशांचे जीवन सुसह्य करण्यापासून सुरू झालेले तिचे काम जागतिक शांततेचे दूत होण्यापर्यंत विस्तारले आहे. विविध आंतरराष्ट्रीय संघटनांत आणि युनोतही ती दरवर्षी आपले शिष्टमंडळ पाठवते. अण्वस्त्रमुक्तीची सर्वात प्रखर प्रवक्ता बनलेली ही संस्था स्फोट पीडितांच्या प्रश्नांसाठी जपान सरकारवर आणि अण्वस्त्रमुक्तीसाठी जगभरातील सर्व सरकारांवर सातत्याने नैतिक दबाव आणत असते.
No more Hibakusha! - हे या संस्थेचे ब्रीदवाक्य. ओरिगामीने बनवलेला सारस पक्षी या संस्थेचे प्रतीक. त्यासंबंधीची कहाणी मोठी हृदयद्रावक आहे. ६ ऑगस्ट, १९४५ रोजी हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला गेला, तेव्हा शहरापासून थोड्या अंतरावर सादाको सासाकी नावाची दोन वर्षांची एक मुलगी राहत होती. तिला त्याक्षणी प्रत्यक्ष इजा झाली नाही. पण, किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम होऊन पुढे नऊ वर्षांनी तिला रक्ताचा कर्करोग झाला. पन्नासच्या दशकात त्यावर फारसे इलाज उपलब्ध नव्हते. तरीही तिला हॉस्पिटलात ठेवण्यात आले. जपानमध्ये सारस पक्षी शुभ मानला जातो. तो आनंद, दीर्घायुष्य आणि शांततेचे प्रतीक आहे. ओरिगामीचे एक हजार सारस बनवले की, दीर्घायुष्य लाभते, अशी जपानी समजूत आहे. असे हजार कागदी सारस पक्षी बनवण्याला ‘सेंबाझुरू’ असे जपानी नाव आहे. चिमुकल्या सादाकोने सेंबाझुरू बनवायचे ठरवले आणि बनवले सुद्धा; पण त्यानंतर काही काळातच ती निवर्तली. तिचा देह अभ्यासासाठी देण्यात आला. अणुहल्ल्याचा मानवी शरीरावरील गंभीर दुष्परिणाम अभ्यासायला सादाको सहाय्यभूत ठरली. अण्वस्त्र हल्ल्याच्या घोर दुष्परिणामांचे प्रतीक बनली. तिचे सारस जागतिक शांततेचे प्रतीक बनले आणि साहजिकच अण्वस्त्र बळींच्या त्याच दरम्यान स्थापन झालेल्या महासंघाने - निहोन हिदांक्योने ते आपलेही प्रतीक म्हणून स्वीकारले.
अणुबॉम्बचा जनक मानल्या जाणाऱ्या महान शास्त्रज्ञ ओपेनहायमर यांनासुद्धा आपले हात रक्ताने माखले आहेत, असे वाटले होते. पीडितांना भेटताना ओक्साबोक्सी रडत ते पुन:पुन्हा क्षमायाचना करत राहिले होते. याउलट आज अण्वस्त्रबळाचा वापर करण्याच्या प्रत्यक्ष धमक्या द्यायला हुकूमशहा कचरत नाहीत, असे दिसते. युक्रेन युद्ध तिसऱ्या वर्षातही चालूच आहे. गाझा पट्टी आणि सारी मध्यपूर्व अशांत आहे. खुद्द भारतीय उपखंडातही अण्वस्त्रसज्ज देशांचे संबंध मैत्रीपूर्ण नाहीत. अशा वेळी अण्वस्त्र वापरण्याची सूचक धमकी देणेसुद्धा अमानुष आहे, असे जगाला अनुभवजन्य अधिकारवाणीने सुनावणाऱ्या, अण्वस्त्र हा शब्दच वर्ज्य ठरवू पाहणाऱ्या आणि अण्वस्त्रमुक्त जगाचे स्वप्न पाहणाऱ्या निहोन हिदांक्योचा नोबेल शांती पुरस्काराने सन्मान होणे ही निश्चितच एक आशादायी घटना होय.
anantghotgalkar@gmail.com