भारतीय सैन्याने प्राण पणाला लावले, तेव्हाची गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 07:58 AM2024-07-27T07:58:24+5:302024-07-27T08:00:01+5:30
देशभक्ती आणि इच्छाशक्तीने काय साध्य होते, याचा प्रत्यय कारगिल युद्धात देशाने घेतला. त्या ऊर्जस्वल दिवसांचे स्मरण कारगिल विजयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त..
-भूषण गोखले, एअर मार्शल (नि.) वायुसेनेचे निवृत्त उपप्रमुख
कारगिल युद्ध झाले तेव्हा देशात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होते. १९९९ च्या दिल्ली-लाहोर बसयात्रेनंतर दोनच दिवसांनी भारत-पाकिस्तानमध्ये लाहोर जाहीरनामा झाला. या जाहीरनाम्यानंतर दोन्ही देशात शांततेचे वातावरण तयार होईल, अशी अपेक्षा होती; पण ती फोल ठरली.
पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ अतिशय धूर्त होते. त्यांनी त्यांचे पंतप्रधान किंवा वायुसेना आणि नौदलाच्या सहकाऱ्यांना काही न सांगता ‘ऑपरेशन बद्र’ची आखणी केली. याआधी पाकिस्तानने सियाचीन बळकावण्याचे खुपदा प्रयत्न केले होते. सोनमर्ग-कारगिलमार्गे लेहला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून (एनएच-१) जवळजवळ ७५ टक्के रसद सियाचीनला पोहोचवली जाते. ही रसद तोडून सियाचीनमधील भारतीय सैनिकांना एकटे पाडण्याचा त्यांचा डाव होता.
कारगिल, द्राससारख्या प्रदेशातील अतिथंडीच्या काळात भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही बाजूंचे सैनिक १५ ते २० हजार फुटांवरच्या आपापल्या ठाण्यावरून उतरून खालच्या ठाण्यात येऊन थांबायचे. असे खाली उतरण्याबाबत दोन्ही देशांत अधिकृत करार नव्हता. मात्र, तरी ते खाली यायचे. बर्फ वितळला, की परत आपापल्या ठाण्यांवर ते रुजू व्हायचे. १९९९ मध्ये मात्र तसे घडले नाही. भारतीय सैनिक डोंगराळ भागात बर्फ पडू लागल्यानंतर नेहमीप्रमाणे खाली उतरले. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या १३२ लष्करी ठाण्यांवर कब्जा केला.
भारतीय सैनिक आपल्या ठाण्याकडे पुन्हा जायला लागले, तेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्यावर वरून गोळीबार सुरू केला. कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन विजयंत थापर यांच्यासारख्या कित्येक शूरवीरांनी आपल्या प्राणांची पर्वा केली नाही. हा संघर्ष सुरू होऊन तीन आठवडे झाल्यानंतर २५ मे रोजी सरकारने वायुसेनेचा वापर करण्याचे ठरवले -‘ऑपरेशन सफेद सागर’. मात्र, हवाई हल्ले करताना ताबारेषा (एलओसी) ओलांडायची नाही, असे बंधन सरकारने घातले. त्यावेळी आपल्याकडे आजच्यासारखी स्पाइस बॉम्ब किंवा ब्राह्मोससारखी क्षेपणास्त्रे नव्हती. त्यामुळे एलओसी न ओलांडता घुसखोरांना पिटाळून लावणे थोडे कठीण होते.
पहिल्या दिवशी वायुसेनेच्या कॅनबेरा विमानाला गोळ्या लागल्या. ते परत येऊ शकले; पण दुसऱ्या दिवशी मिग-२१ लढाऊ विमान घेऊन गेलेला स्क्वाड्रन लीडर आहुजा परत आला नाही. त्याचे छिन्नविच्छिन्न झालेले शरीर पाकिस्तानने परत दिले. त्याच दिवशी एक मिग-२७ घेऊन गेलेल्या वैमानिक नचिकेताचे विमानदेखील पाडले गेले. त्याला युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले आणि दहा दिवसांनी भारताकडे परत केले. वायुसेनेचे एमआय-१७ हेलिकॉप्टरदेखील पाडण्यात आले आणि त्यातील पाचही जणांना वीरगती मिळाली.
कारगिलमध्ये सुरुवातीला आपली विमाने पडल्यानंतर पर्वतीय भागातील लढाईबाबत वेगळा विचार वायुसेनेला तातडीने करावा लागला. उंचावरील लक्ष्ये भेदण्यासाठी विमानांतील सॉफ्टवेअरमध्येही थोडा बदल करावा लागला. त्यासाठी आवश्यक सोर्स-कोड वायुसेनेकडे नव्हते; पण आपल्या देशातील कित्येक तरुण आयटी इंजिनिअर्सनी असे बदल करून दिले. त्यानंतर जॅग्वार विमाने खूप उंचावरून आणि बऱ्याच अचूकतेने बॉम्बिंग करायला लागली. मिग-२३ आणि मिग-२७ विमानांनी अहोरात्र बॉम्बिंग करून शत्रूला बेजार केले. मिराज-२००० विमानांना लेझर गाइडेड क्षेपणास्त्रे बसवून मारा सुरू केला. त्यामुळे टायगर हिल, मुंथो ढालो यासारख्या लक्ष्यांवर अचूक मारा होऊ लागला. पाकिस्तानचे महत्त्वाचे रसद तळ उद्ध्वस्त झाले.
कारगिल युद्धात वायुसेना, लष्कर आणि गुप्तचर खात्याला बरेच धडे मिळाले. कारगिल युद्धानंतर सुरक्षेच्या त्रुटींचा आढावा घेण्यासाठी कारगिल समितीची स्थापना करण्यात आली. २००४ मध्ये एनटीआरओची स्थापना झाली. सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली. लष्कराने पर्वतीय भागातील लढाईसाठी योग्य ती शस्त्रे आणि प्रशिक्षण सुरू केले आहे. वायुसेनेला आता सुखोई-३० एमकेआय, मिराज आणि राफेलसारख्या विमानांमुळे अधिक उंचावरच्या लक्ष्यांना अचूकतेने भेदता येणार आहे. चीनबरोबर आपले सैन्य गेल्या चार वर्षांपासून बर्फाळ आणि उंच प्रदेशात चिनी सैनिकांच्या डोळ्याला डोळा भिडवून उभे आहे. पूर्वीच्या युद्धांतून शिकलेल्या धड्यांचा आता फायदा होत आहे. १९९९ च्या तुलनेत आज भारताची युद्धक्षमता निश्चितच वाढली आहे. जय हिंद!