राजकारणाचे व्याकरण बदलणारा कणखर नेता 'नरेंद्र मोदी'; सततच्या धक्कातंत्रामुळे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 08:12 AM2023-09-17T08:12:50+5:302023-09-17T08:13:27+5:30

राजकारणातील प्रस्थापितांना मुळासकट हादरे देण्याच्या मोदी-तंत्रामुळे २०१४ नंतर भारतात राजकारणाचा बाज पूर्णपणे बदलला. विरोधी पक्षांची आणि त्यांच्या विरोधाची पर्वा न करता, त्यांनी नोटाबंदीपासून नव्या संसद भवनासह महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम सुरू करण्यापर्यंत धाडसी निर्णयच घेतले नाहीत, तर ते तार्किक शेवटापर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही दाखविला. नवे संसद भवन मोदींना अपेक्षित असलेल्या नव्या भारताचे प्रतीक ठरले आहे.

The tough leader who changed the grammar of politics 'Narendra Modi' | राजकारणाचे व्याकरण बदलणारा कणखर नेता 'नरेंद्र मोदी'; सततच्या धक्कातंत्रामुळे...

राजकारणाचे व्याकरण बदलणारा कणखर नेता 'नरेंद्र मोदी'; सततच्या धक्कातंत्रामुळे...

googlenewsNext

सुनील चावके, सहयोगी संपादक  
प्रस्थापित प्रतिस्पर्ध्यांचे मनसुबे उधळून राजकारणावर आपला ठसा उमटविणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीचे ठळक वैशिष्ट्य ठरावे. गांधीनगरपासून दिल्लीपर्यंत राजकीय उत्कर्षाचे शिखर सर करताना त्यांनी धक्कातंत्राचा अवलंब करीत आपल्या गाफिल प्रतिस्पर्ध्यांना सतत खिंडित गाठले. राजकारणात अकल्पित वाटणारी आक्रमकता रोमारोमात भिनली असल्यामुळे पंतप्रधान मोदी परिणामांची तमा न बाळगता बेधडक निर्णय घेतात. ७४ व्या वर्षात पदार्पण करतानाही त्यांच्यातील जोश आणि आक्रमकता तसूभरही कमी झालेला नाही.

पंतप्रधान मोदींच्या राजकीय यशात अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीचा मोठा वाटा आहे. दीर्घकाळ प्रचारक असल्याने आदर्शवादाची स्पष्ट जाणीव असलेल्या मोदींनीही पंतप्रधानपदाच्या सव्वा नऊ वर्षांच्या कारकीर्दीत अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी आणि काश्मीरात कलम ३७० रद्द करून संघालाही नेत्रदीपक परतावा दिला. सलग दहा वर्षे पंतप्रधान राहिलेले पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यापाठोपाठ मोदीही पंतप्रधानपदाच्या दहाव्या वर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. २०२४ साली रा. स्व. संघाला शतक महोत्सवी वर्षाचे वेध लागलेले असेल आणि पंतप्रधान मोदींनाही सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन इतिहास घडविण्याची संधी असेल. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास समान नागरी कायद्याच्या तिसऱ्या इच्छेचीही संघाच्या शतक महोत्सवी वर्षात चुटकीसरशी पूर्तता होईल, यात शंका नाही.  

भारतीयांना जबरदस्त इच्छाशक्ती असलेले कणखर नेतृत्व आवडते. सत्तरच्या दशकात पाकिस्तानविरुद्ध ‘दुर्गेचा अवतार’ धारण करणाऱ्या इंदिरा गांधींच्या नेतृत्वाने भारतीयांना मोहिनी घातली. नीट गृहपाठ करून धाडसी निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान मोदींनी या कणखर बाण्याला १४० कोटी भारतीयांची उत्कंठा वाढविणाऱ्या रोमहर्षकतेची जोड दिली. मोदींनंतर कोण हा प्रश्न केवळ भाजप आणि संघालाच भेडसावणारा नाही, तर तो मोदींमुळे कल्पनाविश्व व्यापून गेलेल्या सर्वसामान्य भारतीयांसाठीही तितकाच महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळेच मोदींच्या नेतृत्वाचा प्रत्यक्ष संबंध नसलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष बाजी मारून जात असले तरी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांचे निकाल लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेल्या मोदींच्या बाजूने लागले आहेत. स्वाभाविकच इंदिरा गांधींनी केलेल्या घोडचुका टाळून राजकारण करताना पं. नेहरूंचा १६ वर्षे २८६ दिवस पंतप्रधान पदाचा विक्रम इतिहासजमा करण्याचे स्वप्न मोदींना खुणावत असेल. हे लक्ष्य अवघड असले तरी अशक्य नाही. ते सिद्धीस जाईल की नाही हे लोकसभा निवडणुकीत पुढच्याच वर्षी दिसणार आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी दुर्दम्य आत्मविश्वास तसेच पंतप्रधान पदासाठी लागणारी मानसिक आणि शारीरिक क्षमता ही मोदींसाठी मोठीच जमेची बाजू ठरणार आहे. 

त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेले तसेच चार हजार किलोमीटरची ‘भारत जोडो’ यात्रा काढून आपल्या फिटनेसबरोबर संयमाच्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले राहुल गांधी कदाचित पंतप्रधान पदासाठी त्यांना टक्कर देण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत. पण राहुल गांधींच्या नावावर ‘इंडिया’ आघाडीची सहमती होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे सलग दोन टर्म पंतप्रधान राहून दहा वर्षांच्या अँटी इन्कम्बसीसह लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना निश्चिंत वाटणाऱ्या मोदींच्या तुलनेत त्यांचे विरोधकच चिंतेने ग्रासलेले दिसतात. विरोधकांना मोदींचा अश्वमेध अडविण्यासाठी केवळ एकजूटच होऊन चालणार नाही, तर मोदींचा ठोस पर्याय देण्याचा विश्वासही मतदारांच्या मनात निर्माण करावा लागेल. सामूहिक नेतृत्वावर भर देणारे विरोधक मतदारांना तो विश्वास कसा देणार, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. 

राजकारणातील प्रस्थापितांना मुळासकट हादरे देण्याच्या मोदी-तंत्रामुळे २०१४ नंतर भारतात राजकारणाचा बाज पूर्णपणे बदलला. विरोधी पक्षांची आणि त्यांच्या विरोधाची पर्वा न करता त्यांनी नोटबंदीपासून नव्या संसद भवनासह महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम सुरू करण्यापर्यंत धाडसी निर्णयच घेतले नाहीत, तर ते तार्किक शेवटापर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही दाखविला. नवे संसद भवन मोदींना अपेक्षित असलेल्या नव्या भारताचे प्रतीक ठरले आहे. वैविध्यपूर्ण भारताची महत्ता, संस्कृती आणि वैशिष्ट्ये जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचविण्यात कोणतीही कसर सोडली नाही. भारतात मुस्लिम विरोधाचे वातावरण असतानाही त्यांनी सौदी अरेबियासारख्या देशाशी यशस्वी बोलणी केली. जी-२० संमेलनाचे डोळे दीपवून टाकणारे आयोजन करीत डॉ. मनमोहन सिंग आणि शशी थरूर यांच्यासारख्या विरोधकांनाही प्रशंसा करण्यास भाग पाडले. निरंतर सातत्य असलेल्या दृढ संकल्पाच्या जोरावर पंतप्रधान मोदी यांनी इंदिरा गांधींनंतर जगात खंबीर नेता म्हणून आपली प्रतिमा प्रस्थापित केली आहे. मोदींच्या राजकीय सिलॅबसमध्ये चीन आणि मणिपूर हे काहीसे त्रासदायक विषय आहेत. पण त्याविषयी ते निश्चिंत आहेत. कोणत्याही प्रश्नावर आक्रमकतेने तोडगा काढून काळाच्या ओघात तो नीट चौकटीत बसविण्याचा दृढ निर्धार दाखवत पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या राजकारणाचे व्याकरणच बदलले आहे. 

ठेवणीतील डावपेचांनी विरोधी पक्षांना खिळखिळे केले
गेल्या दोन लोकसभा निवडणुका आपल्या चेहऱ्यावर पूर्ण बहुमतानिशी जिंकणाऱ्या पंतप्रधान मोदींना २०२४ मधील आव्हानांची जाणीव आधीच झालेली आहे. २०२४ ची निवडणूक जड जाणार, याची कल्पना असल्यामुळे त्यांनी ठेवणीतील डावपेचांचा अवलंब करीत महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत विरोधी पक्षांना खिळखिळे केले. लोकसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत याच प्रयोगाची पुनरावृत्ती इतर राज्यांमध्येही झाल्यास नवल वाटू नये.

मोदींच्या सततच्या धक्कातंत्रामुळे काँग्रेस पक्ष घायकुतीला 
मोदींच्या सततच्या धक्कातंत्रामुळे घायकुतीला आलेला काँग्रेस पक्ष आणीबाणीनंतर इतका क्षीण कधीच झाला नव्हता. एवढा की, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील द्रमुक आणि तृणमूल काँग्रेससारखे प्रादेशिक पक्षही आता लोकसभेतील संख्याबळाच्या बाबतीत काँग्रेसच्या स्पर्धेत उतरले आहेत. केंद्रात २००४ ते २०१४ दरम्यान सत्तेत असलेल्या काँग्रेस प्रणीत यूपीएने मोदी यांचे खच्चीकरण करण्यासाठी सर्व डावपेचांचा अवलंब केला. पण केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदींनी काँग्रेसचेच तंत्र अधिक तीक्ष्णपणे वापरून काँग्रेसवर डाव उलटविला. 

Web Title: The tough leader who changed the grammar of politics 'Narendra Modi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.