पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:53 IST2025-04-20T12:52:36+5:302025-04-20T12:53:44+5:30

ग्रेस यांचे मला पत्र आले. अमेरिकेत जर इनग्रिड बर्गमन ह्या अभिनेत्री तुम्हाला भेटल्या तर त्यांना सांगा की हिंदुस्थानातला एक कवी त्यांचा प्रशंसक आहे. त्याचा पहिला कवितासंग्रह इनग्रिड बर्गमन यांना अर्पण करायचा आहे. तशी परवानगी हवी... 

The story of the birth of the book: This is how ‘Grace’s’ first book came about | पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले

पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले

-रामदास भटकळ

पाडगावकर, बापट, करंदीकर, रेगे यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध करताना लक्षात आले की सहसा कवितासंग्रहाची पृष्ठसंख्या कथा-कादंबरीपेक्षा कमी असली तरी मुखपृष्ठाचा खर्च तेवढाच असल्याने किमती चढ्या ठेवाव्या लागतात. त्या दिवसांत पेंग्विन या इंग्लिश पेपरबॅक मालिकेत शेकडो पुस्तके प्रसिद्ध होत. विषय काहीही असला तरी एकाच प्रकारचे मुखपृष्ठ वापरण्याचा पायंडा त्यांनी सुरू केला होता. 

मराठीत नव्याने वाटा शोधणारे अनेक कवी मनात भरत होते. त्यांची कविता पेंग्विनच्या पद्धतीने प्रकाशित केल्यास ग्राहकांना परवडू शकेल अशा विचाराने ‘नवे कवी : नवी कविता’ मालिका सुरू करण्याचे ठरवले.
निवड समितीचे पाठबळ असल्यास त्या कवितासंग्रहाकडे अधिक आस्थेने पाहिले जाईल या समजुतीने प्रा. वा.ल. कुळकर्णी, मंगेश पाडगावकर आणि शिरीष पै यांना विनंती केली. 

प्राध्यापक कुळकर्णी हे साहित्यातील नवीन प्रवृत्तींचे स्वागत करत, मंगेश पाडगावकर काव्यवाचनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर संचार करत. नवीन कवींना भेटत. शिरीष पै ‘मराठा’ दैनिकाच्या रविवारच्या आवृत्तीत नवीन कवींना आवर्जून स्थान देत.

या सुमारास प्रा. पु.शि. रेगे हे ‘छंद’ नावाचे द्वैमासिक संपादित करत. ‘छंद’च्या एका अंकात ग्रेस या कवीच्या बऱ्याच कविता एकत्र छापल्या गेल्या. ग्रेस म्हणजे कोण स्त्री का पुरुष यासंबंधीही माहिती नव्हती. परंतु ‘छंद’च्या संपादक मंडळातील जवळजवळ सर्व बुजुर्ग मंडळी त्या कवितांनी भारावली होती, मलाही त्या कवितांची भुरळ पडली होती. 

ग्रेस यांचा नागपूरचा पत्ता होता : माणिक गोडघाटे, द्वारा लीला गुणवर्धिनी, नागपूर. त्यामुळे संदेह बळकट व्हायचा. त्यांचे हस्ताक्षरही इतके मोहक होते की नजरेसमोर लावण्यवतीच उभी राहायची.

निवड समितीने एकमताने ‘नवे कवी : नवी कविता’ची सुरुवात ग्रेस यांच्या कवितासंग्रहाने करावी असे ठरवले. मी त्यांना पत्रातून या नवीन मालिकेची कल्पना दिल्यावर त्यांनी तत्काळ होकार दिला आणि माझा ग्रेस नामक कवीशी पत्रव्यवहार सुरू झाला. 

ग्रेस यांची पत्रे छोटीशी पण अत्यंत नेटक्या पद्धतीने लिहिलेली व गूढतेला अधिक गहन करणारी असायची. १९६५ च्या मे महिन्यात मी प्रकाशकांच्या प्रतिनिधी मंडळातून अमेरिकेला जाणार होतो. त्या काळात अमेरिका भेटीचे विशेष अप्रूप असायचे. 

‘ललित’ मासिकात ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी यानिमित्ताने माझ्यावर प्रदीर्घ लेख लिहिला. त्यामुळे ग्रेसना माझी अमेरिका भेट लक्षात आली.

त्यांचे मला पत्र आले. अमेरिकेत जर मला इनग्रिड बर्गमन ह्या अभिनेत्री भेटल्या तर त्यांना सांगा की हिंदुस्थानातला एक कवी त्यांचा प्रशंसक आहे. त्याचा पहिला कवितासंग्रह इनग्रिड बर्गमन यांना अर्पण करायचा आहे. तशी परवानगी हवी. शिवाय त्यांचा एक स्वाक्षरीसह फोटो मिळवण्याची मला विनंती करण्यात आली. जणू ही नटी मला वाटेत कुठे भेटणार होती.

अमेरिकेतल्या त्या प्रदीर्घ प्रवासात मी ही चमत्कारिक विनंती विसरून गेलो होतो. हॉलिवूडला पोहोचलो तेव्हा कुठे याद आली. सहज माझ्या मार्गदर्शक बाईंना बर्गमन अमेरिकेत असण्याची शक्यता आहे का, विचारले. तेव्हा तिने माझ्या अज्ञानाची कीव केली. 

रोझेलिनी या इटालियन दिग्दर्शकाशी जवळीक केल्यापासून इनग्रिडने अमेरिकेत पाऊलही न टाकण्याची घोषणा केली होती. मी एका जबाबदारीतून मुक्त झाल्याचा सुस्कारा सोडला. परतीच्या वाटेत लंडनला पोहोचलो. तिथे नाटके पाहणे हा माझा आवडीचा छंद होता. पाहतो तो ‘ए मंथ इन द कंट्री’ या नाटकात इनग्रिड बर्गमन काम करणार होत्या. 

मी त्यांना थिएटरच्या पत्त्यावर पत्र टाकले, माझी लंडनमधील मैत्रीण डॉक्टर तारा वनारसे हिची मदत घेतली आणि जर्मनीहून परत येऊन बर्गमन यांना भेटून आलो. त्या श्रेष्ठ अभिनेत्रीने माझे भयानक अक्षर लावून प्रत्येक शब्द लक्षात ठेवला होता. आमच्या भेटीत त्यांनी स्वतःचा फोटो सहीसकट तयार ठेवला होता. शिवाय माझ्या कॅमेऱ्यातून मला त्यांचा फोटो काढता आला. 

परतल्यावर मी प्रामाणिकपणे ते फोटो ग्रेस यांच्या हवाली केले. ग्रेस हे इनग्रिड बर्गमनचे चित्रपट आवर्जून पाहत. एका चित्रपटात तिच्या पात्राच्या संबंधात ‘ग्रेस’ या शब्दाचा उल्लेख झाला होता. माणिक गोडघाटे यांच्या कविमनाला ‘ग्रेस’ हे टोपण नाव घ्यायला ते पुरेसे होते. यथावकाश ‘संध्याकाळच्या कवितां’चे प्रकाशन झाले. चित्रकार पद्मा सहस्रबुद्धे यांच्या आग्रहाखातर मुखपृष्ठ दोन रंगांत पण कलात्मक केले.

या संग्रहाचे तर अपूर्व स्वागत झालेच; शिवाय ग्रेस यांच्या कवितांवरील दुर्बोधतेचा शिक्का बाजूला सारून अनेक संगीतकारांनी त्यांना चाली दिल्या. पुढील काही वर्षांत ते समीक्षकांना चक्रावून सोडणारे आणि वाचकांना वेड लावणारे कवी ठरले.

Web Title: The story of the birth of the book: This is how ‘Grace’s’ first book came about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.