संजय राऊतांना पाडण्यासाठी 'टूथपेस्ट' फॉर्म्युला तयार होता, पण..; काय आहे भानगड?
By यदू जोशी | Published: July 8, 2022 05:56 AM2022-07-08T05:56:53+5:302022-07-08T05:58:15+5:30
घराणेशाहीमुक्त महाराष्ट्र असा राजकारणाचा नवीन पट भाजप तयार करत आहे. भविष्यात पवारांच्या वाड्याला धक्के दिले जाऊ शकतात.
यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत
महाविकास आघाडी सरकारमध्ये घराणेशाही अधिक होती. ठाकरे, पवार घराण्यांचा वरचष्मा होता. शिंदे-फडणवीस सरकार हे कार्यकर्त्यांतून नेते बनलेल्यांचं आणि घराणेशाहीच्या कचाट्यातून सुटलेलं सरकार असेल अशी अपेक्षा आहे. ठाकरेंच्या गडाला धक्का दिला गेला आहे, भविष्यात पवारांच्या वाड्याला धक्के दिले जाऊ शकतात. याचवेळी नियोजन होतं; पण तशी गरज भासली नाही. ‘घराणेशाहीमुक्त महाराष्ट्र’ असा राजकारणाचा नवीन पट भाजप तयार करू पाहत आहे. आपल्याला हवं असलेलं, भेटणारं सरकार आलं आहे असं लोकांना सध्यातरी वाटत आहे. तेही उद्या भेटलं नाही, बोललं नाही तर लोकांचा भ्रमनिरास होईल. “माझ्याकडे देण्यासारखं आता काहीही नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. सत्तेत असताना जे देण्यासारखं होतं ते एकतर दिलं नाही किंवा विशिष्ट लोकांनाच दिलं म्हणून आजची ही वेळ आली आहे.
तब्येतीच्या कारणानं लोकांना न भेटणारे ठाकरे आज दिवसभर सगळ्यांना भेटत आहेत. त्यांना हे आधीही करता आलं असतं. असं असलं तरीही “ठाकरे संपले” असं कोणी म्हणत असेल तर तो मात्र तद्दन मूर्खपणा आहे. शिंदे आमदारांना सहज घेऊन जाऊ शकतात; पण शिवसैनिकांना सोबत नेण्यासाठी मोठी ताकद लागेल! मातोश्री अन् शिवसेना भवन ही दोन श्रद्धास्थळं ठाकरेंच्या हाती आहेत. जे झालं ते वाईट झालं, असं मानणाऱ्या लाखो शिवसैनिकांचा कौलच शेवटी महत्त्वाचा ठरेल. शिवसेनेतील गटबाजीचा भाजपला फायदा होईल. ठाकरे यांच्याकडे सत्ता नसल्यामुळे ते आता काही देऊ शकत नाहीत आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला भवितव्य नाही, असं वाटणारे जे शिवसैनिक आहेत त्यांच्या भागात शिंदे गटाचा प्रभाव नसेल तर ते भाजपकडे वळतील.
शिंदे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्रिपद मागताना दोन कारणं दिली होती : १) मी मुख्यमंत्री व्हावं अशी माझ्यासोबतच्या आमदारांची तीव्र इच्छा आहे. २) मला मुख्यमंत्रिपद दिलं तर शिवसेनेवर वर्चस्व मिळविणं मला सोपं जाईल. आता त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं आहे. ठाकरेंना संपविण्याचं रिटर्न गिफ्ट त्यांना भाजपला द्यावं लागेल. शिंदेंच्या रूपानं शिवसेना जिवंत ठेवायची आणि मूळ शिवसेनेतील बारा-पंधरा टक्के आपल्याकडे वळवायचे असा भाजपचा प्रयत्न दिसतो. हिंदुत्वामध्ये भाजपला ठाकरे हे वाटेकरी नको आहेत आणि त्या घराण्याची आभाही नको आहे. भाजपला शिंदे चालतात.
मला मंत्री करा, आमदार करा!
भाजप-शिंदे युतीच्या १६६ आमदारांपैकी १०० जणांना मंत्री व्हायचं आहे. आपल्या सरकारमध्ये ‘लॅक ऑफ टॅलेंट’ असू नये म्हणून आम्हाला मंत्री करा, असे सल्ले राजकारणाबाहेरचे पण भाजपच्या जवळचे लोक फडणवीसांना देत आहेत. कोणी संघाच्या लोकांना धरून हालचाली करताहेत. फडणवीसांकडे रावळगाव, कॅडबरी चॉकलेटची फॅक्टरी आहे. किमान हजारभर नेत्यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर जायचं आहे. सगळ्यांची फिल्डिंग जोरात सुरू आहे. विधान परिषदेवर भाजपला ९ आणि शिंदे गटाला ३ जागा मिळतील. भाजपच्या ९ जागांसाठी ९०० जण बाशिंग बांधून तयार आहेत. इच्छुक इतके उतावीळ झाले असताना “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीत परफॉर्मन्स दाखवा, मग बघू.” असं पिल्लू भाजप नेतृत्वाकडून सोडलं जाऊ शकतं. शिंदे गटातील ज्या आमदारांचं वन टाईम सेटलमेंट झालेलं आहे, त्यांना मंत्रिपद दिलं जाणार नाही.
कडेवरची बाळं उतरतील का?
सत्ताबदल होताच नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी जुळवून घेण्यासाठी काही चमको आयएएस अधिकाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. ‘साहेब, मी तुमचाच!’ असं म्हणत रात्रीतून निष्ठा बदलवून चरणस्पर्श केला जात आहे. पाच वर्षे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांच्या दरबारात असलेले आणि त्यानंतर नवीन सरकार येताच तिकडे उड्या मारणारे होतेच. रंग बदलण्याबाबत सरडे ज्यांचं उदाहरण देतात अशा काही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची एक यादी फडणवीस यांनी तयार करून ठेवली आहे म्हणतात. अशांना यावेळी बाजूला सारलं जावं अशी हितचिंतकांची इच्छा आहे. कडेवरची काही बाळं उतरवावी लागतील.
संजय राऊत आणि टूथपेस्ट
राज्यसभा निवडणुकीच्या आधीचा एक किस्सा आता बाहेर आला आहे. त्या निवडणुकीच्या आधीच शिंदे गटाचं मिनी बंड होणार होतं. संजय राऊत यांना पाडण्याचं पक्कं झालं. एक जण चर्चगेट स्टेशनसमोरील एशियाटिक या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेला. त्याने छोट्या दहा टूथपेस्ट खरेदी केल्या. दहा आमदारांची मतं अवैध ठरवायची असं ठरलं होतं. त्यासाठी थोडीशी टूथपेस्ट बोटाला लावून जायचं; पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीला मत दाखवून ते पेटीत टाकताना थोडी पेस्ट लावली की मत अस्पष्ट होईल वा खोडलं जाईल आणि अवैध ठरेल, अशी रणनीती होती; पण वेळेवर हा निर्णय बदलला. संजय राऊत यांना पाडणं हे आपलं उद्दिष्ट नाही अन् तसं केलं तर उद्धव ठाकरे सावध होतील, मोठं बंड होऊ दिलं जाणार नाही हे लक्षात आल्यावर टूथपेस्टचा फॉर्म्युला रद्द करण्यात आला. संजय राऊतजी, आपण खासदार होण्यात न वापरलेल्या त्या टूथपेस्टचाही वाटा आहे बरं!